मिरी लागवड

0
मिरी लागवड
मिरी लागवडीबाबत माहिती-
मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणेच मिरी पिकास सावलीची आवश्‍यकता असते. मिरीची लागवड नारळ, सुपारीच्या बागांमध्ये प्रत्येक झाडावर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्या झाडापासून 30 सें.मी. अंतरावर 45 – 45 – 45 सें.मी. आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती,

दोन ते तीन घमेली कंपोस्ट किंवा शेणखत व एक किलो सुपर फॉस्फेट किंवा हाडांची पूड, तसेच 50 ग्रॅम शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. प्रत्येक झाडाजवळ पूर्व व उत्तर दिशेस एक एक असे दोन वेल लावावेत. ज्या वेळी सुपारीमध्ये आंतरपीक घ्यावयाचे असेल, त्या वेळी सुपारीच्या दोन झाडांमधील अंतर 2.7 ते 3.3 मीटर असावयास पाहिजे; मात्र घट्ट लागवड केलेल्या सुपारीच्या झाडांमध्ये मिरीचे आंतरपीक सरसकट सर्व झाडांवर घेता येणार नाही. सुपारीची घट्ट लागवड असल्यास, फार सावलीमुळे मिरीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा वेळी बागेच्या चोहोबाजूंच्या कडेच्या फक्त दोन रांगांतील सुपारीच्या झाडांवर मिरीचे वेल चढवावेत. लागवड करताना तयार केलेल्या खड्ड्यांत मधोमध मुळ्या असलेली मिरीची रोपे लावावीत. वेल आधाराच्या झाडावर चढण्यासाठी वेलीस आधार द्यावा.

काळी मिरीचे लहान वेल आधाराच्या झाडावर चढेपर्यंत अधूनमधून त्यांना आधार, वळण देणे आणि झाडावर चढण्यासाठी दोरीच्या साह्याने बांधणे जरुरीचे असते. वेल चार ते पाच मीटरहून जास्त वाढू देऊ नयेत. आधाराच्या पांगाऱ्याच्या फांद्या काही प्रमाणात कापून सावली योग्य प्रमाणात ठेवावी. वर्षातून दोन वेळा ऑगस्ट – सप्टेंबर आणि नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये वेलीभोवतालची जमीन खणून भुसभुशीत करावी. वेलींना जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात व उन्हाळ्यात चार ते सहा दिवसांनी पाणी घालावे. तीन वर्षांपासून पुढे प्रत्येक वेळेस 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 300 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश व एक किलो सुपर फॉस्फेट ही खताची मात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात व दुसरा जानेवारी महिन्यात द्यावा. ही खते वेलीपासून 30 सें.मी. अंतरावर चर खणून त्यामध्ये द्यावीत. आठ वर्षांनंतर मिरीचे भरपूर पीक मिळू लागल्यानंतर जरुरीप्रमाणे खतांची मात्रा वाढवावी.
सुधारित जाती
लागवडीसाठी पन्नीयूर-1 ते पन्नीयूर-5 या नवीन जाती विकसित व प्रसारित केल्या आहेत, तसेच राष्ट्रीय मसाला पीक संशोधन केंद्र, कालिकत येथून शुभकारा, श्रीकारा, पंचमी आणि पौर्णिमा या जाती विकसित व प्रसारित करण्यात आल्या आहेत. पन्नीयूर संशोधन केंद्राने पन्नीयूर-1 ही संकरीकरण करून तयार केलेली जात कोकण कृषी विद्यापीठाने आणून कोकणच्या भौगोलिक परिस्थितीत त्या जातीचा निकष आजमावून, सदर जात कोकणासाठी प्रसारित केली आहे. सदर जातीच्या पूर्ण वाढीच्या एका वेलीपासून सरासरी सात किलो हिरव्या मिरीचे उत्पादन मिळते. पन्नीयूर-1 ही जात गावठी मिरीपेक्षा जवळ जवळ तीन पट पीक देते.
Source:
संपर्क –
02358 – 282415, 282130, विस्तार क्र – 250, 242, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »