Rain Update : राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार☁⛈️
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तशातच हवामान विभागाने येत्या २४ तासात महाराष्ट्रातदेखील पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविली आहे. मिगजौम चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार आहे.तामिळनाडूसह केरळ आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात तयार होणारे चक्रीवादळ रविवारी दक्षिण आंध्र प्रदेश ओलांडून जाईल.आज सोमवारी, ४ डिसेंबर रोजी वादळाचा वेग वाढून ते तामिळनाडूलगतच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यात आहे.येत्या ३-४ दिवसात पावसासोबत दाट धुके आणि थंडीचे वातावरण राज्यात राहील. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित बहुतांश भागात हलक्या-मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकेल. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील काही भागात उद्या( मंगळवारी) आणि बुधवारी काही भागात पावसाचा अंदाज आहे.यवतमाळ, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तसेच बुधवारी यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.