रसशोषक पतंग (किड )

0

राज्यभरामध्ये बहुतेक ठिकाणी सर्वत्र पुरेसा पाऊस झाल्याने रसशोषक पतंगाच्या वाढीसाठी पूरक असणाऱ्या वेलवर्गीय वनस्पतींची वाढ झाली आहे. पोषक वातावरणामुळे या किडीचा प्रादुर्भाव सध्या नगर, सोलापूर भागांमध्ये डाळिंब पिकामध्ये, तर परभणीमध्ये मोसंबी बागेमध्ये दिसून येत आहे.
डॉ. तुषार शितोळे, डॉ. शशिकांत शिंदे, डॉ. शरद गायकवाड 

शेतकरी या किडीला ‘पाकोळी’ या नावाने संबोधतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात किडीमुळे मृग बहरातील फळांचे मोठे नुकसान होते. या किडीचा प्रादुर्भाव सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि सांगली जिल्ह्यांत जास्त आढळतो. डाळिंबाव्यतिरिक्त केळी, पेरू, आंबा, पपई, मोसंबी, संत्री, चिकू, रामफळ, सफरचंद, अननस, काजू, द्राक्ष, टरबूज, अंजीर या फळांचेही रसशोषण हे पतंग करतात. 

किडींची ओळख - 
महाराष्ट्रामध्ये डाळिंबावरील रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या युडोरिमा मॅटर्ना, युडोसिमा फुलोनिका, युडोसिमा होमाईना आणि आकीया जनाटा या प्रजाती आहेत. या किडीचे पतंग आकर्षक, मोठ्या आकाराचे असतात. या किडींच्या पतंगांना पंखाच्या मजबूत जोड्या असून, ते बरेच अंतर उडून जाऊ शकतात. पतंगाच्या पंखाची मागील जोडी पिवळ्या रंगाची असून, त्यावरील विविध आकारांच्या ठिपक्यावरून त्यांची प्रजात ओळखता येते. 

१. युडोसिमा मॅटर्ना – शरीर व मागील पंख नारंगी रंगाचे असून, पंखाच्या कडेने गडद पट्टा व पांढरे ठिपके असतात. मध्यभागी एक काळा ठिपका असतो. 
२. युडोसिमा फुलोनिका – शरीर नारंगी रंगाचे, मागील पंख नारंगी किंवा पिवळसर रंगाचे असून, त्यावर इंग्रजी c अक्षरासारखा काळा ठिपका असतो. 
३. युडोसिमा होमाईना – शरीर नारंगी रंगाचे असून, पुढील पंखावर पोपटी रंगाचे पट्टे असतात. तसेच पाठीमागील पंखावर इंग्रजीतील उलटे ‘c’ आकाराचे ठिपके असतात. 
४. आकीया जनाटा – पुढील पंख हे तपकिरी करड्या रंगाचे असतात. पाठीमागील करड्या पंखावर टोकाकडे चमकदार पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात. 

जीवनक्रम - 
– या किडीची अंडी घालण्यापासून ते पतंगाची पूर्ण वाढ होईपर्यंतचा जीवनक्रम (अंडी,अळी,कोष) नदीनाल्या जवळील जंगली वनस्पती, गवते, वेलीवर (उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल, पांगारा आणि मधुमाशी इ.) पूर्ण होतो. 
– अंडी – मादी पतंग वेलवर्गीय वनस्पतीवर ८०० ते ९०० अंडी घालते. ही अंडी गोलाकार व खालील बाजूस सपाट असून पांढऱ्या रंगाची असतात. उबवण्याच्या वेळी अंड्याचा रंग नारंगी होतो. अंडी २ ते ३ दिवसांत उबवल्यानंतर, त्यातून लहान पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. 
– अळी – या अळ्या सुरवातीला पाने खरडवतात. नंतर पुढील अवस्थेत पूर्ण पाने कुरतडून खातात. अळीची पूर्ण वाढ होईपर्यंत १२ ते १४ दिवसांत पाच वेळा कात टाकते. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा तपकिरी रंग होतो. 
– कोष – अळी पूर्ण वाढ झाल्यानंतर वेलीवर स्वतःभोवती कोष विणून कोषावस्थेत जाते. कोषावस्थेतून १० ते १५ दिवसांची असते. 
– पतंग – कोषातून बाहेर पडलेला पतंग ३० ते ५५ दिवस जगतो. या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास ६०-७० दिवस लागतात. 

नुकसानाचा प्रकार - 
– पतंग निशाचर असून, सायंकाळी बाहेर पडून फळातील रस शोषतात. 
– रात्री ८ ते ११ आणि पहाटे ४ ते ६ दरम्यान या पतंगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. 
– युडोसिमा प्रजातीतील पतंगाची सोंड समोरच्या टोकाला मजबूत असते. त्यामुळे पतंग फळावर बसून, फळांना सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून रस शोषतात. अशा छिद्रामधून विविध बुरशीचा प्रादुर्भाव व जीवणूंचा फळामध्ये शिरकाव होतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त फलातील छिद्रामधून रस बाहेर पडताना दिसतो. कालांतराने छिद्र पाडलेल्या जागी फळ मऊ होते व त्या जागी लालसर गोलाकार चट्टा तयार होऊन फळ सडण्यास सुरवात होते. अशी प्रादुर्भावग्रस्त फळे पिकण्यापूर्वी गळून पडतात. 
– फळे विक्री योग्य तसेच खाण्यायोग्य राहत नाहीत. फळाची प्रत कमी होते. यामुळे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत डाळिंब फळाचे नुकसान होते. 

एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन - 
१. बागेत स्वच्छता राखावी. बागेतील गळलेली फळे एकत्रित गोळा करून, जमिनीत गाडून नष्ट करावीत. 
२. फळ बागेसह परिसरामध्ये, बांधावरील तसेच नदीनाल्याच्या किनाऱ्यावर अळीच्या वाढीला पूरक असणाऱ्या वनस्पतींचा (गुळवेल, वासनवेल, चांदवेल, पांगारा, मधुमालतीस, पाशारा, घाणेरी आणि एरडी) नायनाट करावा. 
३. फळबागेसह परिसरामध्ये व बांधावरील वेलवर्गीय वनस्पतींवर मॅलथिऑन २ मिली प्रति लिटर प्रमाणे फवारावे. 
४. बागेत सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान ओला कचरा जाळून धूर करावा. या बरोबर कडूनिंबाची पाने जाळून धूर केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. 
५. पिकलेली केळी, पेरू आणि टरबूज बागेत ठेवावीत. त्याकडे पतंग आकर्षित होतात. असे रस शोषून सुस्त झालेले पतंग वेचून नष्ट करावेत. 
६. या किडीचा पतंग ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये पक्व होणार नाहीत, अशा पद्धतीने फळ हंगामाचे नियोजन करावे. 
७. प्रादुर्भावग्रस्त फळे तोडू नयेत, कारण अशा फळाकडे पतंग परत आकर्षित होतो, त्यामुळे चांगल्या फळाचे संरक्षण होण्यास मदत होते. 
८. पेपर, वर्तमानपत्र तसेच पॉलीमर पिशव्या यांच्या आच्छादनाने फळे झाकून टाकावीत. 
९. या किडीच्या (पतंगाचा) प्रादुर्भाव सुरू झाल्यावर रात्री ७ ते ११ आणि पहाटे ५ ते ६ या वेळी बागेत टेंभा (मशाल) किंवा बॅटरीच्या साह्याने फळावर बसलेले पतंग गोळा करुन रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. 
१०. पतंगाना बागेपासून परावृत करण्याकरिता सिट्रोनेला ऑईल —- प्रमाण—-चा वापर करावा. 
११. बागेभोवती शिफारशीच्या वेळी डायक्लोरव्हॉस १ मिलि प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी. 
१२. विषारी आमिष बनवण्याकरता ९५ टक्के मळी/काकवी ——- आणि——— ५ टक्के मॅलॅथीऑन ५० ईसी वापरावे. ही आमिषे रात्रीच्या वेळी सीएफएल दिव्याखाली मातीच्या पसरट भांड्यामध्ये ठेवावीत. 
Sorce:
संपर्क – डॉ. तुषार शितोळे, ९८९०३२०९८३ 
(डॉ. शितोळे व डॉ. शिंदे हे पुणे येथे, तर डॉ गायकवाड हे राहुरी येथे संशोधन सहयोगी म्हणून क्रॉपसॅप प्रकल्पात कार्यरत आहेत.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »