जनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा ऋतू कशा प्रकारे फायदेशीर असतो ते वाचा

0
हिवाळा ऋतू 
  • पशुपालन व्यवसायासाठी हिवाळा ऋतू अत्यंत पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा हितावह ठरतो. तेव्हा हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे.
  • गाय, म्हैस, बैल, रेडा या प्राण्यांची प्रजननक्षमता हिवाळ्यात सर्वांत उच्च असते. प्रजननक्रिया सुलभ व नियमित होणे म्हणजे पुढे मिळणाऱ्या वासरू व दुधाची खात्री असते. हिवाळ्यात प्रजननक्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा जनावरास विशेष अपाय होत नाही.
  • जनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतीमानाची गरज असते. पावसाळ्यात वाढीस लागलेली जनावरे पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात. खरीप पिकांचा चारा, हिरवे गवत, संतुलित आहार यामुळे जनावरांचे शारीरिक वजन वाढते.
  • हिवाळ्यातील थंडीचा जनावरांना अपाय होत नाही. थंडीमुळे आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्री व पहाटे गोठ्यात ठेवावीत. चांगल्या प्रकृतीमानामुळेच जनावरांच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी. जनावर माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपली जनावरे माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे.
  • जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे निरीक्षण दररोज व प्रत्येक जनावरात करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन करून घेणे शक्‍य होते. अशा माहितीच्या आधारे हिवाळ्याच्या वातावरणाचा उपयोग घेता येऊन जनावरांची प्रजननक्रिया पशुपालकास नियंत्रित करता येते.
हिवाळ्यात जनावरे गाभण राहणे फायद्याचे…
हिवाळ्यातील उच्च प्रजननक्षमतेमुळे जनावरे गाभण ठरण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात जनावरे माजावर येऊन गाभण ठरण्याकडे लक्ष दिल्यास जनावरांकडून दूध व वेत मिळण्याची निश्‍चिती पशुपालकास करता येते. हिवाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
याउलट हिवाळ्यात प्रजनन बंद असलेली जनावरे पुढे उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या अभावामुळे इतकी अशक्त होतात, की त्यांना पुढे पावसाळा संपेपर्यंत शरीर, आरोग्य राखणे शक्‍य होत नाही. एकदा हिवाळा संपला तर पुढे वर्षभर जनावर भाकड राहते.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »