गहू पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

3

गहू पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान


हवामान व जमीन :

    गहू पिकास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान विशेष करून मानवते. गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठीपीक कालावधीत थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील थंडीचा कालावधी बराच कमी असुन रात्रीच्या तापमानात सुध्दा बरीच तफावत आढळून येते. पीक वाढीच्या काळात अचानक तापमानात वाढ झाली तर पीक लवकर फूलावर येते व पर्यायाने उत्पन्नात घट येते. गहू पिकासाठी भारी खोल काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवष्यक असते. परंतु हे पीक मोठया प्रमाणावर हलक्या ते मध्यम जमिनीत घेतल्या जाते. त्यामुळे अशा जमिनीस भरखते, रासायनिक खते आणि पाण्याच्या पाळ्या सुद्धा अधिक द्याव्या लागतात. कोरडवाहू गहू लागवडीकरिता जास्त प्रमाणात पाऊस पडणा-या आणि ओलावा टिकवून ठेवणा-या जमिनीची निवड आवष्यक ठरते. महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक हे हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर घेतले जाते. त्यामुळे देखील राज्याची सरासरी उत्पादकता कमी आहे.

पूर्व मशागत:

    पेरणीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी पर्यंत खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुषीत करावी. ह्याच वेळी शेतात प्रती हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकुन कुळवाची पाळी द्यावी. गहू लागवड क्षेत्र शक्यतो समपातळीत असावे, जेणेकरून ओलीत व्यवस्थीत करता येईल. गरज भासल्यास जमीन समपातळीत आणण्यासाठी पाटा मारावा. त्यानंतर ओलीतासाठी सारा यंत्राने 3 मीटर रूंदीचे सारे वाफे तयार करून घ्यावेत. कोरडवाहू गहू पेरणीसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रात ओलावा टिकून राहण्यासाठी प्रत्येक चांगला पाऊस पडल्यानंतर कुळवाची पाळी द्यावी. त्यामुळे तणांचादेखील बंदोबस्त करण्यास मदत होते.

पेरणीची योग्य वेळ

    गहू पिकाची पेरणीची योग्य वेळ साधणे भरघोस उत्पन्न मिळण्याच्या द्रुष्टीने अत्यंत महत्वाची आहे. सर्व साधारणपणे गहू पिकास सुरूवातीचे वाढीस 10 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने पेरणीच्या वेळा खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत
कोरडवाहूगहू पेरणी ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या पंधरवाडयात करावी. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी पेरणीकरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
बागायती वेळेवरगहू पेरणी शक्यतो लवकर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी जेणेकरुन गहु पिकास थंडीचे जास्तीत जास्त दिवस मिळतील. सर्वसाधारणपणे यावेळी10 ते 20अंश सेल्सीअस पर्यंत तापमान असते व या तापमानात गहू बियाण्याची उगवण चांगली होते.
बागायती उशिरागहू पेरणी 15 डिसेंबर पर्यंत आटोपती घ्यावी. डिसेंबर महिन्याचे 15 तारखे नंतर देखील पेरणी केल्यास हरकत नाही. परंतु उशिराकिंवा अति उशिरापेरणी केली असता उत्पन्नात लक्षणीय घट आढळून येते. कारण असे की, उशिरापेरणी केलेल्या गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो परिणामी फुटव्यांची व ओंबीतील दाण्यांची संख्या कमी मिळते व उत्पन्नात घट येते.

गहू पिकाचे निरनिराळ्या वाणांची माहिती :

1) पीकेव्ही वाशिम 2) एकेडीडब्लु 2997-16 (शरद)
3) पंचवटी (एनआयडीडब्ल्यु-15) 4) एन 59
5) एनआय 5439 6) एनआयएडब्ल्यु-1415 (नेत्रावती)
    ब) बागायती वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
1) एकेएडब्लु 3722 (विमल) 2) एकेडब्लु 1071 (पूर्णा)3) एमएसीएस 6222 4) एमएसीएस 2846
5) एनआयएडब्लु 301 (त्र्यंबक) 6) एचडी 2189
7) एनआयएडब्लु 917 (तपोवन)
    क)बागायती उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
1) एकेडब्लू 381 2) एकेएडब्लु 4627 (नविन वाण)
3) एचडी-2501 4) एनआयएडब्लू 34 5) एचआय 977
    ड) बागायती अतिउशिरा पेरणीकरीता षिफारसीत वाण
अति उषीरा पेरणीकरीता (15 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत) चारही कृषि विद्यापीठांनी एकेएडब्लु-4627 या वाणाची षिफारस केलेली आहे कारण हा वाण लवकर परिपक्व होतो.
कोरडवाहू व बागायती वेळेवर पेरणी करिता दोन ओळीतील अंतर 23 सें.मी ठेवावे. बागायती उशिरा पेरणी करिता दोन ओळीतील अंतर 15 ते 18 सें.मी ठेवावे. बागायती गहू पेरणी करतांना बियाणे हे जमीनीत 5 ते 6 सें.मी पेक्षा जास्त खोलवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणी साठी दोन चाडे असलेल्या पाभरीचा वापर करावा.
पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण हे पेरणीच्या वेळेप्रमाणे कमी अधिक प्रमाणात असते. कोरडवाहू वेळेवर पेरणीकरिता प्रती एकरी ३० किलो बियाणे वापरावे. बागायती वेळेवर पेरणीकरीता प्रती एकरी ४० ते ५० किलो बियाणे वापरावे. एच.डी. 2189 किंवा एकेडब्ल्यु 1071 या वाणाचे बियाणे ठसठसीत किंवा जाडसर असल्यामुळे अषा वाणाकरीता प्रती एकरी60 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. अधिक उत्पन्नाच्या दृष्टीने प्रती हेक्टरी रोपांची संख्या 22.5 ते 25 लाख असणे आवश्यक आहे. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रती हेक्टरी 150 किलो बियाण्याचे प्रमाण वापरावे. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास फुटवे कमी येतात त्यासाठी झाडांची संख्या वाढविणे आवश्यक असते.

बीज प्रक्रिया :

पेरणीपूर्वी थायरम हे औषध 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जिवाणू संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निष्चितच वाढ होते. जीवाणु संवर्धन हे बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्यास घट्ट चिटकले पाहिजे याची काळजी घ्यावी. त्यासाठी जिवाणू खत पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत वाळवावे.
एका ओलीताची सोय असल्यास -42 दिवसांनी
दोन ओलीताची सोय असल्यास -21 व 65 दिवसांनी
तीन ओलीताची सोय असल्यास -21, 42 व 65 दिवसांनी

खत व्यवस्थापन

माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविता येतात. म्हणूनपेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे.  गहू पिकास रासायनिक खताचा पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी. बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. बागायती वेळेवर आणि उशिरापेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी.  नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी ओलीत करतांना द्यावी.  कोरडवाहू गहू पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पुर्ण मात्रा म्हणजेच 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी. कोरडवाहू गव्हास नत्र विभागुन देवु नये.

उत्पादन:
वरिलप्रमाणे गहू लागवडीसाठी पुर्वतयारी/ नियोजन करून सुधारित लागवड तंत्राचा अवलंब करून गहू लागवड केल्यास प्रतीहेक्टरी कोरडवाहू गव्हाचे 12 ते 14 क्विटंल व बागायती गव्हाचे 45 ते 48 क्विटंल पर्यंत उत्पन्न निष्चित मिळते.

Mac+tech agro

3 thoughts on “गहू पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

  1. लांब वाढणार्या तणासाठी सल्फोसल्फरन 0.25 कि.ग्रा. प्रति हेक्टर किंवा क्लोडीनोफॉप + मेट्सल्फ्यूरॉन (4 ग्रॅम) चे मिश्रण, तसेच आयसोप्रोट्यूरॉन 1.0 + 2,4-डी 0.5 किलो / हेक्टर आणि क्लोडीनोफॉप 0.6 एफबी, 2,4-डी 0.50 कि.ग्रा. प्रति हेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »