लेबल क्‍लेम म्हणजे काय

0
कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन जे ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते. याला इंग्रजीत बायो इफिकसी म्हणतात. मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून सिद्ध व्हावी लागते. त्यासाठी विविध कृषी हवामान विभागांमध्ये व हंगामांमध्ये म्हणजे भारतात त्याच्या प्रायोगिक चाचण्या घ्याव्या लागतात. कृषी विद्यापीठे किंवा संशोधन केंद्रांतून या चाचण्या संबंधित कंपनीमार्फत घेतल्या जातात. त्याला “मल्टीलोकेशनल्स फील्ड ट्रायल्स’ असे म्हणतात. या चाचण्यांव्यतिरिक्त पशु-पक्षी, जलाशय, मासे, किंवा एकूणच पर्यावरणासाठी हे उत्पादन सुरक्षित आहे का त्यासंबंधीच्या किंवा त्याच्या विषारीपणाबाबतच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर सर्व चाचण्यांचा हा अहवाल सीआयबीआरसीकडे सुपूर्त केला जातो. त्यानंतर या संस्थेमार्फत त्याचा अभ्यास होऊन कीडनाशकाच्या विक्रीला कायदेशीर वा अधिकृत मंजुरी दिली जाते.
आता हे उत्पादन शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्‍यक ती माहिती त्याच्या पॅकिंगवर किंवा बाटलीवर लिखित स्वरूपात छापणे अत्यावश्‍यक असते. त्याला लेबल असे म्हणतात. या लेबलमध्ये कोणती माहिती संबंधित कंपनीने देणे गरजेचे आहे त्याचे काही नियम वा निकष ठरवून दिलेले असतात. आता या कीडनाशकाची वा उत्पादनाची शिफारस ज्या पिकावरील ज्या किडीसाठी, ज्या मात्रेत (डोस) करण्यात आली आहे ती माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम होय.
उत्पादनासोबत कंपनी एक छोटी घडीपत्रिका किंवा माहितीपत्रिका देते. त्यात हे लेबल क्‍लेम दिलेले असतात. (तुम्ही लीफलेट उघडून पाहा. त्यात कीडनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकांवर, कोणकोणत्या किडी-रोग वा तणांचे नियंत्रण), वापरण्याची मात्रा व डोस, पाणी याचा एक तक्ता वा कोष्टक दिलेले असते. ही माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम.
उदा. कंपनीने या कोष्टकात आपल्या कार्बेन्डॅझीम या उत्पादनाचा (बुरशीनाशक) डोस भुईमुगावरील टिक्का रोगासाठी प्रति हेक्‍टरी प्रति 600 लिटर पाण्यासाठी 225 ग्रॅम आहे असे जेव्हा लिहिलेले असते त्याचा अर्थ भुईमूग पिकावर टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाचा लेबल क्‍लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विविध चाचण्यांतून पार पडल्यानंतर शास्त्रीय कसोटींवर आधारित सिद्ध झालेली किंवा करण्यात आलेली ही अधिकृत शिफारस होय. आता पॅकिंगवर लेबलच्या स्वरूपात जी माहिती कंपनी उपलब्ध करते त्याचे विस्तृत विवरण घडीपत्रिकेत असते. त्याला इंग्रजीत लीफलेट असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट देते. पॅकिंगवरील माहितीवर कंपनीने असे लिहिलेलेच असते की अधिक माहितीसाठी लिफलेट वाचावे. मात्र अनेकवेळा बाटली एकीकडे, लीफलेट दुसरीकडे अशी विक्री केंद्रावर परिस्थिती असते. कोणत्याही परिस्थितीत बाटली किंवा उत्पादनाचा पुडा यासोबत दोन गोष्टी घेतल्याशिवाय शेतकऱ्याने दुकान सोडू नये. 1)खरेदीची पक्की पावती 2) लीफलेट (लेबलचे माहितीपत्रक वा घडीपत्रक)
लीफलेट घरी जाऊन सविस्तर वाचावे. अनेकवेळा लीफलेटवरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेली असते, त्यामुळे ती डोळ्यांनी सहजासहजी वाचणे कठीण जाते. अशा वेळी चांगल्या दर्जाच्या भिंगाचा वापर करावा. शेतात किडींचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे भिंग असावेच लागते. त्याचा वापर करावा. लीफलेट कायम जपून ठेवावे. आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही लेबल क्‍लेमचे महत्त्व समजावून द्यावे.
लेबल क्‍लेममुळे काय फायदे होतात?
शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
लेबल क्‍लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्‍चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनाव, जलाशय,मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
लेबल क्‍लेममधून “पीएचआय’ शेतकऱ्यांना समजून येतो. ज्यावरून पुढे “एमआरएल’ मिळवणे शक्‍य होते.
एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहोर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्‍लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
लेबल क्‍लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »