केळी पिकाचे थंडीतील व्यवस्थापन
*केळी पिकाचे थंडीतील व्यवस्थापन*
गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने थंडीला प्रारंभ होत आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही थंडी राहते. या कालावधीत कमाल आणि किमान तापमानातील कमी- अधिक फरकामुळे केळीच्या कंद, घड, मुळे आणि पानांवर विपरीत परिणाम होत असतो. हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
– थंड वातावरणात केळीची नवीन लागवड टाळावी.
– केळी लागवडीच्या वेळेस पश्चिमेला व दक्षिणेला सुरू, नेपियर गवत, शेवरी इत्यादी वारा प्रतिरोधक वनस्पतींची २-३ ओळीत दाट लागवड करावी. वारा प्रतिरोधक वनस्पतींमुळे बागेचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.
– थंडी सुरू होण्याअगोदर रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा द्याव्यात. पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये. पालाश निर्धारित मात्रेपेक्षा २० टक्के अधिक द्यावा. तसेच या कालावधीत प्रतिझाड किमान अर्धा किलो निंबोळी पेंड दिल्यास जमिनीचे तापमान वाढते. तसेच सूत्रकृमींपासून पिकांचे संरक्षणही होते.
– पहाटेच्या वेळी किंवा रात्री ठिबक संचाने सिंचन करावे.
– या काळात जमिनीत योग्य तापमान तसेच वाफसा स्थिती टिकवून ठेवण्यासाठी शेणखत अथवा गांडूळ खत पिकास द्यावे.
-पिकामध्ये उसाचे पाचट, रोगाचा प्रादुर्भाव नसलेली वाळलेली पाने, सोयाबीन भुसा यासारखे सेंद्रिय पदार्थ अथवा चंदेरी रंगाच्या पॉलिप्रॉपिलीन पेपरचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील तापमान स्थिर राहण्यास मदत होते. लाभदायक सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
– बागेभोवती किंवा बागेजवळ गव्हाचा भुसा, लाकडाचा भुसा किंवा मक्याचा भुसा, काडीकचरा, गवत जाळून बागेमध्ये धूर करावा.
– घडाची योग्य वाढ व पक्वता याकरिता शेवटची फणी उमलल्यानंतर केळफूल कापावे. ते बागेबाहेर नेऊन नष्ट करावे.
– फण्या उमलल्यानंतर सर्वांत खालची फणी बऱ्याच वेळा अर्धवट असते. ती कापावी.
– केळफूल कापणीनंतर घडावर पोटॅशियम डाय हायड्रोफॉस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी यांची फवारणी घ्यावी. त्यात स्टिकर १ मिलि प्रति लिटर मिसळावे. पुढील फवारणी १५ दिवसांनी घ्यावी. यामुळे घडातील फळांच्या आकारमान वाढते. घडांचे वजन वाढते. घड लवकर काढणीस येतो.
– केळफूल कापणी, फण्यांची विरळणीनंतर घड ७५ x १०० सेंमी आकारमानाच्या २ सच्छिद्र पॉलिप्राॅपिलीन पिशव्यांनी झाकावा. यामुळे घडाचे थंडी, हवा, धूळ, पाणी तसेच दव यापासून संरक्षण होते.
– केळीची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. अशी पाने शक्यतो हिवाळ्यात कापू नयेत. फक्त रोगग्रस्त पानाचा तेवढा भाग कापावा.
– करपा या बुरशीजन्य रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवल्यास फायदा होतो. खालील शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)
कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक ५० मिलि मिनरल ऑइल
प्रोपीकोनॅझोल १० मिलि अधिक ५० मिलि मिनरल ऑइल
संपर्क – आर. एम. पाटील, ९८५०७६८८७६
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)