हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? बाजाराची दिशा काय राहू शकते..

0

हरभऱ्याचे भाव सध्या काही कारणांनी कमी झाले आहेत. सरकार मात्र ग्राहकांचा विचार करून बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा घटलेले उत्पादन या घटकाचा हरभरा बाजारावर पुढील काळात काय परिणाम होऊ शकतो आणि बाजाराची दिशा काय राहू शकते, जाणून घेऊया.

यंदा हरभरा लागवड कमी होण्याचे मुख्य कारण होते कमी पाऊस. यंदा देशातील ६० टक्के भागात कमी पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊसही पुरेसा झाला नाही. परिणामी, रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण नव्हते. यामुळे देशातील हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ६ टक्क्यांनी कमी झाली. चालू हंगामात देशात हरभऱ्याखालील क्षेत्र १०४ लाख ७४ हजार हेक्टर होते.

देशातील उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.देशातील उत्पादन घटण्याला प्रामुख्याने दुष्काळी स्थितीमुळे कमी झालेली लागवड हे कारण आहे. गेल्या तीन वर्षांचे पाहता भारतात हरभरा उत्पादन कमी होत असल्याचे दिसते. यंदाचे दुसरे वर्ष आहे की ज्यात उत्पादन घटले आहे. यंदा देशातील लागवड ६ टक्क्यांनी कमी झाली. तसेच उत्पादकतेला फटका बसला. तर वाढत्या उष्णतेमुळेही उत्पादन कमी राहणार आहे. पाणीटंचाई आणि वाढती उष्णता तसेच बदलते वातावरण यामुळे उत्पादन यंदा किमान १५ टक्क्यांपर्यंत कमी राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.पिकाला पोषक वातावरण नव्हते व अनेक भागांत लागवडीसाठी पुरेशी ओल नव्हती.जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च या तीनही महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.तापमान वाढीमुळे हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा इतर पिकांचा पर्याय कमी असल्याने शेतकरी हरभरा विकत आहेत. सरकारचाही दबाव हरभरा बाजारावर दिसून येत आहे. आवकेचा हंगाम आणि सरकारचे धोरण यामुळे पुढील महिना दोन महिने बाजार दबावात राहू शकतो. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्री करत आहेत. त्यामुळे सर्वच राज्यांमधील मोठ्या बाजारातील भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर हमीभाव ५ हजार ४४० रुपये आहे.

बाजाराचे भविष्य काय राहू शकते?
सध्या हरभऱ्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडला जास्त हरभरा विकतील, असा अंदाज बांधला जात आहे. तसेही नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर खुल्या बाजारालाही आधार मिळेल आणि दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.बाजारभाव ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »