फळझाडावरील किडी नियंत्रण

0

*लिंबावरील हिरवी अळी*

ही अळी सुरुवातीला भुरकट काळी असते व नंतर ती गर्द हिरवी बनते. या अळीचया छातीच्या भागावर आडवा भुरकट पट्टा असतो. या अळ्या पाने कुरतडून खातात.
या अळीपासून सुटका करण्यासाठी कार्बारील 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 1000 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 1000 मि. लि. किंवा थायोडिकार्ब 75 डब्ल्यूपी 500 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारल्याने या अळीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते.

*पाने गुंडाळणारी अळी*

ही अळी लहान व हिरवट पांढर्‍या रंगाची असते. ती पाने पोखरुन आतील भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी चट्टे दिसतात व पाने वाळतात.
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच मिथील डिमेटॉन 25 ईसी 500 मिलि किंवा सिफेट 75 एसपी 750 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 200 एसएल 125 मिलि किंवा थायामिथॉक्झाम 25 डब्लूजी 50 ग्रॅम किंवा मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 700 मिलि किंवा क्लोरपायरीफॉस 20 ईसी 1250 मिलि किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 1000 मिलि 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

*फळातील रस शोषण करणारा पतंग*

या पतंगाची अळी गुळवेल आणि वासनवेलीवर उपजीविका करते. पतंग रात्री फळाला छिद्र पाडून आतील रस शोषून घेतात. त्यामुळे फळे गळतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गुळवेलीचा आणि वासन वेलीचा नाश करावा. गळालेली फळे वेचून नष्ट करावीत. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत बागेतील पतंग पकडून त्यांचा नाश करावा. मॅलॉथिऑन 50 ईसी 20 मिलि अधिक 200 ग्रॅम गुळ अधिक 20 लिटर पाणी या आमिषाचा वापर बागेमध्ये करावा.
*पांढरी माशी / काळी माशी,* *मावा, पिठया ढेकूण व सायला*
:
पांढरी माशी काळी तर मावा हिरवट पिवळा, पिठ्या कीड पांढरी व सायला नारंगी असतात. हे कीटक कोवळ्या पानातून रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज दिसतात. त्यांनी टाकलेल्या मधासारख्या पदार्थावर काळी बुरशी वाढते. या किटकांपासून सुटका करण्यासाठी मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 1100 मि. लि. किंवा फोसेलॉन 35 ईसी 1425 मिलि किंवा फेनव्हलरेट 20 ईसी 200 मिलि अथवा डायमिथोएट 30 ईसी 1650 मि.लि. अथवा मिथील डिमेटॉन 25 ईसी 2000 मिलि 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे किंवा मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 7 मि. लि. निबोळी तेल 100 मि.लि. किंवा निबोळी तेल 125 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे, निबोळी तेलामध्ये कपडे धुण्याची पावडर किंवा टिपॉल 1:10 या प्रमाणात मिसळावे.
पिठ्या किडीसाठी क्रिप्टोलेमस मॉन्ट्रॉझीअरी या भक्षक किडीचे 5 अळ्या किंवा भुंगे प्रति झाड सोडावे.

*साल खाणारी अळी*

ही अळी भुरकट रंगाची असून खोड पोखरते आणि यामुळे शेंडा वाळून जातो.
या अळीपासून सुटका करण्यासाठी अळी खोडातून बाहेर काढून अळीचा नाश करावा. इ. डी. सी. टी. मिश्रण किंवा पेट्रोलमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे झाडाच्या छिद्रात टाकून चिखलाने बंद करावेत. मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 14 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
आंबा

*भिरुड*

अळी पिवळसर आणि गुळगुळीत पांढरी असते. अळी फांद्या व खोड पोखरते. काही वेळा संपूर्ण झाड वाळते. यापासून सुटका करण्यासाठी अळी तारेने काढून मारावी. ई.डी.सी.टी. मिश्रण किंवा पेट्रोलमध्ये बुडविलेले कापसाचे बोळे अळीने केलेल्या छिद्रात टाकून छिद्र चिखालाने बंद करावीत.
रोपवाटिकेतील शेंड पोखरणारी अळी :
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 10 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून एका झाडावर फवारावे.

*फुलकिडे*

स्पिनोसॅड 45 एससी 2.5 मिलि किंवा थायामिथॉक्झाम 25 डब्लूजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

*तुडतुडे*

इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल 2.4 मिलि किंवा क्लोथियानिडीन 50 डब्लूजी 1.2 ग्रॅम किंवा मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 10 मिलि किंवा फेन्थोएट 50 ईसी 10 मिलि किंवा फोसेलॉन 35 ईसी 15 मिलि किंवा कार्बारील 50 टक्के 20 ग्रॅ. किंवा डायमिथोएट 30 किंवा 10 मिलि किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून एका झाडावर फवारावे, पहिली फवारणी फुलोरा येण्यापूर्वी झाडाच्या सालीवर, फांद्यावर करावी. नंतर फवारण्या 2 आठवडयाच्या अतंराने कराव्यात.
पेरु

*साल खाणारी अळी*

ही अळी काढून अळीचा नाश करावा. इ.डी.सी.टी. मिश्रण किंवा पेट्रोलमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे अळीने केलेल्या झाडाच्या छिद्रात टाकून चिखलाने बंद करावे. मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 14 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून एका झाडावर फवारावे.

*फळमाशी*

ही अळी भुरकट रंगाची असून ती झाडाची साल खाते त्यामुळे साल सुकते.
गळालेली फळे वेचून आतील अळीसह नष्ट करावीत. फळमाशी सापळा वापरल्याने यापासून सुटका होण्यास मदत होते.

*डाळींब*

फुलपाखरु भुरकट निळ्या रंगाचे तर अळी भुरकट ठिपक्याची असते. अळी फळ पोखरते त्यामुळे फळे गळतात. यासाठी गळालेली फळे वेचून आतील अळीसह नष्ट करावीत. अशा फळांना कागदी पिशव्या बांधाव्यात.
कार्बारील 50 टक्के पाण्यात मिसळणारे 2 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिली फवारणी कळ्या दिसू लागताच करावी. त्यानंतर 3 फवारण्या 3 आठवड्याच्या अंतराने कराव्यात. किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 डब्ल्युजी 250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फळधारण झाल्यानंतर 20 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

*खवले किडे*

ही खवले कीड फांद्यांवर असते. ही कीड पानातून व फांद्यातून रस शोषून घेते.
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच मिथील डिमॅटॉन 25 ईसी किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 800, 10 मिलि किंवा मॅलाथिऑन 50 ईसी 800, 10 मिलि किंवा डायमिथोएट 30 ईसी 1330, 10 मिलि 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

*काळे ढेकूण*

काळे लहान ढेकूण लाल असतात. मोठे झाल्यानंतर गर्द काळे होतात. ढेकूण सालीत तोंड खुपसून रस शोषतात. यामुळे फळे कुजतात आणि गळतात.
या ढेकूूनपासून सुटका करण्यासाठी मॅलाथिऑन 50 ईसी 400 10 मिलि 400 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पिठ्या कीड किंवा मिलीबग :
ही पांढरी कीड असते. अंडी जमिनीत घातली जातात. ही कीड कोवळ्या फांद्यातून व फळातून रस शोषून घेते. त्यामुळे फळाची प्रत खालावते. यापासून नियंत्रण मिळविण्यासाठी मॅलाथिऑन 50 ईसी 30 10 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. व्हटिसिलीयम लिकॅनी बुरशी 60 ग्रॉम आणि 50 मिलि दुध 10 लिटर पाण्यात मिसळून किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 15 दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

*माईटस*

हे अतिशय लहान असून यांना 8 पाय असतात. माईटस पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने लालसर होतात व पिकांची वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच क्लोरपायरीफॉस 25 ईसी 1500 मिलि 600 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे.

*अंजिर*
तुडतुडे लाल व त्रिकोणी तर खवले भुरकट आणि चपटे असतात. दोन्ही किडी कोवळ्या फांद्या व पानातून रस शोषून घेतात. यामुळे झाडाची वाढ खुंटते.
डायमिथोएट 30 ईसी 500 मिलि किंवा कार्बारील 50 टक्के पा. मि. 1 किलो 500 लि. पाण्यात मिसळून प्रति हे. फवारावे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात पहिली फवारणी करावी. दोन फवारण्या 3 आठवडयाच्या अंतराने कराव्यात.

*बोर*

फळ पोखरणारी अळी व फळमाशी : अळी गर्द लाल रंगाची असते, फळ पोखरते व आतील गर खाते, फळे गळतात.
व्यवस्थापन : गळालेली फळे वेचून अळीचा नाश करावा. बहार संपल्यानंतर झाडाखालील माती हालवावी. कार्बारील 50 टक्के 40 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

*द्राक्षे*

उडद्या भुंगेरे आणि फुलकिडे :
भुंगेरे भुरकट असतात. पंखावर काळे ठिपके असतात. फुलकिडे पिवळसर व लहान असतात. भुंगेरे द्राक्षावर छाटणीनंतर फुटणारे नवीन कोंब पोखरतात. फुलकिडे कोंब पोखरतात. फुलकिडे पानातील आणि कोवळया मण्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानावर, मण्यावर तपकिरी चट्टे पडतात.
या किड्यांपासून फळांची सुटका करण्यासाठी मॅलाथिऑन 50 ईसी 300 मि.लि. किंवा डायमिथोएट 30 ईसी 300 मिलि किंवा मिथील डिमेटॉन 25 ईसी 240 मिलि. 300 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. एप्रिल छाटणीनंतर लगेचच पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी डायमिथोएट 30 ईसी 400 मिलि 400 लि. पाणी घेऊन डोळे फुटल्यानंतर 9-10 दिवसांनी करावी. नंतर 2 फवारण्या 12-15 दिवसाच्या अंतराने कराव्यात. फुलकिडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर (3 फुलकिडे/कोवळी फुट) थायामिथॉक्झाम 25 डब्लूजी 150 ग्रॅम 500 लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »