आता सातबारे मिळवण्यासाठी तलाठ्याच्या सहीची गरज नाही
👉राज्यात 2 कोटी 51 लाख सातबारे उतारे असून, सातबारा संगणीकरण योजनेंतर्गत 1 कोटी 65 लाख सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. हे उतारे शुक्रवारपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा 15 रुपयांना मिळणार असण्याची शक्यता आहे.
👉सातबारा उताऱ्यावर तलाठी किंवा इतर कोणत्या महसूल अधिकाऱ्यांच्या सही किंवा शिक्क्याची गरज नसून संबंधित उतारे सरकारी कामासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. उताऱ्यांवर स्वाक्षरी झालेल्याचा दिनांक आणि वेळ असणार आहे.
👉डिजीटल स्वाक्षरीनंतर उताऱ्यांमध्ये बदल केला असल्यास तशी तळटीप उताऱ्यावर छापण्यात येणार आहे. उताऱ्यावर 16 अंकी पडताळणी क्रमांक आणि क्यूआर कोड असेल त्यामार्फत उताऱ्यांची वैधता तपासता येणार आहे, असं ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले आहे.
👉राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने जमाबंदी आयुक्तालयाने https://mahabhumi.gov.in हे पोर्टल विकसित केलं आहे. त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘पेमेंट गेटवे’मार्फत शुल्क भरुन नागरिकांना डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा मिळू शकणार आहे. उताऱ्यामध्ये काही चूक अढळल्यास दिलेल्या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज तलाठी कार्यालयाकडे करता येणार आहे. महसूल विभागाकडून गेल्या तीन वर्षापासून हा प्रकल्प सुरु असल्याचे जगताप यांनी सांगितले.