वादळाने घर पडून पाटोदा त महिलेला दुखापत. शेडनेट गेले उडून.

0

पाटोदा दि.१७ वार्ताहर :- पाटोदा परिसरात काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर असंख्य झाडे व विद्युत खांब तसेच रोहित्र पडले आहेत.

पाटोदा येथील शिवाजी पुंजा बोरणारे यांच्या घराची पत्रे उडून भिंत अंगावर पडल्यामुळे त्यांच्या सुनबाई सविता बोरणारे यांना जबर दुखापत झाली आहे. तर शिवाजी बोरणारे यांचाही हात मोडला आहे. तसेच मुलगा गोरख बोरणारे, नात निर्जला बोलणारे व प्रांजल बोलणारे यांनाही विटांचा मोठा मार लागला आहे. संपूर्ण कुटुंबाला प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले आहे. प्रसंगी पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांनी या कुटुंबास दहा हजार रुपयाची वैयक्तिक मदत दिली. रात्री नैसर्गिक संकटाने घडलेल्या अपघातानंतर पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रस्त्यांची प्रचंड अडचण असल्यामुळे स्थानिकांनी तात्काळ वाड्या-वस्त्यांवर ती जाणारे रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बनकर यांच्याकडे केली. तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश बैरागी यांच्या आई सिंधुबाई महंत यांच्याही घराची भिंत पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु कोणतीही दुखापत न झाल्यामुळे संकट टळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच सुरेखा केंगे यांच्या शेतात त्यांनी 25 ते 30 लाख रुपये खर्च करून उभारलेले एक एकर 5 गुंठे वरी शेड-नेट संपूर्ण जमीन उध्वस्त झाल्यामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. 2016 साली शेडनेट उभारल्यानंतर या शेडनेटमध्ये सिमला मिरची व टोमॅटोचे उत्पन्न घेऊन त्या आपले मुले मंगेश केंगे व यतीश केंगे यांच्यासह सहा माणसांचे कुटुंब चालवत होत्या. परंतु कालच्या नैसर्गिक संकटामुळे शेडनेट पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून जी.आय पाईप, ड्रीप,आयएसओ स्टॅंडर्ड असणारी शेडनेट ची जाळी सोबतच आधुनिक पद्धतीने वातावरणातील तापमान नियंत्रण करणारी पोगर सिस्टम असे एकत्रित 30 लाखांच्या जवळपास त्यांचे नुकसान झाले आहे. या शेडनेटमध्ये नुकतेच आठ दिवसापूर्वी 40 ते 50 हजार रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीने टोमॅटो लागवड करण्यात आलेली होती. हे पूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांनी निसर्गाच्या संकटापुढे हतबलता व्यक्त केली.

याचबरोबर पाटोदा येथील राजेंद्र शिंदे व दहेगाव येथील बबन जाधव यांची द्राक्ष बाग, नंदाबाई निकम यांची कारले बाग तर प्रभाकर आहेर व कमल आहेर यांची डाळिंब बाग जमीन उध्वस्त झाली आहे. तसेच गावातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे, विद्युत खांब व विद्युत रोहित्र, द्राक्ष बागा, डाळींब बागा, हंगामी कारले बागा पडल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे करणे सुरू असून पुढील शासकीय कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार असल्याची माहिती तलाठी एस.बी. तळवी यांनी दिली. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, पोलीस पाटील मुजमिल चौधरी, सर्कल आर.के.खैरे, तलाठी सुनील तळवी, कोतवाल लक्ष्मण आहेर आदींनी पाहणी करून पंचनामे करत नुसकान ग्रस्तांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »