शेतीत वापरले जाणारे औषध किती प्रमाणात विषारी आहे ते ओळखा

0

फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर अश्या प्रकारचे त्रिकोण दिलेले असतात.

◆ प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर ते उत्पादन किती प्रमाणात विषारी आहे हे या त्रिकोणांच्या साहाय्याने
दर्शवलेले असते.

◆ सरकारी नियमानुसार असे त्रिकोण प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर असलेच पाहिजेत. त्याबाबत खाली अधिक माहिती देत आहोत.


१) लाल त्रिकोण :—

● लाल त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही “अत्यंत विषारी” या गटात मोडतात. या त्रिकोणाच्या वर POISON असे लिहिलेले असते.

● कोणत्याही जनावराच्या किंवा मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक फक्त १ ते ५० मिलिग्राम एवढा जरी शरीरात गेला तरी ते प्राणघातक आहे.

● या गटात मिथाईल पॅराथियॉन, मोनोक्रोटोफॉस, फोरेट, झिंक फॉसफाईड, इत्यादी उत्पादने मोडतात.


२) पिवळा त्रिकोण :―

● हा त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही “जास्त विषारी” या गटात मोडतात.

● लाल त्रिकोणाप्रमाणे याही त्रिकोणाच्या वर POISON असे लिहिलेले असते.

● जनावराच्या/मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक ५१ ते ५०० मिलिग्राम शरीरात गेल्यास प्राणघातक ठरू शकते.

● या गटातली उत्पादने फेनवेलरेट, कार्बोफ्युरॉन, क्लोरपायरीफॉस, सायपरमेथ्रीन, इत्यादी युक्त असतात.


३) निळा त्रिकोण :―

● निळा त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही “मध्यम विषारी” या गटात मोडतात.

 ● या त्रिकोणाच्या वर DANGER असे लिहिलेले असते.

● जनावराच्या/मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक ५०१ ते ५००० मिलिग्राम शरीरात गेल्यास प्राणघातक ठरू शकते.

● या गटातली उत्पादने डायकोफॉल, कार्बारील, मॅलाथिऑन, कार्बेन्डाझिम, ग्लायफोसेट, इत्यादी युक्त असतात.


४) हिरवा त्रिकोण :―

● हिरवा त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही “किंचित विषारी” या गटात मोडतात.

● या त्रिकोणाच्या वर CAUTION असे लिहिलेले असते.

● जनावराच्या/मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक शरीरात ५००० मिलिग्राम पेक्षा जास्त गेल्यास प्राणघातक ठरू शकते.

● या गटात मॅनकोझेब, सल्फर, बीटी (डायपेल, वगैरे), नीम युक्त उत्पादने, स्ट्रेप्टोसायक्लिन, इत्यादि युक्त उत्पादने मोडतात.

◆ पिकाच्या सुरुवातीच्या काळात शक्यतो कमी विषारी पेस्टीसाईडस् पासून सुरुवात केली तर चांगले.

◆ खरंतर सुरुवातीला हिरवा, त्यानंतर निळा, पिवळा आणि शेवटी खूप गरज पडल्यास लाल त्रिकोण असलेली उत्पादने वापरल्यास किडी व रोग योग्य प्रमाणात आटोक्यात राहू शकतात.

◆ मात्र असे करताना त्यांचा प्रादुर्भाव किती आहे यावरून आपण ठरवावे की किती विषारी उत्पादन वापरायचे आहे. नाहीतर सुरुवातीलाच खूप जास्त प्रादुर्भाव झाला असेल आणि तेव्हा आपण सर्वात कमी विषारी उत्पादन वापरले, तर अडचणी वाढतील. लाल त्रिकोण असलेली उत्पादने शक्य झाल्यास कमीत कमी वापरावीत, जेणेकरून पर्यावरणाचे आपल्याकडून नुकसान होणार नाही.

Source :-

सौजन्य :- Agrotmissa

© ॲग्रोतमिस्सा (सदर माहिती कुणीही “ॲग्रोतमिस्सा” च्या व्यतिरिक्त इतर नावाने टाकण्याचा प्रयत्न केल्यास, अथवा सदर लेखात छेडछाड करून पुढे पाठविल्यास कॉपीराईटचा भंग केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »