नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार!
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने सारखीच आहे.राज्य सरकार या योजनेनुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातील.शेतकऱ्यांच्या खात्यावर दर तीन महिन्याला केंद्र सरकारकडून २ हजार रुपये जमा होतात.या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता राज्य सरकार देखील दर तीन महिन्याला २ हजार रुपये जमा करणार आहे.आता वर्षाला केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार ? याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती. मात्र, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.
या योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २६ ऑक्टोंबर रोजी शिर्डी येथील एका कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची उपस्थिती असणार आहे.राज्यात शेतकरी लाभार्थ्यांची संख्या एकूण ९३.०७ लाख इतकी आहे. यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्यातील एकूण ८५.६० लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता मिळाला होता. मात्र कृषी विभागाच्या अभिलेख तपासणी नंतर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या ९३.०७ लाख एवढी झाली आहे.