कांदा सड (मर रोग) –
जमिनीतील फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरम बुरशीच्या
प्रादुर्भावामुळे कांदा सड (मर) रोग येतो. काही
वेळेस रोपवाटिकेत लागण झाल्यास तसाच पुढे
त्याचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाच्या
प्रादुर्भावाने सुरवातीला पाने पिवळसर होऊन वाढ
खुंटते. यानंतर पाने शेंड्याकडून करपत येतात. मुळे गुलाबी
होऊन सडतात, तसेच मुळालगतचा भाग सडतो. असे कांदे
सहज उपटता येतात.
उपाययोजना –
1) मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जमिनीत चार
वर्षे कांदा पीक घेऊ नये, पिकाची फेरपालट करावी.
2) जमिनीची योग्य निवड, लागवडीच्या वेळेस
ट्रायकोडर्माचा वापर करावा. 10 ग्रॅम
कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात द्रावण
तयार करून या द्रावणात रोपे बुडवून लावावेत.
3) रोगाचे लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम +
20 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
जिरवणी करावी.
जांभळा करपा –
अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे
जांभळा करपा येतो. या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण
खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी
वातावरणामुळे जास्त वाढते. रोगाच्या
प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर सुरवातीला
लहान, खोलगट पांढुरके ठिपके/ चट्टे पडतात. या
चट्ट्याचा मध्य भाग जांभळट- लालसर रंगाचा होऊन
कडा पिवळसर दिसतात. दमट हवामानात रोगाचे
प्रमाण वाढून या चट्ट्याच्या ठिकाणी तपकिरी
किंवा काळपट बुरशीची वाढ होते. चट्ट्याचे प्रमाण
वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून जळू लागतात. व संपूर्ण
पात जळाल्यासारखी दिसते. पाती जळाल्याने
कांदा चांगला पोसत नाही आणि चिंगळी
कांद्याचे प्रमाण वाढते. रोगाचा प्रादुर्भाव
रोगग्रस्त झाडाचे अवशेषापासून एका हंगामातून
दुसऱ्या हंगामात, तसेच दुय्यम प्रसार पाणी आणि
हवेमार्फत झपाट्याने होतो.
काळा करपा –
कोलिटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे काळा करपा
रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात दिसून येतो.
या रोगामुळे सुरवातीच्या पानांवर फिक्कट
पिवळसर डाग पडून त्या ठिकाणी आणि मानेवर
बुरशीचे वर्तुळाकार काळे डाग पडतात. रोगाचे
प्रमाण जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्यामुळे
जास्त वाढून पाने करपतात. पाण्याचा निचरा न
झालेल्या ठिकाणी माना लांबलेल्या दिसतात
आणि कांदा सडतो.
तपकिरी करपा –
स्टेम्फीलियम नावाच्या बुरशीमुळे तपकिरी करपा
रब्बी हंगामात येतो. सुरवातीला पानांवर पिवळसर
ते तपकिरी चट्टे पडतात. चट्ट्याचे प्रमाण बुंध्याकडून
शेंड्याकडे वाढत जाऊन पाने तपकिरी पडून सुकतात.
पाती सुरकुतल्यासारखी आणि शेंडे जळाल्यासारखे
दिसतात.
करपा रोगनियंत्रणासाठी उपाययोजना –
1) पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
2) रोपवाटिकेत बुरशीनाशक, कीटकनाशकाची
फवारणी करावी.
3) लागवड करण्यापूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या
द्रावणात बुडवून लावावीत.
4) लागवडीनंतर रोगाची लक्षणे दिसताच दर 10
दिवसांच्या अंतराने 10 मि.लि. अझॉक्झिस्ट्रॉबीन
किंवा 10 मि.लि. टेब्युकोनॅझोल प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून जांभळा करपा आणि काळा करपा
रोगाच्या नियंत्रणासाठी चार फवारण्या
कराव्यात.
फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी वरील
बुरशीनाशकाबरोबर 15 मि.लि. फिप्रोनील किंवा
10 मि.लि. प्रोफेनोफॉस अधिक 10 मि.लि. स्टिकर
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »