खरीप बटाटा लागवड

0
खरीप बटाटा लागवड
बटाटा हा आडसाली ऊसात उत्तम आंतरपिक ठरतोय. आमच्या जवळबन येथील शेतकर्याने एकरी ७० क्विंटल उत्पन्न आंतरपिकात तर सलग लागवड क्षेत्रात  ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
आंतरपिक घेतल्यास उसाच्या पूर्ण खर्चाचे उत्पन्न बटाटा काढून देतो. यात बेणे निवड, त्याचा दर कमी करुण खरेदी करने आणि विक्री करताना किमान ८-९ रुपये प्रति किलो दर मिळवने हे जमल्यास हे पीक उत्तम नफा देतो.त्याच्या लागवड बाबत सविस्तर:
बटाट्याचे पीक मूळचे शीत हवामानातील आहे. थंड हवामान बटाटावाढीस पोषक आहे. या पिकासाठी खालीलप्रमाणे हवामान आवश्यक असते.
*तापमान- बटाटा लागवडीच्या वेळी २२ ते २५ अंश सेल्सिअस.पीकवाढीच्या सुरवातीच्या ४५ दिवसांच्या काळात २० ते २२ अंश सेल्सिअस. बटाटे (कंद) व त्याच्या वाढीच्या काळात (लागवडीपासून ४५ ते ६० दिवसांचा काळ) १७ ते २० अंश सेल्सिअस. बटाटेवाढीच्या काळात (६० ते ९० दिवस) २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
बटाटा पीकवाढीच्या कालावधीत तापमान जर ३६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास बटाटे पोसणे जवळजवळ बंद होते. उच्च तापमानामुळे बटाटा पिकामध्ये श्वासोच्छ्वास वाढतो आणि प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे पिष्टमय पदार्थ हे तयार झालेल्या बटाट्यातून घेतले जातात. झाडे पसरण्याऐवजी सरळ उंच वाढतात, पाने कोमेजतात, तसेच कंद निमुळते वाढतात आणि बटाटे तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
*आर्द्रता – बटाटा पीकवाढीच्या अवस्थेत ६५ ते ८० टक्के
*सूर्यप्रकाशाचे तास – १० तास प्रति दिवस
– बटाट्याच्या शाखीय वाढीच्या काळात दिवस मोठा व रात्र लहान असणे व बटाटे पोसण्याच्या काळात दिवस लहान व रात्र मोठी असणे आवश्यक आहे.
*
लागवड कालावधी – जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा.
*जमीन –
– चांगली निचऱ्याची, भुसभुशीत, कसदार व चांगले सेंद्रिय घटक असणारी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. रेतियुक्त पोयट्याची जमीन या पिकास फायदेशीर आहे. जर सामू ६.५ च्या खाली असेल तर जमिनीतील स्फुरद, मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये झाडांना कमी प्रमाणात उपलब्ध होतात. जास्त आम्लधर्मी, तसेच चोपण जमिनीत लागवड केल्यास पोटॅटो स्कॅब हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
*बटाटा लागवडीच्या पद्धती –
१) सपाट वाफे पद्धत – या पद्धतीत पूर्वमशागतीनंतर ६० सें. मी. अंतरावर हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्यांमध्ये लागणारी रासायनिक खते देऊन नंतर बटाटे बेणे २० सें. मी. अंतरावर मातीने झाकून घ्यावेत. सर्व बेणे झाकून झाल्यानंतर उलट्या वखराच्या साह्याने सपाटीकरण करावे. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य आकाराचे वाफे तयार करून हलके पाणी द्यावे.
२) सुधारित सरी – वरंबा पद्धत – या पद्धतीत मार्करच्या साह्याने ६० सें. मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी. त्या रेषेत २० सें. मी. अंतरावर बटाटे बेणे अंथरून घ्यावे. नंतर बैलाच्या रिझरने बटाटे बेणे वरंब्यात झाकून घ्यावे. लागवडीनंतर हलकेच पाणी द्यावे. ही पद्धत सोपी, कमी खर्चाची आहे.
३) रुंद गादी वाफा पद्धत – या सुधारित पद्धतीमध्ये तीन फूट रुंद वाफे तयार करून, त्यावर २ फूट अंतरावर बटाट्याची २ ओळींत लागवड केली जाते. प्रत्येक वाफ्यावर २ ओळींच्या मध्ये एक ठिबकची लॅटरल टाकली जाते. लागवडीनंतर पिकास ठिबक सिंचनाद्वारा पाणी, तसेच खते दिली जातात. या पद्धतीत बटाटा पिकाची वाढ जोमाने होते. रुंद गादी वाफा पद्धतीत ठिबक सिंचन पद्धतीबरोबरच तुषार सिंचन पद्धत ही फायदेशीर आहे.
४) यंत्राद्वारा बटाटा लागवड – केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र, लुधियाना यांनी विकसित केलेल्या ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने बटाटे लागवड करता येते. त्याद्वारा बटाटा बेणे लागवड ६० सें. मी. अंतरावर होऊन सरी- वरंबे तयार होतात. लागवड कमी वेळ, मजूर व खर्चामध्ये पूर्ण होते.
महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशित बटाटा वाण- कालावधी (दिवस)-उत्पादन (टन प्रति हेक्टरी)-वैशिष्ट्ये
कुफरी सूर्या-९० – १००-३०-३५-झाडे उंच जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकर्षक लांबोळे, पांढऱ्या रंगाचे, डोळे उथळ आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे, ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, उच्च तापमानाला अनुकूल आणि रोगप्रतिकारक.
कुफरी पुखराज-९०-१००-३५-४०-झाड मध्यम ते जोमदार वाढणारे, बटाटे लांबोळे, फिकट पांढऱ्या रंगाचे व पिठूळ, डोळे मध्यम खोल, अंकुर जांभळ्या रंगाचे, फुले पांढरी, खरीप आणि रब्बी, दोन्ही हंगामांत चांगले उत्पन्न मिळते. लवकर येणाऱ्या करप्यास प्रतिकारक व उशिराच्या करप्यास मध्यम प्रतिकारक.
चिपसोना – १-७५-९०-३०-३५-झाड मध्यम उंच जोमदार वाढणारे, बटाटे मध्यम ते मोठ्या आकाराचे, डोळे उथळ आणि अंकुर पांढरट हिरवे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्ससाठी उपयुक्त, उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना – २-७५-९०-३०-३५-बटाटे गोल अंडाकृती, मध्यम आकाराचे आणि पांढरे असतात. डोळे उथळ असतात, अंकुर फिकट लाल पिवळसर असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, धुक्यास प्रतिकारक आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना ३-७५-९०-३०-३५-झाडे जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकाराचे, पिवळसर रंगाचे आतून फिक्कट पांढरे, डोळे खोल आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक. साठवणुकीस उत्तम.
*बटाटा बियाणे निवड –
– बटाटा बेणे निरोगी, उत्तम दर्जाचे आणि भेसळमुक्त असावे.
– बेणे मध्यम आणि सारख्या आकाराचे असावे. मोठ्या आकाराच्या बेण्यामुळे बेण्यावरील खर्च वाढतो. लहान आकाराच्या बेण्यातून निघणारा कोंब कमकुवत राहून झाडांची वाढ योग्य होत नाही.
– लागवडीसाठी बेण्याचे वजन ३० ते ४० ग्रॅम असावे.
– बटाटा बेणे थंड हवामानात तयार झालेल्या बेण्यापासून अधिक उत्पादन मिळते.
– बटाटा बेणे पूर्ण पोसलेले, परिपक्व, चांगले मोड असलेले असावे. सामान्यपणे बेण्यावर एक सें. मी. आकाराचे जाड अंकुर असावेत. अंकुर अधिक लांब नसावेत. लागवडीवेळी मोडण्याची शक्यता असते.
– कोमेजलेले, तसेच सडलेले बटाटे काढून टाकावेत. बटाटा बेणे करपा आणि मर रोगांपासून मुक्त असावे.
– बेणे अपरिपक्व असल्यास उगवण नीट होत नाही, तर सुप्तावस्थेतील बेणे उशिरा उगवते. परिणामी, पीक तयार होण्याचा कालावधी वाढतो. बटाटा बेण्यावर डोळे नसल्यास ते वापरू नये.
*बीजप्रक्रिया –
– बटाटा बियाणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि इमिडाक्लोप्रिड (२०० एसएल) ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे बटाटा बियाणे बुडवून घ्यावे.
– लागवडीपूर्वी २.५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५०० मिलि द्रवरूप ॲसिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून २० क्विंटल बियाणे १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »