द्राक्ष पिकावरील भुरीचे नियंत्रण व व्यवस्थापन 🌱
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. अचानक वाढलेल्या ठंडीमुळे पिकांवर विशेषत: फळपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. पिकांवर रोग पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मध्येच ढगाळ तर मध्येच थंड वातावरणामुळे द्राक्षावर भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते आपण जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात द्राक्ष पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या वातावरणात द्राक्ष या पिकावर रोगाची विशेषत: भुरी (पावडरी मिल्ड्यू) या रोगाची लागण झाल्याचे दिसून येते. द्राक्षाची पाने, कोवळी फूट आणि द्राक्षाचा घड या भागांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, २२ ते २८ अंश सें.ग्रे. तापमान व दमट वातावरण हे भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. भुरी या रोगाचा वार्यामार्फत अधिक प्रमाणात प्रसार होतो.
भुरी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्यावरील बाजूस पांढरसर रंगाचे डाग दिसून येतात. काही काळानंतर हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
द्राक्षवेलीवरील कॅनोपीच्या वाढीचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास तसेच प्रकाश संश्लेषण नीट झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.तसेच बागेतील स्वच्छता, वेळेवर छाटणी आणि सल्फरची फवारणी केल्यास रोगावर नियंत्रण मिळण्यासाठी मदत होते.कॉलेटोट्रिकम ग्लेओस्पोरॉईडीस किंवा एल्सिनॉई अंप्लिना या बुरशीमुळे करपा रोगाची लागण होते. सलग तीन ते चार दिवस ३२ अंश सें.ग्रे. तापमान व पाऊस असल्यास या रोगाचा झपाट्याने प्रसार होतो. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त भाग छाटून नष्ट करावा.पिकांची काढणी झाल्यावर बुरशीग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्षबाग स्वच्छ ठेवावी.या पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे दंव पडून ते द्राक्षांच्या घडांमध्ये साचून राहते. यामुळे फळकूज होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे घडांची प्रत ढासळून आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे पाणी काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी सकाळी द्राक्षाच्या वेली हालवून ते पाणी काढून घ्यावे आणि नंतरच फवारणी करावी. ओलांडा पूर्णपणे कोरडा करून नंतरच बुरशीनाशकांची फवारणी करावी.