उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत…

0

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत

ऊस तोडणीनंतर उसाचे पाचट जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया जातात. शिवाय जमीन भाजली गेल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा नाश होतो पाचट जाळण्याची मानसिकता बदलून पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास त्यातून खताची उपलब्धता होऊ शकते वाढत्या महागाई सोबत ऊस उत्पादन खर्चात वाढ होत आहे. रासायनिक खतांचा असंतुलित पद्धतीने वापर केला जातो. त्यातून ऊस पिकाखालील क्षेत्र क्षारपड होण्याचा धोका आहे उसापासून दर हेक्टरी ७ ते ८ टन पाचट उपलब्ध होते. या पाचटाचे सेंद्रिय खत बनविणे हा चांगला पर्याय आहे.

 

पाचट चिवट असल्याने ते लवकर कुजत नाही. त्याचे लवकर विघटन करण्यासाठी जिवाणूंचा वापर करावा लागतो. त्यासाठी पाचटाचे लहान लहान तुकडे करावेत. पाचटाचे लवकर विघटन होण्यासाठी शेण, माती व पाणी यांचा वापर करावा.

 

👉पाचटात सेंद्रिय कर्ब प्रमाण जास्त (४५ टक्के) व नत्र कमी (०.३५ टक्के) असल्याने कर्ब – नत्र प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाचटाचे लवकर विघटन होण्यासाठी नत्रपुरवठा युरियामार्फत करावा लागतो.

 

👉पाचट खतामधील नत्र प्रमाण कमी होऊ नये म्हणून सुपर फॉस्फेट वापरावे. अशा कंपोस्टमधील स्फुरदाची पिकास उपलब्धता वाढते.

 

पाचट कुजविण्याच्या विविध पद्धती

 

१) खड्डा पद्धत

_ऊस पाचटाचे कंपोस्ट ढीग किंवा खड्डा पद्धतीने करता येते एक टन ऊस पाचटापासून कंपोस्ट करण्यासाठी ४ मीटर लांब, २ मीटर रुंद व १ मीटर खोल खड्डा तयार करावा. त्यात तुकडे केलेले पाचट २५ ते ३० सेंमी. जाडीच्या थराने भरावे. प्रत्येक थरावर पाचट ओले करून त्यावर जिवाणु मिश्रित शेणकाला शिंपडावा, तसेच युरिया, सुपर फॉस्फेट टाकावे. एक टन पाचटास १०० किलो शेणाचा काला वापरावा यासाठी शेणकाला करताना शेण व पाणी १:५ प्रमाणात वापरावे. सर्व थर भरून झाल्यावर पाचटाची वरील बाजू चिखलमातीने बंद करावी. साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी खड्डा उघडावा. थरामधील पाचट चांगले मिसळून घ्यावे. त्या वेळी थोडे पाणी शिंपावे व खड्डा पुन्हा चिखलमातीने बंद करावा. खड्ड्यामधील पाण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के व उष्ण तापमान ५० अंश ते ६० अंश सेंग्रे. असावे या पद्धतीने एक टन ऊस पाचटापासून ४ ते ५ महिन्यांत अर्धा टन उत्तम कंपोस्ट तयार होते. त्यात नत्र १.२५ टक्के, स्फुरद ०.८५ टक्के व कर्ब नत्र प्रमाण २० टक्के असे राहते. कंपोस्ट खतास तपकिरी  काळसर रंग येतो व ते सहज कुस्करले जाते. ऊस पाचट खतामुळे शेणखताप्रमाणेच जमिनीची सुपिकता व पीक उत्पादकता वाढते._

 

२) ढीग पद्धत

ही पद्धत खड्डा पद्धतीसारखीच आहे. फक्त पाचट खड्ड्यात टाकून कुजवण्याऐवजी ढीग करून कुजवतात.

 

३) खोडवा उसात पाचट कुजविणे

शेतात जागेवरच कुजविल्यास खोडवा पिकास उपयुक्त ठरते. यासाठी ऊस तोडणी झाल्यावर राहिलेले पाचट कुट्टी करून एक सरी आड दाबून घ्यावे. साधारणतः एक एकर क्षेत्रासाठी १६ किलो युरिया व २० किलो सिंगल सुपर फॉस्फेटचे २०० लिटर पाण्यामध्ये केलेले द्रावण कीटकनाशकाच्या पंपाचा नोझल काढून सरीमधील पाचटावर फवारावे. यावर दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धन शेणकाल्यामधून एक एकर क्षेत्रावरील पाचटावर शिंपडून हलकेसे पाणी द्यावे. पाचट थोडेसे दाबल्यानंतर रिजरच्या साह्याने बगला फोडून माती पाचटावर टाकल्यास पाचट जागेवर कुजते जमिनीची उत्पादकता कायम टिकविण्यासाठी जिवाणू खते व पीक फेरपालटीचा अवलंब करण्याबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारे खत करण्याच्या दोन पद्धती आहेत.

 

सर्व सरी पाचट पद्धत

या पद्धतीमध्ये सर्व सऱ्यांमध्ये पाचट ठेवून खुंट उघडे केले जातात. सरीत जेथून पाणी दिले जाते तेथील ५ ते ६ फूट अंतरावरील पाचट काढले जाते व खते दोन हप्त्यांत पहारीने दिली जातात कोणत्याही परिस्थितीत खते फेकून देऊ नयेत.

 

सरीआड सरी पाचट पद्धत

या पद्धतीमध्ये सरीआड सरी पाचट कुटी करून दाबले जाते. मोकळ्या सरीतून खत व पाणी देता येते. दोन मजूर एका दिवसात एका एकराची दाताळ्याने सरीआड सरी पाचट करू शकतात. ज्या वेळी ऊसतोडीच्या वाहनामुळे सरी वरंबा सपाट झालेले असतात व पाणी देण्याची अडचण होते अशा वेळी या पद्धतीचा वापर करावा

आधुनिक शेतकरी

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »