काजीसांगवी विद्यालयात रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिन म्हणून साजरा

काजीसांगवीः(उत्तम आवारे): मविप्र समाजाचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय काजीसांगवी येथे थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, पर्यवेक्षक सुभाष पाटील,ज्येष्ठ शिक्षक अर्जुन आहेर, दिगंबर पाटील, सतीश महाले,दर्शना न्याहारकर उपस्थित होते.
गणित दिनाच्या निमित्ताने विद्यालयात गणितीय रांगोळी प्रदर्शनाच्या आयोजन करण्यात आले. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यवेक्षक सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने राणी कोल्हे,कोमल ढोमसे,गौरी शिंदे,कृष्णा काळे या विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित भाषणे सादर केली. शिक्षक मनोगता मध्ये गणित शिक्षिका मयुरी देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात न्याहारकर सर म्हणाले आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात व शेवट हा गणिता पासूनच होत असते;आपल्या प्रत्येक कार्यात गणित समाविष्ट झालेले असते. श्रीनिवास रामानुजन यांनी गणितातील अनेक सूत्रे तयार करून ती गणितात रूढ केली. आज त्यांचा उपयोग गणितामध्ये होत आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामानुजन यांनी आपलं जीवन व्यतीत केलं गणित हा विषय अतिशय सोपा करून दाखवला म्हणून 22 डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. असे गौरवोद्गार यावेळी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८वी अ ची विद्यार्थिनी प्रणाली काळे व अदिती कोल्हे यांनी केले, तसेच आभार गणित शिक्षक चिमाजी गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.



