जनावरांना मिनरल मिक्सर देने – लेख

0

दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षार व इतर घटकांचा विनिमय होत असतो.  या क्षारांची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात खनिजद्रव्ये असावीत. 

पशुखाद्यातील आवश्‍यक पोषकमूल्यांमध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश होतो. त्यामध्ये एकूण 22 खनिजे व जीवनसत्त्वे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक आहेत. त्याचबरोबर जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती टिकवणे, प्रजनन सातत्य राखणे, याकरिता आवश्‍यक संप्रेरकासाठी खनिजे व जीवनसत्त्वे आवश्‍यक आहेत. 

1) योग्य पोषणआहार न दिल्यास गर्भाशयाची वाढ अपुरी होते, प्रथम वेताचे वय वाढते. कालवडी किंवा पारड्या लवकर वयात येत नाहीत. माजावर न येणे, मुका माज असणे, फलित गर्भ मरणे, वारंवार उलटणे या प्रक्रिया सुरू होतात. 

2) प्रथिनांच्या कमतरतेमुळे जननक्षमता कमी होते. कर्बोदकांच्या कमतरतेमुळे शरीराची योग्य प्रमाणात वाढ होत नाही. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. गायी, म्हशी उलटतात. 

3) मोठ्या प्रमाणात लसूण घास व बरसीम, चवळी, गवार हे सर्व चारा स्वरूपात दिल्यास अशा चाऱ्यात वनस्पती इट्रोजन असल्यास म्युकोमेट्रा हा आजार होतो. 

4) तांदळाचा भेंडा, नेपिअर, उसाचे वाढे या चाऱ्यांमध्ये ऑक्‍झालिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्याची जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमबरोबर रासायनिक क्रिया होऊन कॅल्शियम ऑक्‍झलेट तयार होते, त्यामुळे जनावरांना कॅल्शियम मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे जनावरांचे मायांग बाहेर पडणे, जार अडकणे, गर्भाशयाचा ताठरपणा कमी होणे, उशिरा गर्भाशय पूर्वस्थितीवर येणे व गायी-म्हशी वारंवार उलटणे या विकृती निर्माण होतात. 


अ) जीवनसत्त्वे ः 

स्निग्ध विद्राव्य जीवनसत्त्वे (ए, डी, ई, के) ही सर्व यकृतामध्ये साठवली जातात. 

1) जीवनसत्त्व अ ः जीवनसत्त्व “अ’मुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहण्यास मदत होते. शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अथवा अभावामुळे वार न पडणे, जनावर उशिरा माजावर येणे, स्त्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबते. मुका माज असे दोष दिसून येतात. 

उपलब्धता ः हिरवा मका, हिरवे गवत. 

2) जीवनसत्त्व ड ः जीवनसत्त्व “ड’ हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात सुलभ रूपांतर होण्यासाठी आवश्‍यक असते. 

उपलब्धता ः जनावरे दररोज काही काळ उन्हात बांधावीत. वाळलेल्या गवतातून भरपूर प्रमाणात मिळते. 

3) जीवनसत्त्व ई ः जीवनसत्त्व ई व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे माजावर येतात. 


अ) खनिजांच्या कमतरतेची लक्षणे ः 

1) कॅल्शियम ः 

1) व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत होण्यास विलंब होतो. 

2) प्रोजेस्टेरॉन कमी श्रवते. 

3) स्त्रीबीजांडावर गाठी येतात. 

4) वार अडकतो. 

– अधिक कॅल्शियममुळे फॉस्फेरस , मॅंगेनिज, झिंक, कॉपर यांच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. 


2) फॉस्फरस ः 

1) जननक्षमता कमी होते, तसेच ऋतुचक्रात अनियमितता दिसून येते. 

2) स्त्रीबीजांड अकार्यक्षम राहते. 

3) माजावर न येणे. 

4) उशिरा वयात येणे. 

5) मृत वासरे जन्मतात किंवा जन्मतःच अशक्त असतात. 


3) मॅगेनीज ः 

1) माजावर न येणे. 

2) गर्भपात. 

3) वासरांच्या पायांच्या नसा आखडलेल्या असतात. 


4) कॉपर (तांबे) ः 

1) जननक्षमता कमी होणे. 

2) माजावर न येणे. 

3) वीर्य निकृष्ट दर्जाचे होणे. 


5) कोबाल्ट ः 

1) जनन क्षमता कमी. 

2) कालवडी उशिरा वयात येतात. 

3) गर्भपात. 

4) अकार्यक्षम ग्रंथी. 

5) अशक्त वासरे जन्मतात. 


6) आयोडीन ः गर्भाची योग्य वाढ व शारीरिक क्रिया सामान्य ठेवण्यासाठी आवश्‍यक असते. याच्या कमतरतेमुळे खालील परिणाम दिसतात. 

1) स्त्रीबीजांडाची विकृती. 

2) अकार्यक्षम बीजांड. 

3) वार अडकणे. 

4) गायी-म्हशी उलटणे. 

5) केस नसलेले वासरू जन्मास येणे. 

6) कमी प्रतीचे वीर्य तयार होणे. 


7) सेलेनियम ः 

1) वार न पडणे, मुका माज, शुक्राणूंची हालचाल मंदावतात. 

2) गर्भपात होणे. 

3) मृत वासरास जन्म देणे. 


8) झिंक ः व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत करण्यास अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून झिंक कार्य करते. कमतरतेची लक्षणे ः 

1) स्त्रीबीजांडावर गाठी. 

2) लवकर वयात न येणे. 

3) माज अनियमित. 

4) नरामध्ये लैंगिक पैशींची वाढ न होणे. 

5) विर्याची प्रत घटणे. 

6) वृषणाचा आकार कमी होतो. 


9) मॅग्नेशियम ः 

1) भूक मंदावणे. 

2) वजन कमी होणे. 

3) संप्रेरके मंदावतात. 


10) क्रोमीअम ः 

1) स्त्रीबीजांड वाढ न होणे. 

2) अपुरे ल्युटीनायझिंग हार्मोनची निर्मिती. 


11) सोडियम व पोटॅशियम ः 

1) सोडियमच्या अभावामुळे शरीरात प्रथिने व ऊर्जेचे योग्य शोषण होत नाही. 

2) पोटॅशियमच्या अभावामुळे मांसपेशीक्षमता कमी होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 


12) मॉलिब्डेनम ः 

1) प्रजनन संस्थेचे कार्य बिघडते. 

2) प्रजनन इच्छा कमी होते. 

3) नरामध्ये शुक्राणू संख्येचे प्रमाण कमी तसेच वंध्यत्व. 

4) माज उशिरा दाखवणे. 

5) गर्भधारणेचे प्रमाण कमी. 


—————- 

इन्फो ः 

खनिजांचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ः 

दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षारांचा व इतर घटकांचा विनिमय होत असतो, याची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात खनिजद्रव्यांचे योग्य प्रमाण असावे. 

मुख्य खनिजे ः कॅल्शियम, फॉस्फरस मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इ. 

अल्पप्रमाणात लागणारी खनिजे ः लोह, तांबे, झिंक, सेलोनियम, मॉलिब्डेनम इ. 

1) कॅल्शियम जनावरांच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात असते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण 1.30-1.35 टक्के एवढे असते. यामुळे दुधनिर्मितीचे कार्य व्यवस्थित चालते. 

2) याच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरात दुग्धज्वर यासारखे आजार होतात. 

3) हा आजार जनावर व्याल्यानंतर 24 ते 72 तासांनंतर आढळून येतो. 

4) हा आजार प्रामुख्याने तिसऱ्या-चौथ्या वेतानंतर हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे दुधाद्वारा कॅल्शियमचा जास्त प्रमाणात निचरा होणे, चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे आणि “ड’ जीवनसत्त्वाचा अभाव हे आहे. 

उपाययोजना ः 

1) रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण तपासून निश्‍चित निदान करावे. 

2) प्रमाण कमी असल्यास पशुवैद्यकाकडून ताबडतोब कॅल्शियमयुक्त व इतर औषधे शिरेतून द्यावीत. 

3) पौष्टिक आहार व स्वच्छ पाणी द्यावे. 

4) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुधाळ जनावरांना दररोज 30-50 ग्रॅम कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रण द्यावे. थंडीपासून संरक्षण करावे.     सूचना।। सदर मिश्रण हे पशुवैदक  सल्ला घेऊन देणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »