गहू पीक लागवडीमधील महत्त्वाची सूत्रे

0

 

गहू पिकाविषयी अधिक माहिती

गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे.
 
जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
1964-65 मधील 122.6 लाख मे. टन उत्पादनापासून 2013-14 च्या रब्बी हंगामात 959.1 लाख मे. टनांपर्यंत पोचले आहे. आपला देश गहू उत्पादनात स्वयंपूर्ण होऊन निर्यातही करू लागला आहे. गहू उत्पादनात भारताने अमेरिकेलासुद्धा मागे टाकले आहे.
मात्र, भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रतिहेक्‍टरी गहू उत्पादकता कमी आहे. 2013-14 च्या रब्बी हंगामात सरासरी प्रतिहेक्‍टरी गव्हाचे उत्पादन हे भारत देशाचे 30.61 क्विंटल, तर महाराष्ट्र राज्याचे 15.21 क्विंटल होते.
गहू पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात उत्तर प्रदेश, तर प्रतिहेक्‍टरी उत्पादकतेत पंजाबचे स्थान नेहमीच अव्वल राहिले आहे.
शास्त्रीयदृष्ट्या बागायती वेळेवर लागवड केलेल्या गव्हाचे 45 ते 50 क्विंटल, बागायती उशिरा लागवडीत 35 ते 40 क्विंटल, तर जिरायती लागवड केलेल्या गव्हाचे 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे सरासरी प्रतिहेक्‍टरी गव्हाचे उत्पादन हे फारच कमी आहे. 
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, हलक्‍या जमिनीत लागवड, उत्पादनक्षम जातींची मर्यादित उपलब्धता, हवामानातील प्रतिकूलता, संवेदनशील अवस्थेत पाण्याची अनुलब्धता, खतांचा असंतुलित वापर यामुळे सरासरी प्रतिहेक्‍टरी गव्हाची उत्पादकता भारताच्या तुलनेत कमी राहते. गहू लागवडीत पुढील बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास उत्पादकता वाढवणे शक्‍य आहे.
 
जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन गहू पिकास मानवते. बागायती गव्हासाठी भारी व खोल जमीन निवडावी.
 
 
मध्यम प्रकारच्या जमिनीत रासायनिक खतांसोबत भरखते जमिनीत मिसळल्यास गव्हाचे चांगले उत्पादन घेता येते.
जिरायत गहू घेत असताना तो भारी जमिनीतच घ्यावा म्हणजे पावसाच्या पाण्याचा ओलावा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो व अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
शक्‍यतो हलक्‍या जमिनीत गव्हाची लागवड करणे टाळावे.


 

हवामान
थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान गहू पिकासाठी उपयुक्त असते.
 
पूर्वमशागत
गहू पिकाच्या मुळ्या 60 ते 65 सें.मी. खोलवर जात असल्याने, चांगली भुसभुशीत जमीन असणे गरजेचे असते. 
– खरीप पीककाढणीनंतर जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोलवर नांगरट करावी. 
ृ- हेक्‍टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात.


 

पेरणीची वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायतीची उशिरा पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान करता येते; मात्र, उशीर झालेल्या प्रत्येक पंधरवड्यानंतर उत्पादनात 2.5 क्विंटल घट येते. उशिरा पेरणी केलेले पीक तांबेरा या घातक रोगास बळी पडून जास्त नुकसान होते. – 5 डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाचे उत्पादन फायदेशीर ठरत नाही. म्हणून गव्हाची लागवड करताना पेरणीची योग्य वेळ साधणे अत्यंत गरजेचे असते.
 
योग्य जातींची निवड
– महाराष्ट्रातील बागायती वेळेवर पेरणी (1 ते 15 नोव्हेंबर), तसेच उशिरा पेरणी (16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर), पेरणीसाठी सरबती गव्हाच्या “समाधान’ (एनआयएडब्ल्यू 1994) या नवीन वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. 
आ) बागायती उशिरा पेरणीसाठी – एनआयएडब्ल्यू 34 (बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम, दाणे मध्यम व आकर्षक, चपातीसाठी उत्तम, प्रतिहेक्‍टरी उत्पादनक्षमता – 35 ते 40 क्विंटल).
हेक्‍टरी बियाणे – हेक्‍टरी 20 ते 22 लाख इतकी रोपांची संख्या शेतात असणे आवश्‍यक असते. रोपांचे हे प्रमाण राखण्यासाठी बागायती वेळेवर पेरणी ः 100 ते 125 किलो, तर उशिरा पेरणी – 125 ते 150 किलो बियाणे लागते.
 
बीजप्रक्रिया
कॅप्टन किंवा थायरम3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम पीएसबी या जिवाणुसंवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते.


 

पेरणी
जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करावी.
पेरणी शक्‍यतो दक्षिणोत्तर करावी. बागायत पिकाची वेळेवर पेरणी दोन ओळींत 22.5 सें.मी. व उशिरा पेरणी 18 सें.मी. अंतर ठेवून करावी. – गव्हाची पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सें.मी. खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
जिरायती गव्हाची पेरणी दोन ओळींत 20 सें.मी. अंतर ठेवून करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित जमिनीत दबून मातीने झाकले जाते.
जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पडावेत.


 

खत व्यवस्थापन
अ) बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत द्यावी. 
 
आ) बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी हेक्‍टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावी. 
 
इ) जिरायती गव्हासाठी हेक्‍टरी 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद पेरून द्यावे. याशिवाय 2 टक्के युरियाच्या द्रावणाची फवारणी दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे 65 ते 70 दिवसांनी करावी. या फवारणीमुळे दाण्याचा आकार वाढतो, वजन वाढते व दाण्यास चकाकी प्राप्त होते.
 
पाण्याचे नियोजन
साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात, मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. 
गहू पिकाच्या पाण्याच्या पाळीसाठी संवदेनशील अवस्था. पेरणीनंतर दिवस ः 
1) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था – 18 ते 21 
2) कांडी धरण्याची अवस्था – 40 ते 45 
3) फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था – 60 ते 65 
4) दाणे भरण्याची अवस्था – 80 ते 85
 
पाण्याची उपलब्धता कमी असल्यास,
1) केवळ एकच पाणी देणे शक्‍य असल्यास – पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
2) दोन पाणी देणे शक्‍य असल्यास – पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी व दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. 
3) तीन पाणी देणे शक्‍य असल्यास – पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी व दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. 
अपुरा पाणीपुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी शक्‍य आहे अशा क्षेत्रात शक्‍यतो पंचवटी (एनआयडीडब्ल्यू 15) हा गव्हाचा वाण पेरावा.
 
आंतरमशागत
तणांचे नियंत्रण करण्यासोबतच आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 
गव्हात चांदवेल, हरळी, दुधाणी, लव्हाळा इत्यादी तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. त्याकरिता एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी.
वरीलप्रमाणे बागायती गव्हाची वेळेवर लागवड केल्यास हेक्‍टरी 45 ते 50 क्विंटल, बागायती गव्हाची उशिरा लागवड केल्यास हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटल व जिरायत लागवड केल्यास हेक्‍टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.


🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »