पत्नीने रागाच्याभरात पतीच्या थेट डोळ्यात खुपसली कात्री… पत्नी झाली फरार
गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचारात सातत्याने वाढ होताना दिसतेय. किरकोळ कारणांवरून पती-पत्नींमध्ये वाद सुरू होतात. याच पर्यावसन हाणामारीत होतं. परिणामी दोघांपैकी कोणी एक जखमी होतं. उत्तर प्रदेशातून आता अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नीने थेट पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणाने घडला याची स्पष्टता नाही. वृत्तांनुसार वेगवेगळी कारणे समोर आली आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पतीने युट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी पत्नीकडून मोबाईल मागितला. मात्र, पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून या दोघांमध्ये वाद झाली. परिणामी रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. तर, इंडिया टीव्हीने दिलेल्या वृ्त्तानुसार, पतीने पत्नीकडून चहा मागितला. पत्नीने चहा देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाले. या वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे.
दरम्यान, हा वाद होण्याच्या तीन दिवस आधीच पत्नीने पतीविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचाराविरोधात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियांकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच, तिचा शोधही सुरू करण्यात आला आहे.