अझोला: एक हिरवळीचे खत…
अझोला:- ही एक पाणवनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून वापरतात.
अझोला हे ॲनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवीपद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. याचा उपयोग भात शेतीमध्ये केला जातो.
२) स्फुरद विरघळविणारे जैविक खत :-
नत्राच्या खालोखाल स्फुरद पिकांच्या प्रमुख अन्नद्रव्यांपैंकी एक आहे. रासायनिक खतांद्वारे पुरविलेल्या स्फुरदापैकी बरेचसे स्फुरद जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांमुळे स्थिर होऊन ते पाण्यात न विरघळणा-या (घट्ट) स्वरूपात परिवर्तीत होतात. असे घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळवून द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव करतात. पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपातील स्फुरदच पिकांची मुळे शोषून घेऊ शकतात. बुरशी वाणातील ॲस्परजीलस, अवामोरी आणि पेनिसिलीयम डीजीटॅटम तर अणुजीव प्रकारातील बॅसिलस पॉलीमीक्झा, बॅ. मेगाथेरियम आणि बॅ. स्ट्रायटा हे कार्यक्षम स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव आहेत. स्फुरद जीवाणू खत वापरले असता अधिक प्रमाणात स्फुरद शोषले जाते.
पिके :-
ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा, तसेच सर्व कडधान्य व फुलझाडे, इ.
३) पालाश विरघळविणारे जीवाणू :-
जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्यांची मुबलकता असूनही तो स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाशातून जैव रासायनिक क्रियांद्वारे पालाश मुक्त करतात व पिकाला उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्यांचे वहन होत नाही. हे जीवाणू पालाशची वहन क्रियाही सक्रीय करतात. फ्राटेरिया ऑरेंशिया हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाश जैव रासायनिक क्रियांद्वारे मुक्त करतात.
उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट सुक्ष्मजीव : शेतामध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असतात; त्यांपैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात. काहींना मात्र बरेच दिवस लागतात. शेतकरी शेतामध्ये ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, पालापाचोळा, पिकांची धाटे, इ. बहुदा जाळून टाकतात. परंतु त्यांपासून जर कंपोस्ट खत तयार केले, तर जवळजवळ त्याच्या उपलब्धतेएवढेच ओले कंपोस्ट खत मिळते. हेच खत शेतात वापरले तर या खतांद्वारे पिकांनी शोषून घेतलेल्या अन्नाशांपैकी काही अन्नांश जमिनीत मिसळले जातात. ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, यां सारखे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास जरी कठीण असले, तरी शास्त्रीयपद्धतीचा अवलंब केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते व अन्नद्रव्ययुक्त कंपोस्ट खत तयार होते.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून कंपोस्ट खत तयार करणारे सूक्ष्मजीव जेवढे अधिक कार्यक्षम तेवढी विघटनाची क्रिया जलद होते. म्हणून प्रयोगशाळेत उपलब्ध पदार्थांचे विघटन करण्यात कार्यक्षम ठरलेलेच सुक्ष्मजीव वापरावेत. हे सुक्ष्मजीव कंपोष्ट खत काडीकचऱ्याचे खड्डे भरताना एक किग्रॅ. प्रति एक टन या प्रमाणात वापरावे. कंपोस्ट खड्डे भरताना व नंतरही खड्ड्यातील पालापाचोळा, धसकटे, इ. सर्व सेंद्रिय पदार्थांवर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे; जेणेकरून कुजणारा पालापाचोळा ओला राहील, म्हणजे त्यामध्ये ५०-६०% पाणी राहील.
कंपोस्ट खड्डे भरताना ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरीचे धाटे याबरोबर भुईमुगाचे वेल, सोयाबीन, मूग, हरभरा, उडीद, घेवडा यांचा पालापाचोळा वापरल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. कुजण्यास कठीण असणाऱ्या या पदार्थांचे लहानलहान तुकडे केल्यास ते लवकर कुजून कंपोस्ट खत जलद तयार होते. कंपोस्ट खड्डे भरताना जनावरांच्या मलमुत्राचा उपलब्धतेनुसार वापर करावा.
ऊसाचे पाचट, गव्हाचे काड यांपासून कंपोस्ट तयार करताना प्रति टन १ ते २ किग्रॅ. युरिया वापरणे आवश्यक आहे. या वापरलेल्या युरिया खतामुळे कंपोस्ट खतातीत नत्राचे प्रमाण वाढते व कुजण्याची क्रिया जलद होते. कंपोस्ट खड्डे भरताना १ ते २ किग्रॅ.सुपर फॅास्फेट किंवा २ किग्रॅ. रॉक फॅास्फेट प्रति टन सेंद्रिय पदार्थांबरोबर वापरण्यास कंपोस्ट खत लवकर तयार होते. तयार होणाऱ्या कंपोस्ट खतात उपलब्ध कंपोस्ट स्फुरद्च्या प्रमाणातही वाढ होते.
जीवाणू खतांचे फायदे:-
जीवाणू खते सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचे संवर्धन होते. यांच्या वापरामुळे बियाणांची चांगली व लवकर उगवण होते. नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते. रासायनिक खतांची २० ते २५ % मात्रा कमी होउन उत्पादन खर्चात बचत होते व पीक उत्पादन १० ते १५ टक्क्याने वाढते. तसेच जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो आणि दुसडीच्या पिकांवर चांगला परिणाम होतो. जिरायत जमिनीत जीवाणू खतांचा चांगला फायदा होतो.
जीवाणू खताचे बियाण्यांवर अंतरक्षिकरण:-
पाकिटातील जीवाणू खत पुरेशा स्वच्छ पाण्यामध्ये मिसळून सर्व बियाण्यावर शिंपडून एकसारखा लेप बसेल आणि बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही अशा पद्धतीने लावावे. जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर पसरून सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी.
याशिवाय जीवाणू खताचे रोपांच्या मुळांवर अंतरक्षिकरण, ऊसाच्या कांड्यावर किंवा बाटाटयाच्या बेण्यावर, तसेच शेतात मातीत मिसळूनही ॲझोटोबॅक्टर खतांचा वापर करता येतो.
धन्यवाद…!🙏🏻🙏🏻