आले लागवड तंत्रज्ञान

0
ale

Ginger root and ginger powder in the bowl

आले लागवड तंत्रज्ञान

हवामान : 

उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते.

लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते.

वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता.

साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.

जमीन :

चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य.

नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य.

हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.

जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी.

लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात.

कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन.

जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.

चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते.

जाती : 

ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते.

काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे.

वरदा : 

कालावधी : २०० दिवस., तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के.

सरासरी ९ ते १० फुटवे, रोग व किडीस सहनशील.

सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २२.३ टन. 

महिमा : 

कालावधी : २०० दिवस, तंतूचे प्रमाण : ३.२६ टक्के

सरासरी १२ ते १३ फुटवे, सूत्रकृमीस प्रतिकारक

सुंठेचे प्रमाण :१९ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २३.२ टन

रीजाथा : 

कालावधी : २०० दिवस , तंतूचे प्रमाण : ४ टक्के

सुगंधी द्रव्याचे प्रमाण : २.३६ टक्के, सरासरी ८ ते ९ फुटवे

सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के,सरासरी उत्पादन :प्रतिहेक्‍टरी २२.४ टन

माहीम : 

महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी : २१० दिवस

मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे

सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २० टन

पूर्वमशागत :

लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी, आडवी नांगरट करावी.

१ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.

जमिनीतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्‍या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड-गोटे वेचून काढावेत.

शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.

लागवडीच्या पद्धती : 

 सपाट वाफे पद्धत :

पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.

जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत.

सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.

सरी वरंबा पद्धत :

मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी.

लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वरती सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी.

दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.

रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :

काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते.

जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी ठेवावी.

१२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ६० सें.मी. रुंदीचा होईल.

दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ६० सें.मी. सोडावी.

या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्यावरती २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतराने लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :

लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी.

मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत.

बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे.

हेक्‍टरी २५ क्विंटल बियाणे लागते. 

लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते.

जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया : 

बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. २० मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.

बियाणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.

तणनाशकाचा वापर : 

लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ४ ते ५ ग्रॅम ॲट्राझीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ४ ते ५ मि.लि. ग्लायफोसेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

उगवण सुरू झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्‍यतो टाळावा.

खत व्यवस्थापन : 

या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्‍यकता असते.

संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत.

हेक्‍टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.

नत्र खताचा निम्मा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी हेक्‍टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्‍टरी ३७.५ किलो पालाश दोन वेळा मिसळावे.

ल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यांसारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

संजीवकांचा वापर : 

उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ॲसेटिक ॲसिडचा वापर ६० आणि ७५ व्या दिवशी शिफारसीप्रमाणे करावा फवारावे.

फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

कीड नियंत्रण कंदमाशी :

माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. अळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजिविका करतात.

नियंत्रण : 

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि.किंवा डायमिथोएट १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्टदरम्यान आलटून-पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

फोरेट (१० टक्के दाणेदार) प्रति हेक्‍टरी २५ किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे. पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे.

याच कीटकनाशकाचे पुढील दोन हप्ते एक महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत.

अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून द्यावेत.

धन्यवाद

🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »