हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

0

उन्हाळ्यात खोल नांगरट केल्याने जमिनीत असलेल्या सुप्तावस्था नाश पावतात किंवा पक्षी त्यांना वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल. दोन खोल नांगरट केल्यास हुमणीचे जवळपास ७० धटक्के नियंत्रण होऊ शकते.

प्रादुर्भावग्रस्त खरीप किंवा रब्बी हंगामातील पिक काढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरत करावी. त्यामुळे जमिनीतील अळ्या पृष्ठभागावर येतील, त्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात नष्ट कराव्यात. तसेच बगळा, चिमणी, मैना, कावळा इ. पक्षी हुमणीला वेचून खातात. त्यामुळे हुमणीचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.

उभ्या पिकामध्ये शक्य असेल तर आंतरमशागत करावी व उघड्या पडलेल्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून मारून टाकावे.

मे – जून महिन्यात पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडूनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावरील भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पडावेत ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतकर्यांनी समुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो. जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.

भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापरा करावा. सापळ्यातील भुंगे गोळा करून मारावेत. एक सापळा एका हेक्टरसाठी पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्यांचा नाश होतो.

निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास हुमणीग्रस्त शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.

जैविक नियंत्रण : हुमणीला बरेचसे नैसर्गिक शत्रू आहेत. जसे कि, बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी तसेच मुंगुस, मांजर, कुत्रा इ. प्राणी हे हुमणीच्या अळ्या आवडीने खातात व हुमणीचे नियंत्रण करतात, म्हणून या पक्षी व प्राण्यांचे संवर्धन करावे.

जीवाणू ( बॅसिलस पॉपिली ), परोपजीवी बुरशी ( बिव्होरीया बॅसियाणा, व मेटारायझियम अनिसोप्ली ) सुत्रकृमी (हेटेरेहँबडेरीस) हे होलोट्रोकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.

मेटरायझीयम अनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करते. त्यामुळे अळ्यांचा बंदोबस्त होतो.

रासायनिक नियंत्रण : क्लोरोपायरीफॉस २०% २५ ते ३० मि. ली. किंवा फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रीड ४०% हे मिश्र कीटकनाशक ४ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून हुमणीग्रस्त झाडाभोवती आळवणी करावी.

प्रादुर्भावग्रस्त शेतांमध्ये पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट १०% दाणेदार हे कीटकनाशक २५ किलो किंवा कार्बोफ्युरॉन ३% सी. जी. ३३ किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे. जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे.

कंपोस्ट, बायोकंपोस्ट, शेणखत, प्रेसमड इ. मार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. उन्हाळ्यात शेणखत पसरून टाकल्यास सूर्याच्या उष्णतेमुळे अंडी व अळ्या मरतात.

हुमणी ही कीड बहुभक्षी व जमिनीत राहत असल्यामुळे सहजासहजी नियंत्रण होत नाही. त्यासाठी हुमणीग्रस्त गावातील सर्व शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रणासाठी सामुदायिक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »