पाणी तपासणी
🔬💧पाणी तपासणी
जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. यासाठी सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करून समस्येचे योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. पाण्याची प्रत सिंचनासाठी योग्य नसल्यास शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा शेतीसाठी सिंचनास आवश्यक, चांगल्या प्रतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सिंचनाच्या पाण्याच्या प्रतीचा जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे समस्यायुक्त जमिनींच्या क्षेत्रात वाढ होऊन, शेतीच्या शाश्वत उत्पादकतेस धोका निर्माण झाला आहे. यासाठी पाण्याची प्रत आणि हे पाणी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचे आरोग्य यांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
पिकांच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पिकांची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. पाण्याची प्रत साधारणपणे खडकांचे प्रकार किंवा हवामान यावर अवलंबून असते. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी दिले तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात एकवटतात. अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर केल्यास ते क्षार विरघळतात, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून कालांतराने पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करणे हितावह ठरते.
🔸सिंचनाच्या पाण्याची तपासणी🔸
सद्यःस्थितीत शेतीमधील पाण्याचे महत्त्व लक्षात घेता इतर सर्व किमती निविष्ठांचा शेतीत वापर करत असताना आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून इतर निविष्ठांची कार्यक्षमता वाढविता येऊन शेतीमध्ये किफायतशीरपणा आणता येईल.
🔸यासाठी करा सिंचनाच्या पाण्याची तपासणी🔸
पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास.पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास.पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास.जमीन चोपण, चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास.जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास.
🔸परीक्षणासाठी पाण्याचा नमुना🔸
निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रातिनिधिक असावयास पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगले ढवळून घ्यावे. विहिरीवर पंप बसविलेला असेल तर तो साधारणपणे 15 ते 20 मिनिटे सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावे. काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्यामध्ये साधारणतः एक लिटर पाणी भरावे. कूपनलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या साह्याने लहान बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घ्यावा. त्या बाटलीवर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत त्वरित पाठवावा.
🔸सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण🔸
प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे परीक्षण करताना आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम या घटकांचे प्रमाण काढण्यात येते.
🔸सिंचनाच्या पाण्याची प्रत🔸
शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरविताना पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, शोषित सोडिअम गुणोत्तर, क्लोराईड व बोरॉनचे प्रमाण, तसेच उर्वरित सोडिअम कार्बोनेटवरून वर्गवारी करून हे पाणी ओलितासाठी योग्य किंवा अयोग्य हे ठरविण्यात येते.