पीक कर्ज नेमकं मिळतं तरी कसं?
सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी काही शेतकरी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत. तर काही जुन्या कर्जाचं पुनर्गठण करुन घेत आहेत. मात्र कर्जाची ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. पीक कर्ज नेमकं मिळतं तरी कसं?
शेतकऱ्याला सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज मिळतं. यासाठी बँकेचा खातेदार होणं गरजेचं आहे. जुने खातेदार थेट पीककर्जासाठी अर्ज करु शकतात. यासाठी तलाठ्याकडून काही कागदपत्रं मिळवावी लागतात.
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रं
*नमुना ८ अ उतारा
*७-१२ उतारा
*सोसायटीचा कर्ज नसलेला दाखल
*परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचं प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट)
एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी इतकी कागदपत्रं पुरेशी आहेत. त्यापेक्षा जास्त कर्ज हवं असल्यास, वरील कागदपत्रांसह पुढील कागदपत्रं आवश्यक आहेत.
*शेतीचा नकाशा
*बेबाकी/हैसियत प्रमाणपत्र (अन्य कोणत्या बँकेचं कर्ज नसल्याचा दाखला)
*ओलीताचं प्रमाणपत्र
*चतु:सीमा प्रमाणपत्र
*कृषी उत्पन्नाचा दाखला
ही कागदपत्र विनामूल्य तलाठ्याकडून शेतकऱ्यांना मिळतात. याशिवाय शेतकऱ्यांना चार फोटोचीही गरज भासते.
दरवर्षी शेतीचा खर्च वाढत असतो. त्यामुळं दरवर्षी २० टक्के वाढीव पीककर्ज मिळतं. प्रत्येक पिकाला किती कर्ज द्यायचं याचे निकष ठरलेले असतात. कोरडवाहूला एकरी ८ हजार आणि ओलीताच्या शेतीला १६ हजाराचं पीककर्ज मिळतं. यंदा ज्या शेतकऱ्यांना जुनं पीककर्ज फेडता आलेलं नाही त्यांनी कर्जाचे हप्ते कमी करुन घेतले आहेत..तर ज्यांना तातडीचं कर्ज मिळवायचं आहे त्यांच्यासाठी कमी व्याजदरात सोने तारण कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.
यंदाच्या नवीन निर्णयानुसार शासनानं पीक कर्जावरील अडीच लाखांपर्यंत स्टँप ड्युटी माफ केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. सोबत २०१५ नंतरच्या पीककर्जाचं पुनर्गठणही केलं जात आहे.
पीककर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्ज घेतली आहेत त्यांनी बँकेत कर्ज परतफेडीची नोंद झाली आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी, ७-१२ आणि ८ अ च्या उताऱ्यावर कर्जाची नोंद व्यवस्थित झाली की नाही हे तपासून पाहावं. बँक किंवा सोसायटीकडून घेतलेलं कर्ज आणि व्याजाची आकारणी याची आकडेवारी जुळते की नाही याचीही तपासणी करुन घ्यावी. पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण ७ ते ८ दिवसात पीक कर्ज मंजूर होतं. त्यामुळं शेतकऱ्याला सावकाराच्या पाशात अडकावं लागत नाही.