कृषी शिक्षणाचे महत्त्व आणि गरज : 12 विज्ञान नंतर
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे. चाळीस लाख शेतकरी कुटुंबांकडे एक ते दोन हेक्टर इतकेच जमिनीचे क्षेत्र आहे. दोन ते चार हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे २२ लाख शेतकरी आहेत. सात लाख शेतकऱ्यांकडे ४ ते १० हेक्टर क्षेत्र असून, १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी आहेत. यापैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची श्वाश्वती नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती उत्पादने वाढविणे शक्य होत आहे.शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु, वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान. देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे. पिकांचे सुधारीत वाण, खताच्या मात्रा, पेरणीपध्दती, सिंचनपध्दती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात अविरतपणे सुधारित कृषी तंत्रज्ञानाविषयी संशोधन सातत्याने सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादने वापरावेत, यासाठी कृषी खात्यामार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये याविषयी प्रचार आणि प्रसार करीत असतात. विविध माध्यमांचा वापर यासाठी केला जात आहे. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल.
प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायासंबंधी आवश्यक शास्त्रीय ज्ञान गरजेचे असते. शिक्षणाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी होतो, हे सिध्द झाले आहे. आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन या विविध क्षेत्रात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील मिळविलेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग होत आहे. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान हे शास्त्रावर आधारीत असते. शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेली असते. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्त्रीय माहिती महत्त्वाची असते. शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला (कौशल्य) यावर आधारीत आहे. म्हणून शेती शास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करून घेणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
शास्त्रीय ज्ञानाद्वारे आपण एखाद्या गोष्टीबाबत कारण आणि परिणाम या संबंधाचा शोध घेतो. एखाद्या माणसाला काही आजार झाला तर डॉक्टर त्याच्या आजाराचे कारण शोधून उपचार करतात. कृषी व्यवसायात अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर कारण आणि परिणाम यांची मिमांसा विचार करून उत्पादनात वाढ करता येऊ शकते.
जमिनीत असणारे अन्नघटक यावर उत्पादन अवलंबून असते. खते देताना उपलब्ध घटकाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांना आवश्यक ते घटक दिले जातात. जमिनीच्या प्रकाराचा अभ्यासक करून पी नियोजन करणे गरजेचे आहे. पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज अभ्यासून पिकांना पाणी देणे गरजेचे असते. पिकावर येणाऱ्या कीड व रोग याचा पिकावर दिसणारी लक्षणे पाहून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींसाठी कृषी शाखेसंबंधीचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी कृषिविषयी शिक्षण घेण्याची गरज आहे. त्यामुळे शेती उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल.सर्वसाधारणपणे १००० ते १५०० लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने २ ते ३ उच्चशिक्षित डॉक्टरांची गरज असते. तसेच तीन ते चार कृषी पदवीधर स्वतः शेती करीत असतील तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतीचे हंगामानुसार नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी कृषिविषयक ज्ञानाची-माहितीची गरज आहे. कृषितज्ज्ञ हे ग्रामीण भागात कृषिविषयक मार्गदर्शन व सल्लागार म्हणून कार्यरत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच फायदा होईल.
महाराष्ट्रात सरकारने आणि विद्यापीठांनी कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. कृषी विद्यालयांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या संधीचा ग्रामीण भागातील मुलांनी फायदा करून घ्यायला हवा.
(लेखक हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
Source :
maharashtratimes.com/
(लेखक हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)