हरभरा लागवड तंत्रज्ञान

0

​हरभरा लागवड तंत्रज्ञान

Source:
*श्री. अंकुश जालिंदर चोरमुले*
श्री. अमोल राजन पाटील
*आष्टा(सांगली)*

मागील वर्षच्या तुलनेत या वर्षी खरिफ हंगामात खूपच समाधानकारक पाऊस झाला आणि त्याचा फायदा शेतकरी बंधुला झालेला दिसून येत आहे.. सध्या परतीच्या पावसाने सुद्धा शेतकऱ्याच्या रब्बीच्या आशा द्विगुणित केल्या आहेत. आता खरिपाची काढणी आणि रब्बीची सुरवात या स्टेज ला शेतकरी आहेत. रब्बी हंगामाचा विचार करता हरभरा हे योग्य पीक आहे. तसेच ते द्विदल वर्गीय असल्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. हरभरयाचा उपयोग रोजच्या जीवनात डाळीचे पीठ अथवा बेसन म्हणून केला जातो शिवाय हरभऱ्या पासून म्यालिक आम्ल सुद्धा संकलित केले जाते. हरभरा हे पीक कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी हरभरा या पिकाची निवड करण्यास हरकत नाही.

⏺ *लागवडीसाठी जमीन*
हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें मी खोल) पाण्याचा योग्य निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मि. पर्जन्य असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात ओलावा भरपूर टिकून राहतो. अश्या जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पिक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषतः पिक २० दिवसाचे झाल्यानंतर किमान तापमान साधारणतः १०० ते १५० सें. ग्रे. असेल तर पिकाची वाढ होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणतः ५.५ ते ८.६ सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पिक चांगले येते. हे साधण्यासाठी जमिनीची मशागत व पेरणीची वेळ या बाबी वेळेवर होण्याला महत्व आहे.

⏺ *पूर्व मशागत*
हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पिक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सेमी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळव्याच्या २ पाळ्या द्याव्यात. खरीपात शेणखत किवा कंपोस्ट खत दिले असल्यास वेगळे खत देण्याची गरज नाही. परंतु ते दिले नसल्यास हेक्टरी १० टन कुजलेले शेणखत किवा कंपोस्ट खत नांगरणी पूर्वी जमिनीवर पसरावे. कुळव्याच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

⏺ *पेरणीची वेळ*
जमिनीतील ओलावा आणि हवेतील तापमान याचा विचार करून पेरणीची वेळ निश्चित करावी लागते. आपल्याकडे १५ ऑक्टोबर नंतर सहसा पाऊस पडत नसल्याने जिरायत क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी खरीपाचे पिक निघाल्या बरोबर शक्यतो सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. हरभऱ्याचे बियाणे १० सें. मी. खोल पडतील याची दक्षता घ्यावी. यासाठी अश्या जमिनीत खरीपात लवकर तयार होणारी पिके घ्यावीत. बाजरी, तीळ, मूग, उडीद, चवळी, घेवडा, सुर्यफुल या पिकांची पेरणी जूनच्या पंधरवड्यात झाली असल्यास सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हरभरा पेरणे शक्य होते. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवणी व वाढीसाठी चांगला उपयोग होतो. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात ५ सें. मी. खोलीवर हरभरा पेर केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या/ फुले/ घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभरऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांतील अंतर १० सें. मी. राहील अश्या पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रती हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.

सुधारित वाण :
⏺ *अ) देशी वाण*
क्रमश..
वाण
जिरायत उत्पादन (क्विं./हे.)
बागायत उत्पादन (क्विं./हे.)
बी.डी.एन.-९ -३
११ – १२
२२ – २४
विकास
११ – १२
२२ – २४
विश्वास
१० – ११
२८ – ३०
विजय
१५ – १६
३५ – ४०
विशाल
१४ – १५
३० – ३५
⏺ *ब) काबुली वाण*
विराट
१० – १२
३० – ३२
श्वेता (आय.सी.सी.व्ही.-२)
८ – १०
२० – २२
काक-२ (पीकेव्ही काबुली-२)
२६ – २८ क्विं./हे.

Krushi-vikas.blogspot.in

⏺ *बियाणे प्रमाण*
हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्यांचे प्रमाण वापरावे लागते म्हणजे हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित तेवढी मिळते. फुले जी १२ या लहान दाण्याच्या वाणाकरिता ६० ते ६५ किलो, विजय, श्वेता या मध्यम दाण्यांच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो, तर विश्वास, विशाल आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित (३,३३,३३३) मिळवण्याकरिता पेरणी किंवा टोकण, दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें. मी. ठेऊन करावी. या अंतरावर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास उपयोग होतो अन्यथा हरभरा रोपांची संख्या अतिशय विरळ होऊन अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळण्यास अडचण येते.

⏺ *बीजप्रक्रिया आणि जीवानुसंवर्धन*
बियाणांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ५ ग्रॅ. ट्रायकोडर्मा चोळावे. यानंतर प्रती १० ते १५ किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाचे २५० ग्रॅ. वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. (गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी १ ली. पाण्यात १२५ ग्रॅ. गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.) बियाणे १ तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्याच्या मुळांवरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषुन घेऊन पिकास उपलब्ध केला जातो. आणि त्यायोगे पीकाचे उत्पादन वाढते.

⏺ *खते आणि आंतरमशागत*
सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले १० ते १५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळव्याच्या वेळी शेतात पसरावे. त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. खरीपात शेणखत दिले असल्यास पुन्हा रब्बी हंगामात हरभऱ्याला शेणखत देण्याची गरज नाही. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रती हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनिम फॉस्फेट (डी.ए.पी.) अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती हेक्टरला द्यावे. प्रती हेक्टर ५० किलो पालाश दिले असता रोग प्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे. हरभऱ्याला जस्त या शुक्ष्म द्रव्याचीही गरज असते म्हणून २५ किलो झिंक फॉस्फेट आवश्यक आहे. त्यानंतर पिक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची फवारणी करावी त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पिक उत्पादनात वाढ होते.

⏺ *तण व्यावस्थापन*
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिक सुरुवातीपासूनच तणविरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोगे पिक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफश्यावर करावी. कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पहिल्या ३० ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुराअभावी खुरपणी कारणे शक्य नसल्यास फ्ल्युक्लोरॅलीन किंवा पेंडीमीथिलीन या तणनाशकाचा वापर करावा.
⏺ *पाणी व्यवस्थापन*
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २०-२५ दिवसांनी पहिले, ४५-५० दिवसांनी दुसरे आणि ६०-६५ दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकल सर्वसाधारणपणे २५ से.मी. पाणी लागते. प्रत्येक वेळी प्रमाणशीर पाणी (७-८ से. मी.) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. म्हणून हरभरयास योग्य वेळी व आवश्यक तेवढे पाणी देणे फारच महत्वाचे असते.

⏺ *एकात्मिक कीड व्यवस्थापन*
हरभरा पिकाचे घाटे आळीपासून ३० ते ४० टक्के नुकसान होते.पीक ३ आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक आल्या दिसू लागतात. पानावरती पांढरे डाग व शेंडे खाल्लेले दिसतात नंतरच्या काळात आळी हरभर्याच्या घाट्यावर हल्ला करते. यावेळी लींबोळीच्या ५% द्रावणाची फवारणी करावी. पुढे १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल ५०० मिली प्रति हेक्टर या विशानुजन्य किटकनाशाकाची फवारणी करावी. आवश्यकता असल्यास तिसरी फवारणी क्लोरपायरीफॉस २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
Source:

*श्री. अंकुश जालिंदर चोरमुले*
आष्टा (सांगली)
*मो. नं- 8275391731*
श्री. अमोल राजन पाटील
आष्टा (सांगली)

Krushi-vikas

Source:
​​​​​ होय आम्ही शेतकरी​​​ ​​​​

https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »