चांदवडला पत्रकार संरक्षण कायद्याची होळी व तहसीलसमोर निदर्शने; पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

0

चांदवड-(पत्रकार कैलास सोनवणे)
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत व पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी आदी मागण्यांसाठी चांदवड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तसेच तहसीलदार मंदार कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले.

फोटो – 1) चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करताना चांदवड तालुक्यातील पत्रकार बांधव.
2) पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी चांदवड येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करताना चांदवड तालुक्यातील पत्रकार.
3) चांदवड येथे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देताना चांदवड तालुक्यातील पत्रकार.

महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. मात्र राज्यात या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने तो कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात सुमारे दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केला आहे. त्यातही एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने हा कायदा कमकुवत ठरत आहे. नुकतेच पाचोरा येथील एका पत्रकारास पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणातही आमदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबावेत व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घोषणाबाजी करत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय काळे, महेश गुजराथी, महेंद्र गुजराथी, देविदास जाधव, धनंजय पाटील, विक्रम देवरे, भरत मेचकूल, राम बोरसे, कैलास सोनवणे, विकी गवळी, नितीन फंगाळ, विष्णू थोरे, सुनील सोनवणे, आनंद बडोदे, बाळासाहेब बच्छाव, सचिन हिरे, पिंटू राऊत, सोमनाथ जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »