आल्यापासून कसे होते सुंठ तयार,जाणून घ्या सुंठ तयार करण्याची पद्धत..!

0

आले सुकवून सुंठ तयार केले जाते. सुंठ हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे.

आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करून उन्हात वाळवले जातात. सुंठ तयार करण्यासाठी आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी.आले पूर्ण वाढलेले तसेच निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले जास्त तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.

सुंठ तयार करण्याच्या पद्धती

मलबार पद्धत :
मलबार पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवले जाते. त्यानंतर द्रावणातून काढून आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवले जाते. बंद खोलीत आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देतात.त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत १२ तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठवले जाते.सोडा व खास मिश्रण पद्धत :
सोडा व खास मिश्रण पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले स्वच्छ निवडून घेतले जातात. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घेतली जाते.नंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घेतले जाते. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घेवून या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरले जाते. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवल्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून नंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढाली जाता. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते.

आले वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. सुंठेत ‘उदरवातहारक’ गुण असल्याने जुलाबाच्या (विरेचन) औषधामध्ये ती मिसळतात. पचन संस्थेसाठी सुंठ उपयुक्त आहे.खूप सर्दी झाली असल्यास, नाक गळत असल्यास  सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर लावल्यास गुणकारी ठरतो.

सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे.
भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.’कावीळ’ या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते.ताकात सुंठेचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.सुंठ आणि वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने कृमी नष्ट होतात.आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखरेचे चूर्ण करून ते वरचेवर पितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »