पीक व्यवस्थापन सल्ला

0

पीक व्यवस्थापन सल्ला
कांदा - 
– रब्बी कांद्याची पुनर्लागवड तसेच कांद्याची बियाण्यासाठी लागवड पूर्ण करावी. 
– रब्बी उन्हाळी कांद्याचे रोपासाठी बी पेरावे.
– पिकातील तणे काढावीत. पुनर्लागवडीनंतर एक महिन्याने द्यावयाचा प्रति हेक्टरी ५० किलो नत्र खताचा हप्ता द्यावा. 
– पुनर्लागवड करण्यापूर्वी एकरी लागणाऱ्या रोपाची मुळे १ किलो ॲझेटोबॅक्टर आणि १ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रति १०० लिटर पाण्यातील द्रावणात बुडवून घ्यावीत. 

टोमॅटो - 
– शेताची सर्वसाधारण स्वच्छता ठेवावी. क्षेत्र तणमुक्त ठेवावे. 
– हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरून जमीन उभी – आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. 
– सरी वरंब्यावर ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी वरखते हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येक ५० किलो द्यावीत. पुनर्लागणीपूर्वी रोपाची मुळे ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी एक किलो प्रति १०० लिटर पाण्यातील द्रावणात बुडवून लागवड करावी. 

पानकोबी - 
– सपाट वाफ्यात ३० बाय ३० सें.मी. अंतरावर कोबी रोपांची लागवड करावी. 
– लागवडीपूर्वी रोपांची मुळे ॲझोटोबॅक्टर एक किलो आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणूसंवर्धक एक किलो प्रति १०० लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी. 
– हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या भरखत वापरावे व लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येकी ८० किलो द्यावे. 
– शेतीची सर्वसाधारण स्वच्छता ठेवावी. तयार झालेल्या पानकोबीची काढणी करावी. 

फूलकोबी - 
– स्नो बॉल – १६, १ व के-१ या जातीच्या रोपांची लागवड ४५ बाय ४५ सें.मी. अंतरावर सपाट वाफ्यात करावी. 
– पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीपूर्वी हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येकी ७५ किलो द्यावे. शेतातील तणे काढून शेत स्वच्छ करावे. रोपांना मातीची भर द्यावी. 
– पुनर्लागणीपूर्वी रोपाची मुळे ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी एक किलो प्रति १०० लिटर पाण्यातील द्रावणात बुडवून लागवड करावी.

बटाटा - 
– सध्या वाढीच्या टप्प्यातील पिकास हेक्टरी ५० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याचे शेत तणमुक्त ठेवावे. खांदणी / आंतरमशागत करून रोपांना भर द्यावी. 

पालेभाज्या - 
– पालक, मेथी, कोंथिबीर, चाकवत, राजगिरा, शेपू इ. पालेभाज्यांची फुले येण्यापूर्वी काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावेत. 
– लेट्यूस कोवळे असताना काढावे. 
– नवीन लागवड टप्प्याटप्प्याने करावी. 

फूलझाडे - 
– शेवंतीची लागवड करून चार आठवडे झाल्यानंतर शेंडे खुडावेत. 
– गुलाबाची छाटणी पूर्ण करावी. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. 
– ॲस्टर पिकास ५० किलो नत्र, निशिगंध पिकास १०० किलो नत्र आणि ग्लॅडिओलस पिकास ६५ किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. 
– निशिगंध, अॅस्टर, झेंडू फुलांची तोडणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावेत. 

चारापीक व्यवस्थापन - 
१. खरिपातील काढणी केलेल्या चाऱ्याची व्यवस्थित साठवणूक करावी. 
२. ओट या चारापिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी कवी. पेरणीसाठी प्रति किलो १०० किलो बियाणे लागते. पेरणीच्या वेळी हेक्टरी ३५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. ओट पिकाच्या केंट, जेएचओ ८२२, फुले हरिता या जाती निवडाव्यात. 
३. मका या चारापिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीच्या वेळी हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. लागवडीसाठी अफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जाती निवडाव्यात. पेरणीपूर्वी बियाण्यावर ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. 
४. लसूण घास व बरसीम या चारापिकांची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीसाठी लसूण घासाचे हेक्टरी २५ किलो आणि बरसीमचे ३० किलो बियाणे लागते. लसूण घास पेरणीवेळी हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. बरसीम पिकास पेरणीच्या वेळी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. लसूण घासाच्या आरएल ८८, सिरसा-९, आनंद-या जाती निवडाव्यात. बरसीम चारापिकाच्या वरदान मेस्काबी, जेएचबी-१६ या जाती निवडाव्यात. प्रतिदहा किलो बियाण्यावर पेरणीपूर्वी २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. 

Source :
संपर्क - 
रामभाऊ हंकारे- ९८५०७१८०४१ 
डॉ. हनमंतराव घाडगे -९८५०५२२८२१ 
(विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे)    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »