असे थांबवा शेततळ्यातील बाष्पीभवन

0

शेततळ्यातील बाष्पीभवन थांबव
शाश्वत पाण्याचे स्त्रोत हवेत म्हणून शेततळे बांधले, पण बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पाणीटंचाईच्या काळात पिकांना आवश्यक पाणी देण्याकरिता बाष्पीभवन टाळायला हवे.
असे लक्षात आले आहे की तळी, धरणे किंवा कालवे यांसारख्या जलसाठ्यांतून वर्षाला साधारणपणे एकूण ४० ते ४२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. जेवढे तापमान जास्त असेल तेवढे बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते.

बाष्पीभवन टाळायचे उपाय:शेततळ्याचा पृष्ठभाग लहान ठेवा: द्रव्याचे आकारमान जेवढे जास्त, तेवढा बाष्पीभवनचा दर वाढत जातो. अधिक लांबी-रुंदी असणारे शेततळे बांधल्यास पाण्याचा हवेशी संपर्क येणारा भाग वाढतो. त्यामुळे साठविलेल्या पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होते. म्हणूनच अधिक खोली असणारे शेततळे बांधावे.

कुंपण:
शेततळ्याच्या बाजूने उंच व दाट झाडांचे कुंपण करावे. असं केल्यास वाऱ्याचे तापमान कमी होऊन उष्ण वाऱ्याद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होत. सागरगोटा, शिकेकाई, निर्गुडी, करवंद, खैर, जंगली गुलाब, सुबाभूळ, घाणेरी, बांबू, बोगनवेल, एरंड आदी वनस्पतींचा उपयोग करता येतो.

भिंत उभारणे:
वर सांगितल्या प्रमाणे जैविक कुपन उभारणे शक्य नसल्यास शेततळ्याच्या आजूबाजूने तीन मीटर उंचीची भिंत बांधता येऊ शकते. उपलब्ध माती व मुरुमाचा वापर करून तात्पुरती भिंत उभारल्यास हरकत नाही. भिंतीची उंची शेततळ्यापेक्षा जास्त असावी.

तेलांचा वापर:
निंबोळी किंवा एरंडी या वनस्पतिजन्य तेलांचा वापर करता येईल. पाण्याच्या पृष्ठभागावर या तेलांचा तवंग पसरवून बाष्पीभवन रोखता येते. हे तेल नैसर्गिक असल्याने वापरण्यास अपायकारक नाही. साधारणतः ३० ते ३५ चौरस मीटरपाण्याच्या पृष्ठभागासाठी एक लिटर तेलाची आवश्यकता असते. ग्रीस ऑइल तसेच वंगण तेलाचा वापर टाळावा. कारण हे घटक पाण्यातील सजीवांसाठी हानिकारक आहेत.

थर्माकोलचा वापर:
सध्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आली आहे. मात्र थर्माकोलबाबत असे सांगता येते की त्याच्या वापराने बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवता येते. औद्योगिक वसाहतीच्या भागामध्ये टाकाऊ थर्माकोल मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने उपलब्ध होते. त्याचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात. त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येऊन त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

अन्य घटक:
शेवाळ-जलपर्णी, पाला पाचोळा, तांदूळ व गव्हाचा भुसा, प्लॅस्टिक आदींचे आच्छादन करूनही शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »