वर्षभर घेवडा
तीन हंगामातून वर्षभर घेवडा
सुमारे ७० दिवसांत येणारे, कमी खर्च व श्रम असणारे व वर्षभर दरही समाधानकारक देणारे काळ्या घेवड्यासारखे दुसरे कोणतेच पीक नसेल. हे अनुभवाचे बोल आहेत बनवडी (जि. सातारा) येथील बाळासाहेब नलगे यांचे. वर्षभरात तीन हंगामात टप्प्याटप्प्याने लावणीचे पद्धतशीर व हुशारीने नियोजन करीत आपले या पिकातील कौशल्य त्यांनी सिद्ध केले आहे.
सातारा जिल्ह्यात सातारा- फलटण रस्त्यावर बनवडी (ता. कोरेगाव) हे सुमारे १७०० लोकसंख्येचे गाव आहे. तालुक्याच्या उत्तर भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. बनवडीत उपलब्ध पाण्यावर शेतकरी बागायती शेती करतात.
गावातील बाळासाहेब अर्जुन नलगे यांची पाच एकर शेती आहे. वडिलांच्या निधनानंतर नववीतून त्यांना शाळा सोडावी लागली. शेतीचा भार सांभाळावा लागला. त्या काळात पाणी नसल्याने शेती जिरायत होती. त्यातून येणारे उत्पादन व दुग्ध व्यवसाय यातून उदरनिर्वाह व्हायचा. सन २००६ च्या सुमारास जिल्हा बॅंकेचे कर्ज काढून पाइपलाइन व विहीर खोदून शेती बागायत केली. कर्ज फेडण्याच्या दृष्टीने पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरवले.
कोरेगाव भागातील वाघा घेवडा प्रसिद्ध असून, त्यास भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाले आहे. मात्र, हा घेवडा बहुतांशी खरिपात घातला जातो. नलगे मात्र वर्षभर पैसे देणाऱ्या आणि दर चांगला राहणाऱ्या पिकांच्या शोधात होते. अशातच पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये ओल्या काळा घेवड्याची होत असलेली मागणी त्यांना समजली. याच भागातील कोलवडी येथील भाऊसाहेब भोसले हे पीक घेत असल्याचे कळल्यावर लावणीपासून ते मार्केटपर्यंत तेथे जाऊन सविस्तर माहिती घेतली. त्यांच्याकडून बियाणे खरेदी केली. या पिकाचा प्रयोग करायचे ठरवले. सातत्याने शिकाऊ वृत्ती ठेवल्याने आज ते या पिकातील मास्टर झाले आहेत. या पिकाची वर्षभर शेती करण्याचे जणू मॉडेलच त्यांनी उभारले आहे.
सन २००६ मध्ये आॅगस्टमध्ये ३० गुंठ्यातील प्रयोगात सुमारे तीन टन उत्पादन मिळाले. सरासरी २५ रुपये दराने ७५ हजार रुपये मिळाले. कमी भांडवलात चांगला फायदा मिळाल्याने काळा घेवडा पिकाची गोडी निर्माण झाली. टप्प्याटप्प्याने क्षेत्रात वाढ करत वर्षभर लावणीचे नियोजन केले.
नलगे यांचे घेवड्याचे मॅाडेल
– दोन भागात होते शेती
– एक एकर, दोन एकर, घेवडा
– लावणीचे तीन हंगाम- मे, आॅगस्ट, डिसेंबर
– सुमारे तीन महिन्यांचे पीक आहे.
– कोणत्या काळात चांगला दर मिळेल त्या दृष्टीने लावणीचा कालावधी निवडून वर्षभर लावणीचे नियोजन केले आहे.
– एकरी २.५ ते ३ टन- हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून
– आॅगस्ट लागवडीच्या घेवड्याचे अन्य हंगामाच्या तुलनेत अधिक उत्पादन
– दर- उन्हाळी (मे) लागवडीच्या घेवड्याला अन्य दोन हंगामांच्या तुलनेत अधिक
म्हणजे किलोला ५० ते ६० रुपयांपर्यंत. कारण या काळात अन्य क्षेत्रात लावण नसल्याने आवक कमी राहते.
– अन्य हंगामात ३० ते ४० रुपये. शक्यतो ३० पयांपेक्षा खाली दर येत नाही.
– या पिकाला भांडवल खूप कमी लागते.
– एकरी १८ ते २० किलो बियाणे लागते. ते घरचेच वापरले जाते. त्यामुळे त्यावरील खर्च वाचतो. बियाण्यासाठी निवडक शेंगा झाडावर ठेवल्या जातात. आॅगस्टमध्ये काढणी असलेल्या प्लॉटमधील बियाणे लगेचच दुसऱ्या हंगामात न वापरता तिसऱ्या हंगामात वापरावे लागते.
– एकरी सर्व मिळून १० ते १२ हजार रुपये एवढाच खर्च येतो.
– एकरी अडीच टन उत्पादन व ३० रुपये दर धरला तरी ७५ हजार रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता प्रति हंगामात ६५ हजार रुपये मिळतात. याप्रमाणे तीन हंगाम धरले तर एक लाख ९५ हजार रुपये मिळतात. हेच उत्पादन ३ टन व ४० रुपये दर धरून हंगामात एक लाख १० हजार रुपये नफा होतो.
– एक एकर घेवडा मायक्रो स्प्रिंकलरवर. उर्वरित ठिबक सिंचनावर. पाटपाण्यापेक्षा मायक्रो स्प्रिंकलरच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होण्याबरोबर मालाला टवटवीतपणा येतो.
– दोन वर्षांतून एकदा एकरी चार ट्रेलर शेणखत.
– करपा रोगापासून सर्वाधिक धोका असल्याने लक्षणे दिसताच त्वरित फवारणी
– घेवड्यात सुमारे तीन किलो मका बियाणे टाकले जाते. मका सापळा पीक असल्याने कीड नियंत्रणास मदत होते. जनावरांना चारा उपलब्ध होतो.
– नलगे यांना गेल्या दहा वर्षांत घेवड्याला किमान २५ रुपये (किलोला) तर कमाल ६५ रुपये दर मिळाला आहे. पिकात सातत्य व गुलटेकडी मार्केटचे दोन व्यापारी निश्चित असल्याने दर चांगला मिळतो. ३५ ते ४० किलोच्या पोत्यात पॅकिंग करून घेवडा पाठवला जातो.
– गेल्या दहा वर्षांपासून काळा घेवडा शेतीत सातत्य
– परिसरातील शेतकऱ्यांना घेवडा व दुग्ध उत्पादनाविषयी सातत्याने मार्गदर्शन
– गेल्यावर्षी नलगे यांच्याबरोबरीने ४० शेतकऱ्यांनी घेवड्याची लागवड केली. त्यांना चांगला फायदा झाला.
शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत कुटुंबाचा अार्थिक स्तर उंचावला आहे. गोठ्यात पाच गायी व सहा कालवडींचे संगोपन होते. दररोज ४० लिटर दूध संकलनाबरोबर अन्य शेतकऱ्यांकडीलही दुधाचे संकलन करतात. (सुमारे ७०० ते ८०० लिटरपर्यंत)
शेतीत भाऊसाहेब भोसले व गडहिग्लंडचे एस. डी. मोरे, शंकर भोसले यांचे मार्गदर्शन मिळते. घेवडा हे मुख्य पीक असलेल्या शेतीतून घर, गोठा, पाइपलाइन या कामांसाठी सुमारे सात ते आठ लाख कर्ज फेडणे त्यांना शक्य झाले. पत्नी सौ. संतोषी, मुलगा अाशिष, मुलगी सायली यांची शेतीत त्यांना समर्थ साथ मिळते. अॅग्रोवनचे ते नियमित वाचक अाहेत. अलीकडे दुधाला मिळालेल्या दरवाढीत अॅग्रोवनची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
Source:
बाळासाहेब नलगे- ९४०५२५२६३९, ८३७९९७५५७९
Please informed about fertilizer dose required for Ghevada cultivation.