Crop Management: सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे नियंत्रण करण्यासाठी करा हे सोपे उपाय..

0

सध्या होणारा सततचा रिमझीम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकावर खोडमाशी चा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.खोडमाशीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा?

सोयाबीनच्या पिकात खोडमाशीचा प्रादुर्भाव कधीही होऊ शकतो, खासकरून पिक सुरू झाल्यावर. जर तुम्हाला असे दिसले की, झाडाचा शेंडा सुकून खाली झुकला आहे, तर ते खोडमाशीच्या प्रादुर्भावाचे लक्षण असू शकते.झाडाचा शेंडा खाली झुकून सुकणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय, झाडाच्या खोडातून पिवळी अळी दिसणे आणि पानांवर अळीचे नुकसान दिसणे हीही लक्षणे आहेत. मात्र, झाड मोठे झाल्यावर हा किडा झाडात शिरला तर त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. अशा वेळी फक्त झाडाच्या खोडावर एक छिद्र दिसू शकते. या किड्यामुळे झाड हिरवे राहूनही शेंगा भरत नाहीत. जर या किड्यावर नियंत्रण ठेवले नाही तर उत्पादनात ५०% पर्यंत घट होऊ शकते.

शेतकऱ्यांना पिकांवरील कीड आणि रोगांचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती देण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना करत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सोयाबीन पिकावर होणाऱ्या खोडमाशीच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.

खोडमाशी: जर तुमच्या सोयाबीनच्या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला तर क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. हे कीटकनाशक वापरा. हे कीटकनाशक १० लिटर पाण्यात २.५ मिली प्रमाणात मिसळून फवारणी करावी. पावसाची शक्यता असल्यास फवारणी करू नये.
पाने खाणारी अळी: या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यास हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन (कामगंध) सापळे लावून या अळीला आकर्षित करून नियंत्रणात ठेवता येते. जर या अळीचा प्रादुर्भाव झालाच तर ५ टक्के निंबोळीचा अर्क किंवा आर्थिक नुकसान होण्याच्या टप्प्यावर पोहोचल्यावर प्रोफेनोफॉस ५० ईसी हे कीटकनाशक वापरा. हे कीटकनाशक १० लिटर पाण्यात २० मिली प्रमाणात मिसळून फवारणी करावी. पावसाची शक्यता असल्यास फवारणी करू नये.

सोयाबीन पिकांचे एकात्मिक व्यवस्थापन:

वाणांची निवड: काही विशिष्ट प्रकारचे सोयाबीन या रोगाला अधिक बळी पडतात. म्हणून, आपल्या शेतात अशा प्रकारचे वाण लावू नयेत. आपल्या भागातील कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले रोगप्रतिकारक वाणच लावले पाहिजेत.

पांढऱ्या माशीचे नियंत्रण: पांढरी माशी हा पिवळा मोझेंक रोग पसरवणारा एक कीटक आहे. या कीटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावले पाहिजेत. हे सापळे पांढऱ्या माशांना आकर्षित करतात आणि त्यांना अडकवून ठेवतात.

निंबोळी अर्काचा वापर: निंबोळीचा अर्क एक नैसर्गिक कीटकनाशक आहे. हा अर्क पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो.


पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »