सोयाबीन -सद्यस्थिती, भविष्य, समस्या आणि संधी

0

सोयाबीन -सद्यस्थिती, भविष्य, समस्या आणि संधीयावर्षी सोयाबीन पिकाणे आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मैदान गाजवले. खाद्य तेलाचे दर, मांस, अंडी, ई. उत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, सोयाबीन दर कमी करण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केल्याचे दिसते. पहिले रिफाइंड आणि कच्या पाम तेलाच्या आणि मग सर्वच तेलांच्या आयात शुल्कात २-३ वेळा कपात केली. मग साठेबाजी करण्यास प्रतिबंध घालत साठे जाहीर करण्याचे आदेश दिले. पुढे सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड, कच्या पाम तेलावर वायदे बंदी लावण्यात आली आणि सोयापेंड जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकत त्यावरही साठा मर्यादा लादली गेली. पण एवढे सगळे करूनही शेतकऱ्यांची एकी, टप्या-टप्याने सोयाबीन विक्रीचा निर्णय यामुळे दर बराच काळ ६००० ते ६५०० रु प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिले आहेत. 
मागील वर्षी हंगामात सरासरी ४५०० रु क्विंटल असणारे सोयाबीन, असे काय झाले कि सोयाबीनला सोन्याचे दिवस आलेत? हे तात्पुरते आहे कि दीर्घकाळ सोयाबीनचे महत्व वाढत जाणार आहे? यात काय अडचणी आहेत? आपण काय करायला हवे म्हणजे याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळवता येत राहील याचे विवेचन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आज करत आहे. 
मागणी का वाढली?
२०५० साली जगाची लोकसंख्या १० अब्ज होण्याची शक्यता आहे आणि यासर्वांची अन्नाची गरज विशेषतः प्रथिनांची गरज भागवण्यासाठी सोयाबीन पिकाचे महत्व वाढत जाणार आहे. खाद्य तेलाची गरज पूर्ण करण्यासाठीसुद्धा सोयाबीन स्वस्त, चांगला पर्याय आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील अभ्यासकांनी हे सिद्ध केले आहे कि ज्या देशाची परचेसिंग पॉवर (क्रयशक्ती) वाढली त्या देशात मांस खाण्याचे प्रमाण वाढत जाते. दिवसेंदिवस अश्या प्रकारे मांसयुक्त खाद्याची मागणी वाढत जाणार आहे. हे मांस कोंबडीचे असो (चिकन) कि डुकराचे (पोर्क जे विशेषतः चीन, युरोपात मोठ्या प्रमाणात खालले जाते) यांच्यासाठी पशूखाद्य बनते ते मुख्यतः सोयापेंडी पासून. त्यामुळे जितके मांसाहार करणारे वाढतील तितकी सोयाबीनची मागणी वाढत राहील. म्हणजे इथेही सोयाबीन उत्पादकासाठी आनंदाची बातमी आहे. 
सोयाबीन प्रथिनांनी समृद्ध आहे (जवळपास ४०%) परंतु त्यात फायटेट्स, टॅनिन, ट्रिप्सिन इनहिबिटर आणि ऑलिगोसॅकराइड्ससह काही अॅंटी न्यूट्रिशनल फॅक्टर असतात, त्यामुळे ते थेट खाता येत नव्हते पण आता ग्रीन व्हेजिटेबल सोयाबीन स्वरूपात नवीन वाण विकसित झाल्या आहेत ज्यामुळे ते थेट तुरीच्या हिरव्या शेंगा खाण्या सारखे सुद्धा वापरता येईल. यामध्यमातून त्यातील पूर्ण प्रथिने पचवणे शक्य आहे का या बाबत अद्याप काही मत-मतांतरे आहेत मात्र सोयाबीन हिरवे किंवा प्रक्रिया न करता खाता येण्याजोगे होण्यास ही योग्य सुरुवात आहे. त्यामुळे याची मागणी नक्की वाढेल. 
शाकाहार करणारे सर्वजण घराबाहेर जेवताना मुख्यतः पनीर खातात पण दुधाच्या पनीर एवजी आता सोया टोफू ची मागणी वाढती आहे, कारण एकतर हे स्वस्त पडते आणि आता त्यातील नव्या वानांमुळे पनीर आणि टोफू मधील अंतर ओळखणे कठीण झाले आहे. तसेच लॅक्टोज अलर्जी असणाऱ्यांसाठी सोया टोफू उपयुक्त आहे. 
भारतीय सोयाबीन 
भारतीय सोयाबीन उत्पादकासाठी आणखी एक चांगली बाब म्हणजे अद्याप भारतात जीएम सोयाबीन लागवडीस परवानगी नाही आणि जगभरातील प्रमुख देश जीएम सोयाबीन पेरणी करतात म्हणजे भारत हा नॉन जीएम सोयाबीन उत्पादक एक प्रमुख देश आहे. जगभरातील जागरूक ग्राहक आता नॉन-जीएम, सेंद्रिय उत्पादने मागणी वाढवत आहेत. याचाच परिणाम म्हणजे अमेरिकेत सेंद्रिय अंडी महागली आहेत. अमेरिकेत कोबड्यांना खायला वापरल्या जाणार्‍या सेंद्रिय सोया मीलसाठी अमेरिकाही दक्षिण आशियाई राष्ट्रावर ४०% पेक्षा जास्त अवलंबन आहे. या अर्थानेही भारतीय सोयाबीन भाव खात राहण्यास संधी आहे.
 जैव इंधनाची
जैव इंधनाची (बायो-डिजेल) मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि यासाठी सुद्धा सोयाबीनचा वापर वाढत आहे. म्हणजे सोया तेल थेट पेट्रोल/डिजेल प्रमाणे इंधन म्हणून वापरले जात नाही तर बायोडिझेल उत्पादनाची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे वनस्पती तेल किंवा प्राण्यांच्या चरबीची मिथेनॉल किंवा इथेनॉलसह सोडियम हायड्रॉक्साईडच्या उपस्थितीत प्रक्रिया केली जाते. यातील ट्रान्सस्टेरिफिकेशन रिअॅक्शनमधून मिथाइल किंवा इथाइल ईस्टर (बायोडीझेल) आणि ग्लिसरीनचे ऊप-ऊत्पादन मिळते. अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बायोडिझेलसाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन तेल सध्या बायोडिझेलच्या उत्पादनासाठी एक प्रमुख फीडस्टॉक आहे. पुढे तिथे युनायटेड सोयाबीन बोर्ड आणि त्यानंतर राष्ट्रीय बायोडिझेल बोर्डच्या निर्मितीद्वारे यासाठी भरीव कामगिरी सुरू आहे. एकंदरीत सोयाबीन पिकाची भविष्यातील मागणी वाढत जाणार आहे हे ऊघड आहे. 
सध्या दर चढे आहेत कारण जागतिक बाजारात तेजी आहे, ला-निनामुळे प्रमुख उत्पादक देशांचे उत्पादन घटले आहे किंवा उशिरा निघतेय, जहाजांच्या अडचणीमुळे निर्यात मूल्यसाखळी विस्कळीत आहे, आणि भारतीय शेतकऱ्यांनी सुज्ञ निर्णय घेत टप्या-टप्याने सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे, इत्यादि प्रमुख कारणे होत. 
सोयाबीन शेतीच्या अडचणी:
याचे भविष्य लक्षात घेत बदलत्या हवामानास पूरक ठरत अधिक उत्पादन देणाऱ्या, पावसाचा खंड तसेच अतिवृष्टीजन्य परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या, कीड-रोगास प्रतिकारक्षम बियान्यांचे वाण उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. एकरी किमान १५ ते २० क्विंटल उत्पादन देणारे सोयाबीन वाण आवश्यक आहे. एकटे बियाणे हा घटक उत्पादकतेवर ५% ते ३२% पर्यंत परिणाम करू शकतो असे वाचनात आहे. इथे दूसरा मुद्दा लागू होतो या अश्या बियान्यांच्या सहज, मुबलक व योग्य दरात उपलब्धतेचा. सध्या सोशल मिडियावर केडीएस-७२६ च्या बियानाच्या नावाने काय काय बियाणे म्हणून विकले जाते आहे हे निरखून पाहिले तरी यातले गौडबंगाल सहज लक्षात येईल. 
दुसरी अडचण आहे याचा उत्पादन खर्च कमी करण्याची. सोयाबीन पिकास नत्रयुक्त खतांची गरज, प्रत्यक्ष दिले जाणारे खतांचे डोस, त्यांसह इतर निविष्ठावरील खर्च शास्त्रीय पद्धतीने काढला तर उत्पादना पेक्षा अनेकवेळा खर्च अधिक आढळून आला आहे. अज्ञानामुळे, आधुनिक आणि एकात्मिक तंत्राचा अवलंब न केल्यामुळे, आर्थिक नुकसान पातळी गाठण्यापूर्वी बचावात्मक उपाययोजना न करता नंतर अधिक खर्च करत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे बजेट कोलमडत आहे. तसेही एकरी सरासरी ५ क्विंटल च्या आसपास उत्पादकता मिळवून खर्च किती करणार आणि नफा काय शिल्लक राहील? त्यामुळेच तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हातात शेतीतून शिल्लक काय राहते हा मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो. 
सध्या गावोगावी नोंदणी होत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ध्येय मुख्यतः थेट माल खरेदी केंद्र चालवणे असे आढळते. सोयाबीन किंवा ईतर धान्य शेतकाऱ्यांपासून प्रचलित दराने खरेदी करून ते थेट प्रक्रिया उद्योजकास पुरवठा करण्यात विशेष नफा शिल्लक रहात नाही. कारण एक क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतल्या पासून ते प्रक्रिया उद्योजकास पोचवण्या पर्यंत सरासरी १७० रु ते २१५ रु प्रती क्विंटल खर्च होतो आणि जीएसटी, बाजार समितीचे कर वेगळे. तेंव्हा अश्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पूर्ण मूल्यसाखळी कशी उभी करता येईल, २००-४०० टन सोयाबीन खरेदी विक्री एकट्याने करण्यापेक्षा एकत्रितपणे मोठ्या आकारमानात कसे करता येईल हे पहायला हवे. फक्त खरेदी विक्री व्यवसाय न करता लागवड ते विक्री मूल्यसाखळीचा उत्पादन खर्च कमी करत अधिकाधिक नफा प्रत्येक भागधारकास कसा मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे.   
अज्ञानापोटी आणि बाजाराचे फक्त आताचे कल पाहून सोयाबीन पाठोपाठ सोयाबीन असे एक पीक सलग एकाच क्षेत्रावर घेत गेल्यास अनेक समस्या निर्माण होतात हे मध्य प्रदेशच्या उदाहरनावर सिद्ध झाले आहे तेंव्हा त्याचा डोळसपणे अभ्यास करून, पिकाचे शास्त्र समजून घेऊन, योग्य, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापणातून सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन घेता येईल. भविष्यातील सोयाबीन बाजाराच्या संधिचा लाभ कसा घेता येईल यासाठी डोळसपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
 
– इरफान शेख, ९०२१४४०२८२ (लेखक सह्याद्री बालाघाट शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत)
सर्व शेतकर्‍यांनसाठी उन्हाळी सोयाबीन व मुंग बीज उत्पादन कार्यक्रम महाबिज मार्फत राबविण्यात येत आहे़. खरीप मार्केट भावापेक्षा उत्पादित मालावर ३०% जास्त भाव देन्यात येईल.
सोयाबीन – JS 335. 
रु 2220 /- प्रति बॅग 
मूग BM203-2 रु ५५०/- प्रति बॅग 
कागदपत्रे –
७/१२
८ अ
बँक पासबुकची प्रत
संपर्क –
 महाबिज आँफीस शिवनी अकोला. संपर्क मोबाईल क्रमांक
९३२५११६७७३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »