आले लागवड खूप महत्त्वाची माहिती

0
आले व हळद लागवड पद्धती
आले लागवड
आले लागवड पद्धती
सपाट वाफे पद्धत : _पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सेंमी किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
सरी-वरंबा पद्धत :मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे.


रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत :काळी जमीन, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने १५ ते २० टक्के अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादीवाफ्याची लांबी ठेवावी. गादीवाफे तयार करताना दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.२० ते १.५ मीटर ठेवावे. गादीवाफ्यावर २ ओळी लावायच्या असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सेंमी व उंची ३० सेंमी ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, दोन कंदामधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे. गादीवाफ्यावर ३ किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असल्यास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरीतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सेंमी अंतर ठेवावे._


हळद लागवड
हळद लागवड पद्धती

सरी-वरंबा पद्धत :
७५ ते ९० सेंमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार ६ ते ७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५ ते ६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी ३० सेंमी अंतरावर कंदाची लागवड करावी. कंदावर ३ ते ४ इंच माती येईल, या पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८ ते २९,००० कंद लागतात._

रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत :
यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी ही लागवड पद्धत उपयुक्त ठरते. या पद्धतीद्वारे विद्राव्य खते देता येतात व उत्पादनात वाढ मिळते. या पद्धतीत ४ ते ५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सेंमी सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून, दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सेंमी ठेवावे. एकरी साधारणतः २२ ते २३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादी वाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतर ठेवून दोन ओळींमधील व दोन कंदांमध्ये अंतर ३० सेंमी अंतर ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात.
आले  
महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड कोकणापासून ते विदर्भ, मराठवाड्यापर्यंत उत्तम प्रकारे करता येऊ शकते. आले पिकासाठी उष्ण व दमट हवामान मानवते. परंतु, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण व कोरड्या हवामानातही या पिकाची लागवड करता येते. आल्याच्या उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान तर वाढीच्या कालावधीसाठी २० अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. या पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सेंमी पाऊस पुरेसा ठरतो. परंतु, जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.
पाण्याचा चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य असते. पाणी साचून राहिल्यास आले पीक कंदकुज या रोगास बळी पडते. नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. जमिनीची खोली कमीत कमी ३० सेंमी असावी. लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते. आले, हळद, बटाटा यांसारख्या कंदवर्गीय पिकाच्या बेवडावरती पुन्हा आल्याची लागवड करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »