पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य

2
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन, मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
– प्रमुख अन्नद्रव्ये – ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
– दुय्यम अन्नद्रव्ये – कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42)
– सूक्ष्म अन्नद्रव्ये – लोह (Fe2+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu2+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3), मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-), निकेल (Ni2+)

सूक्ष्म अन्नद्रव्ये व त्यांची वैशिष्ट्ये –
१) बोरॉन – वनस्पतीत बोरॉन हे अन्नद्रव्य १० ते २० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम या प्रमाणात पुरेसे असते. बोरॉनच्या वापरामुळे झाडांमध्ये कॅल्शियम ग्रहण करण्याची शक्ती वाढते व मुळांची वाढ होते. कमतरतेची लक्षणे ः
– झाडांच्या वरच्या भागाचा विकास होत नाही, पाने गळून पडतात व झाडांवर अनेक प्रकारचे रोग येतात, तसेच पिकांवर तांबट ठिपके पडतात.
– फळझाडांची फळे तडकतात. झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात, सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.
बोरॉन खते – बोरॅक्समध्ये १०.५ टक्के, बोरिक ॲसिडमध्ये १७.५ टक्के, तर सोल्युबरमध्ये १९ टक्के बोरॉन असते.
फवारणी – ५० ग्रॅम बोरिक ॲसिड पावडर प्रति १०० लिटर पाण्यातून पानावर फवारणी करावी.
२) लोह-
वनस्पतीत लोह हे अन्नद्रव्य १०० ते ५०० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम या प्रमाणात योग्य मानले जाते. लोहाचा पुरवठा केल्यास झाडांमध्ये प्रोटिन संश्लेषणाचे कार्य वाढते, तसेच ऑक्सिजनचे वहन होते, हरितद्रव्य तयार होतात.
– कमतरतेची लक्षणे – झाडांच्या वरची पाने पिवळी पडतात. फळझाडांच्या पाने व शिरांमध्ये पिवळेपणा येतो. विशेषतः शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो, झाडांची वाढ खुंटते.
– लोहयुक्त खते – फेरस सल्फेटमध्ये १९ टक्के, तर आयर्न ईडीटीएमध्ये १२ टक्के लोह असते.
– पूर्ततेसाठी – हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेट अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
३) तांबे –
पिकांमध्ये तांब्याचे प्रमाण ५ ते ३० मिलिग्रॅम प्रतिकिलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. तांब्यामुळे ‘अ’ जीवनसत्त्व निर्माण करण्यास मदत होते.
कमतरतेची लक्षणे –
– भाजीपाला पिकांमध्ये व कांदा या पिकांमध्ये तांब्याची कमतरता असल्यास करपा हा रोग होतो.
– मादी वर्गातील झाडे वरपासून खालपर्यंत सुकत येतात. पानांची टोके पांढरी होतात व गळून पडतात. सर्वसाधारणपणे पिकात नत्र कमतरतेप्रमाणे याची लक्षणे असतात.
– लिंबू प्रजातीमध्ये फळांमध्ये डिंक जमा होतो आणि पाने कुरूप होतात, झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो, खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात.
ताम्रयुक्त खते – कॉपर सल्फेटमध्ये २४ टक्के, तर कॉपर ईडीटीएमध्ये ९ ते १३ टक्के कॉपर असते. याकरिता मातीपरीक्षणानुसार जमिनीतून कॉपर सल्फेट द्यावे किंवा मोरचूद ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडांवर मोरचूदची फवारणी करावी.
४) जस्त –
सर्वसाधारण पिकांमध्ये तांब्याचे प्रमाण २७ ते १५० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. जस्तामुळे झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते व संजीवके तयार होतात.
कमतरतेची लक्षणे –
– फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते.
– गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात.
– मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत.
– जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.
जस्तयुक्त खते –
झिंक सल्फेट मध्ये जस्त २१ टक्के, झिंक ऑक्साइडमध्ये ५५ ते ७० टक्के व झिंक ईडीटीएमध्ये १२ टक्के एवढे असते. माती परीक्षणानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा अर्धा ते १ किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यातून पिकावर फवारावे.

2 thoughts on “पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »