अरुणाचलच्या ३० ठिकाणांना चिनी नावे ; चीन सरकारची पुन्हा कुरापत,भारताने फेटाळला दावा
चीनने मागील काही दिवसांत अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावे केल्याने हा मुद्दा तापला असतानाच चीनने आज या प्रदेशातील तीस विविध ठिकाणांसाठी चिनी नावे जाहीर केली आहेत.
बीजिंग : चीनने मागील काही दिवसांत अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावे केल्याने हा मुद्दा तापला असतानाच चीनने आज या प्रदेशातील तीस विविध ठिकाणांसाठी चिनी नावे जाहीर केली आहेत. चिनी नावे जाहीर करत या प्रदेशावर दावा सांगणारी चीनची ही चौथी यादी आहे. अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा भारताने वारंवार फेटाळला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यापासून हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या दौऱ्यावर चीन सरकारने आणि नंतर त्यांच्या सैन्यदलानेही आक्षेप घेतला होता. भारताने निषेध व्यक्त करूनही चीनने वारंवार हा मुद्दा उकरून काढला आहे.
आज चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशमधील, ज्याला चीनने ‘झँगनान’ असे नाव दिले आहे, तीस ठिकाणांची प्रमाणित नावे असलेली यादी प्रसिद्ध केली. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचाच एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. या नावांची अंमलबजावणी एक मे पासून होणार असून त्यासाठी चीनने त्यांच्याकडील १३ व्या कलमाचा आधार घेतला आहे.
चीनने यापूर्वी २०१७ मध्ये पहिली यादी प्रसिद्ध करत अरुणाचलमधील सहा ठिकाणांची चिनी नावे जाहीर केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ आणि २०२३ मध्ये ११ ठिकाणांची नावे त्यांनी प्रसिद्ध केली होती. चीनमधील सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजात याच नावांचा वापर करावा, असे आदेश चीन सरकारने प्रशासनाला दिले आहेत.