वणी येथील अनाथलयातील कन्या च्या विवाहासाठी सकल मराठा परिवार टीमचे योगदान

0

वणी येथील अनाथलयातील कन्या च्या विवाहासाठी सकल मराठा परिवार टीमचे योगदान**


काजीसांगवीः (उत्तम आवारे)
जीवनात प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो . स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘घरटे काय चिमणी कावळे ही बांधतात आणि स्वतःचा संसार थाटतात. जे स्वतःसाठी जगतात त्यांच्यात आणि अशा प्राण्यांत काय फरक? पण जे समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी जगतात तेच खरे देशभक्त ‘याची प्रचिती आज वणी ता.दिंडोरी येथील वात्सल्य अनाथ आश्रमातील विवाह प्रसंगी आली.सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका एडमिन्सने आज एक आगळावेगळा आदर्श समाजापुढे घालून दिला.या परिवारातील ग्रुपच्या ॲडमिन्सने एक वेगळेच पुण्याईचे काम हाती घेतले आणि ते यशस्वीपणे पार पाडले. खरं सांगायचं झालं तर दिंडोरी तालुक्यातील वणी येथे असलेल्या वात्सल्य अनाथ आश्रम या ठिकाणी काही अनाथ मुलांना दिवाळीचे फराळ वाटप करावे म्हणून दिंडोरी तालुका सकल मराठा परिवार टीम दिवाळीपूर्वी दोन दिवस गोडधोड खाद्यपदार्थांची भलीमोठी भेट घेऊन या अनाथाश्रमात पोहोचली आणि तेथील अनाथ आश्रमाच्या संचालिका सौ. कौशल्या पवार यांनी’ सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका ‘एडमिन्सला विनंती केली की 17 डिसेंबर 2023 रोजी कु वनिता हिचे लग्न असल्याने आपण काही हातभार लावावा विनंती केली.क्षणाचाही विलंब न करता ग्रुपचे सर्व ॲडमिन्स यांनी विनंतीला आनंदाने होकार देत’ तुम्हाला जी मदत हवी ती सांगा’ असे सांगितले. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत या टीमने आपल्या संपर्कातील दानशूर मंडळींना या संदर्भात कल्पना दिली आणि भरभरून रक्कम विवाहासाठी जमा होऊ लागली. टीमचे प्रमुख श्री खंडू दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच जवळपास लग्नाचा जेवण खर्च व आवश्यक अशा लग्नासाठीच्या भेटवस्तू या मिळालेल्या देणगीतून खरेदी करून दिनांक 17 डिसेंबर 2023 रविवार रोजी ही टीम सहकुटुंब लग्नासाठी सकाळी लवकर विवाह स्थळी हजर झाली तसेच लग्नात काय हवे काय नको ते पाहत नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिले. आपल्या कन्येचेच लग्न आहे असे समजत स्वतः कन्यादान करत संपूर्ण जबाबदारी व तयारीने सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका टीमने काम पाहिले व ते यशस्वीरित्या पूर्ण केले. एका अनाथ कन्येलाही सुखाने संसार करण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने संपूर्ण टीमने अतिशय काळजीने , प्रेमाने व जबाबदारीने हा विवाह पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले, त्याबद्दल वात्सल्य अनाथ आश्रमाच्या संचालिका सौ.कौशल्या पवार , त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. या विवाहासाठी श्री खंडू दादा आहेर, दहेगाव येथील उपसरपंच श्री अजितदादा कड, श्री जितेंद्र पाटील, श्री दिगंबर कावळे ,योगेश देशमुख,श्री संजय शिर्के, सौ.प्रिया थेटे, सिंधुताई पगार, सौ जया ताई पाटील, सौ चैताली आहेर ,सौ. सारिका शिर्के आदि सकल मराठा परिवार सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »