*भाग 1* 

*शेणखत :* 
जनावरांच्या गोठ्यातून मिळणाऱ्या शेण, जनावरांना आंथरलेले गवत, टाकाऊ चारा, मूत्र इ. अपशिष्ट (टाकाऊ) पदार्थांपासून शेणखत तयार केले जाते. काही वेळा मूत्र एखाद्या टाकीत गोळा करून नंतर इतर पदार्थांत मिसळले जाते किंवा ते शोषून घेतले जाईल अशा पदार्थांचे आच्छादन जनावरांच्या खाली घालण्यात येते. ह्या सर्व पदार्थांचे ढीग करून ते कुजवितात. अशा ढिगामध्ये सूक्ष्मजैविक क्रिया जोरदार होऊन उष्णता निर्माण होते. तसेच बरेच उष्णतास्नेही (ज्यांना वाढीसाठी ४५० ते ६५० से. तापमान लागते असे) सूक्ष्मजंतू, ॲक्टिनोमायसीटीज व इतर कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) तयार होतात. अपशिष्टात असणाऱ्या तणांच्या बियांचा ह्या उष्णतेमुळे नाश होतो. शेणखत पूर्वापार पद्धतीने तयार केले, तर त्यात पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. परंतु ते काळजीपूर्वक तयार केले, तर त्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाण तिपटीने देखील वाढू शकते.
शेणखतातील नायट्रोजनाचे प्रमाण जास्तीत जास्त ठेवण्याकडे व सूक्ष्मजैविक अपघटनामुळे त्याचा अमोनियाच्या स्वरूपातील क्षय कमी होण्याकडे लक्ष देणे जरूर असते. मूत्र सामान्यतः लवकर अपघटित होते. सुपरफॉस्फेटाच्या वापराने या क्षयाचे प्रमाण कमी होते. फक्त चांगले कुजलेले शेणखत शेतीसाठी वापरले जाते. असे खत पावसापासून सुरक्षित व उत्तम जमीन केलेल्या बंदिस्त व कमी आर्द्रता असलेल्या जागेत ठेवले जाते. कृत्रिम खतांच्या मानाने भारतात शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
शेणखत तयार करण्यासाठी गोठ्यातून मिळणारे सर्व पदार्थ ०·९ X ०·९  X ४·५ मी. मापाच्या खड्ड्यात पसरतात. नायट्रोजन अमोनियाच्या रूपात निघून जाऊ नये म्हणून खड्ड्यात त्यावर सुपरफॉस्फेटाचा एक थर देतात किंवा गोठ्यातील गटारात व टाक्यांत टाकतात. खड्ड्यातील सर्व पदार्थांची उंची जमिनीच्या वर अर्धा मी. झाल्यावर त्यावर मातीचा जाड थर देतात. त्यामुळे आत ओल राहते व माश्यांचा उपद्रव होत नाही. कुजण्याची क्रिया ३ ते ५ महिन्यांत पूर्ण होते. पण ह्या क्रियेत २५ –३० % सेंद्रीय पदार्थांचा ऑक्सिडीकरणाने [ →  ऑक्सिडीभवन]  नाश होतो. हे खत गडद खाकी रंगाचे, चूर्णरूपी व वासहीन असते. गोबर वायू प्रक्रियेने शेणातील वायू काढून घेतल्यावर उरलेल्या पदार्थात भरपूर नायट्रोजन असतो व ते खत म्हणून वापरण्यास फारच चांगले असते [→ गोबर वायु].
कंपोस्ट : वनस्पती व प्राणी यांची अपशिष्टे व्यवस्थित मिसळून व अपघटित करून मिळालेल्या खत मिश्रणास कंपोस्ट असे म्हणतात. दिसावयास ते शेणखतासारखे दिसते. कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांच्या संघटनेवर त्याचे पोषण मूल्य अवलंबून असते. कार्बोहायड्रेटांच्या तुलनेने कंपोस्टात नायट्रोजनाचे प्रमाण कमी असते म्हणून अकार्बनी नायट्रोजनयुक्त व फॉस्फेटी खतांबरोबर मिसळून ते वापरले जाते. शेणखत भरपूर प्रमाणात मिळू शकत नाही त्या ठिकाणी कंपोस्टांचा उपयोग करण्यात येतो. पाने, पेंढा, गवत, तण, कोंडा, टरफले, तृणधान्याच्या पिकांची ताटे, घरातील केरकचरा व काहीवेळा जनावरांचे मलमूत्र अशा पदार्थांचा खेड्यांतून कंपोस्टसाठी वापर करतात, तर शहरांतून मैला व रस्त्यावरील केरकचरा त्यासाठी वापरतात.
अपशिष्टाचे सूक्ष्मजैविक क्रियेने अपघटन होऊन उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे तापमान १५० –२७० सें. पर्यंत चढते. सुरुवातीला अपशिष्टात जरूर तितका आवश्यक ओलसरपणा व खेळती हवा असणे आवश्यक असते. त्यामुळे माश्यांच्या अळ्या इत्यादींचा नाश होतो. तणांच्या बियांवरही परिणाम होतो. मूळ पदार्थांतील नायट्रोजनाच्या मोठ्या भागाचे व फॉस्फरसाच्या काही भागाचे वनस्पती घेऊ शकतील अशा स्वरूपात रूपांतर होते.
सर्व अपशिष्ट शेणखताप्रमाणेच लांब चरात थर करून भरतात. कुजण्याची क्रिया चांगली व्हावी म्हणून प्रत्येक थरावर शेणकाला पसरणे आवश्यक असते. नायट्रोजन व चरातील आर्द्रता कमी होऊ नये तसेच दुर्गंधी व माशा यांपासून त्रास होऊ नये म्हणून चर पूर्ण भरल्यावर त्यावर मातीचा थर टाकतात. अपशिष्टात नायट्रोजनयुक्त पदार्थ कमी असल्यास ढिगात सूक्ष्मजैविक क्रिया घडण्यासाठी जनावरांचे मूत्र किंवा नायट्रोजनयुक्त संयुगे मिसळतात. अगोदर कुजलेले कंपोस्ट किंवा बागेतील जमिनीवरील माती काही वेळा मिसळतात. अम्लता वाढू नये म्हणून चुना मिसळतात. सर्व ढीग न हालविता ३-४ आठवडे तसाच ठेवतात. नंतर तो ढीग वरखाली हालवून त्याचा परत ढीग करतात. कंपोस्ट ३–६ महिन्यांत तयार होते.
शहरातील केरकचरा व अपशिष्ट यांपासून खंदकात किंवा खड्ड्यात कंपोस्ट तयार करतात. जलप्रवाहात आणि दलदलीत वाढणाऱ्या त्रासदायक हायसिंथ तणापासून कंपोस्ट तयार करता येते. याकरिता हे तण गोळा करतात, उन्हात अंशत: वाळवतात व त्यात जनावरांचे मलमूत्र मिसळतात.

शेणखत

हिरवे खत : जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठराविक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात. ह्यासच हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच त्यामुळे जमिनीच्या संरचनेत बदल होतो, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, पाण्याचा निचरा होण्यास व जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. शिंबावंत वनस्पतींच्या पिकांमुळे लागोपाठ घेण्यात येणाऱ्या पिकांना लागणारा नायट्रोजनाचा जादा पुरवठा होतो.
हिरव्या खतासाठी शिंबावंत वनस्पती व इतर वनस्पती किंवा दोन प्रकारच्या वनस्पती वापरतात. भारतात याकरिता सामान्यत: सनताग, रानशेवरी (धैंचा), उडीद, मुगवेल, गवार, तूर, कुळीथ (हुलगा), नीळ, मसूर, वाटाणा, शेंजी, बरसीम, मेथी, लाख, ग्लिरिसिडिया इ. वनस्पती वापरतात. काही वेळा पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी व जमिनीची धूप कमी करण्यासाठी लावलेल्या पिकांचा वापर हिरव्या खतांसाठी करतात. जमिनीत गाडण्याच्या वेळी पीक रसदार असावे व जमिनीत भरपूर ओल असावी म्हणजे ते चांगले कुजते. गाडल्यापासून ४–६ आठवड्यांनंतर दुसरे पीक लावतात. अशा रीतीने दर हेक्टरी १२–१५ टन हिरवे खत जमिनीत गाडले जाते व त्यामुळे ४५–९० किग्रॅ. नायट्रोजन, तसेच इतर पोषक द्रव्ये जमिनीला मिळतात.
ज्या प्रदेशात भरपूर आर्द्रता असते अशा प्रदेशातील जमिनीतच हिरवे खत करण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी हिवाळ्यातील कडक थंडी पिकांना मानवत नाही अशा ठिकाणी हिवाळ्यात हिरवे खत करण्यात येते. समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील फळबागांत व उपवनांत हिरवे खत करतात. भात, ऊस, कापूस व इतर पिकांसाठी भारतात नेहमी हिरवे खत वापरले जाते. समुद्रकिनारी आवळी व आंबा ह्यांची पाने हिरव्या खतासाठी वापरतात.
सोनखत : जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी चीनमध्ये प्राचीन काळापासून मानवी मलमूत्र वापरले जात आहे. तेथील जमिनींना देण्यात येणाऱ्या पोषक द्रव्यांपैकी १५% मलमूत्रापासून मिळवितात असा अंदाज आहे. जपानमध्येही मलमूत्राचा खत म्हणून उपयोग करण्यात येतो. शेणखत किंवा कंपोस्ट यांपेक्षा सोनखतातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते. भारतात मैला गोळा करून तो खड्ड्यात किंव खंदकात टाकतात व त्यावर कोळसा, लाकडाचा भुस्सा, माती व कचरा टाकून ते झाकतात. सोनखतातील अवायुजीवी (मुक्त ऑक्सिजनाच्या अभावामुळे सूक्ष्मजंतूंद्वारे होणाऱ्या अपूर्ण स्वरूपातील) अपघटनाने हायड्रोजन सल्फाइडासारखे दुर्गंधीयुक्त वायू निर्माण होतात. तसेच नायट्रोजनही मोठ्या प्रमाणात निघून जातो. सोनखतामुळे माश्यांची वाढ होते. याकरिता सोनखत माश्यांपासून सुरक्षित राखणे, पिण्याच्या पाणी पुरवठ्यापासून ते दूर ठेवणे, प्रत्यक्ष उपयोगात आणण्यापूर्वी त्यातील रोगकारक जीवजंतूंचा नाश करणे इ. उपाय योजणे आवश्यक् असते.

ढेचा 

🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »