सर्वसाधारपणे आपण असा विचार करू कि एखाद्या पिकाला आपण बाहेरून रासायनिक अथवा सेंद्रिय खत टाकले, वरून पाणी दिले किंवा पाऊस पडला कि ते खत पाण्यात विरघळेल, पिकाची मुळे ते पाण्यात विरघळलेल्या खताचे द्रावण शोषून घेतील आणि पिकाच्या शरीरात जाऊन त्या पिकाला मिळेल. परंतु भुसूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास केला असता या सगळ्याचा उलघडा डोळ्यासमोर येतो. कोल्हापूरचे शास्त्रज्ञ शेतकरी श्री प्रताप चिपळूणकर यांनी *जमिनीची सुपीकता* या पुस्तकात याची मांडणी केली आहे.
तर पीक नेमकं अन्न खाते कसे?
पिकाला आवश्यक असलेली अन्नद्रव्ये खताच्या स्वरूपात बाहेरून जमिनीत टाकल्यानंतर वनस्पतीला त्याच स्वरूपात खाता येत नाहीत. पहिल्यांदा त्या खताचे जमिनीत स्थिरीकरण होते. स्थिरीकरण म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर. या रूपांतरामुळे अन्नद्रव्ये जमिनीत सुरक्षित साठवली जातात. हे स्थिरीकरण होणे अत्यंत आवश्यक असते.
प्रथम *स्थिरीकरण* (Immobilization) झाले तरच पुढे त्या खताचे *उपलब्धीकरण* (Mineralisation) होणे शक्य आहे. यासाठी जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत त्यावर अनेक प्रक्रिया होतात. त्यानंतरच गरजेनुसार ही अन्नद्रव्ये पिकाला खाण्याच्या अवस्थेत येतात. जमिनीमध्ये सूक्ष्मीजीवांचे वेगवगळे गट असतात. प्रत्येक गटाचे कार्य वेगवेगळे असते. त्यापॆकी जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवणारा गट व पिकाला अन्नपुरवठा करणारा गट यांचा पीक अन्न कसे खाते याच्याशी थेट संबंध आहे. *शेतकऱ्याने शेतात टाकलेले रासायनिक अथवा सेंद्रिय खत हे पिकाला सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय खाता येत नाही.* टाकलेले खत व पिकाची मुळे यामध्ये *सूक्ष्मजीव* हा मध्यस्थी/दुवा आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. बाल्य अवस्था, वाढीची अवस्था आणि पक्वतेची अस्वथा. या प्रत्येक अवस्थेमध्ये पिकाच्या गरजा वेगवगळ्या असतात त्याप्रमाणे पिकाला वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. त्यामध्ये बाल्य अवस्थेत खताची गरज अत्यल्प असते, वाढीच्या अवस्थेत मात्र ती खूप जास्त असते तर प्रौढ/पक्वतेच्या अस्वस्थेत ती गरज पुन्हा कमी होते. या प्रत्येक अवस्थेत पिकाला खताची गरज भागवण्यासाठी वेगवेगळी जिवाणूसृष्टी काम करत असते. या प्रत्येक अस्वस्थेत पीक/झाड/रोप आपल्या मुळापाशी आपल्याला पाहिजे असलेले अन्नद्रव्याचे द्रावण सूक्ष्मीजीवांच्या मदतीने करून घेते. सूक्ष्मजीव व वाढणारी वनस्पती यांच्यामध्ये अंतर्गत सुसंवाद होऊन पीक त्याच्या गरजेनुसार आपल्या मुळांवाटे द्राव *(Root Exudes)* सोडून सूक्ष्मजीवांकडे उपलब्ध खताची मागणी करते. खताच्या मागणीचा संदेश मिळाल्यावर सूक्ष्मजीव पिकाच्या गरजेनुसार स्थिर साठ्यातून उपलब्ध (म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत) साठ्यात रूपांतर करतात. आपण बाहेरून टाकलेल्या खताचे (नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, इत्यादी) पिकाला उपलब्ध अवस्थेत रूपांतर करून सूक्ष्मजीव पिकाच्या अन्नाचा पुरवठा करत असतात. अशा पद्धतीने एखाद्या *पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन* होत असते.
आता जमिनी नांगरून पारंपारिक पद्धतीने आपण शेती करत असू तर त्या जमिनीत नांगरणीमुळे सूक्ष्मजीवांचा ऱ्हास झालेला असतो. त्याचप्रमाणे जमिनीत आपण कोणताच पदार्थ जागेलाच कुजवत नाही. अगोदरच्या पिकाची शिल्लक राहिलेले अवशेष, मुळे, धसकटे, गोळा करून जाळून नष्ट करून शेत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा शेतात वारंवार खते वापरावी लागतात. तरी सुद्धा पीक जसे यायला पाहिजे तसे जोमदार येत नाही. *SRT शून्य मशागत तंत्रामध्ये* जमिनी न नांगरल्यामुळे सूक्ष्मजीवांना अनुकूल वातावरण निर्मिती तयार होते. अगोदरच्या पिकाची मुळे व शिल्लक मृत अवशेष जागेलाच कुजण्यासाठी ठेवल्याने सेंद्रीय पदार्थ कुजवणाऱ्या गटाला मुबलक काम असते. त्यामुळे पिकाच्या वाढीनुसार व गरजेनुसार बाहेरून जे काही खत दिले जाते त्या खताचे पिकाला उपलब्ध अवस्थेत रूपांतरण करायचे काम अन्नपुवठा करणाऱ्या सूक्ष्मजीवांद्वारे अतिशय सुलभ होते. म्हणून SRT शून्य मशागत तंत्रामध्ये खताचे प्रमाण फार कमी वापरावे लागते. कमी खतामध्ये सुद्धा पिकाची गरज भागली जाते आणि पिके जोमदार येऊन उत्पादनात दुपटीने, तिपटीने झालेली वाढ SRT शेतकऱ्यांकडे दिसून येते.