तूर पिकाच्या वाढीकडे द्या लक्ष
तूर पिकाच्या वाढीकडे द्या लक्ष…॥
सध्या तुरीचे पीक फुलकळी येण्याच्या अवस्थेत आहे. यापुढील टप्प्यात बदलत्या हवामानानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे.
वाढीच्या टप्प्यात तूर पिकाला पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असते. सध्या तुरीमधील आंतरपीक मूग, उडीद, सोयाबीन काढून झाले आहे. अशा परिस्थितीत तूर पिकास एक संरक्षित पाणी द्यावे. बरयाच ठिकाणी तुरीची वाढ फारशी झाली नसली तरी पीक निरोगी असल्याने संरक्षित पाणी दिल्यास निश्चित फायदा होईल. ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे तेथे गरज नाहि .
1) ज्या शेतकऱ्यांनी तुरीची बागायती लागवड केली असेल अशा शेतकऱ्यांनी पिकास कमीत कमी तीन वेळा पाणी द्यावे. त्यासाठी वाढीच्या अवस्था लक्षात घ्याव्यात. जेणेकरून नेमके पाणी किती द्यायचे ते निश्चित करता येते. फुलकळी येण्याची अवस्था, 50 टक्के फुले व शेंगा लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या अवस्थांना पाणी दिल्यास उत्पादनात वाढ मिळते.
फुलगळीची कारणे
1) फुले लागण्याच्या वेळी जमिनीत अत्यंत कमी ओलावा असणे किंवा सततचा जास्त ओलावा असणे.
2) जमिनीत जास्त दिवस पाणी धरून राहणे किंवा लवकर वापसा न येणे.
3) वातावरण सतत ढगाळ असणे व हवेत दमटपणा असणे.
4) जमिनीत ओलावा जास्त असणे. लागवडीचे क्षेत्र हे पाणवठा, नदी किंवा तळ्याच्या जवळ असल्यास आणि वातावरणात तापमान अत्यंत कमी झाल्यास वाफेचे रूपांतर धुक्यात होऊन फुलगळ होते.
5) अतितापमान झाल्यास व जमिनीत ओलावा कमी असल्यास फुलगळ होते.
उपाययोजना
1) फुलगळ कमी करण्यासाठी वाढ उत्प्रेरक एनएए (नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड) 20 पीपीएम (100 लिटर पाण्यात 20 मिलि एनएए) या प्रमाणात फवारणी करावी. किंवा रिच फॉस्फेट 60मीली 15लिटरसाठी फवारणी करावी यामुळे फुलगळ काही प्रमाणात कमी करता येईल.
शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
1) अळीची अंडी फुलकळीच्या देठावर किंवा जवळच्या पानाच्या मागील बाजूस एकट्याने किंवा गुच्छात दिसतात. 5 ते 7 दिवसांत लहान अळी बाहेर पडते. ही अवस्था सर्वांत घातक असते. या अवस्थेत नियंत्रण केल्यास पुढील दोन फवारण्या वाचतात.
2) नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा क्लोरोपायरिफॉस 17 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी क्विनॉलफॉस किंवा प्रोफेनोफॉस 20 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून पीक 50 टक्के फुले व शेंगा असताना करावी.