कपाशी उत्पादन खर्चात बचत

0
शिफारशीत तंत्रज्ञानामुळे होईल कपाशी उत्पादन खर्चात बचत
राज्यामध्ये बीटी कपाशीखाली सर्वाधिक क्षेत्र असूनही कापसाची उत्पादकता अत्यंत कमी आहे. शेतकरी खत-पाणी, कीडनियंत्रणासाठी खर्च करत असले तरी केवळ लागवड खर्चात वाढ होते. त्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये वाढ होत नाही. उत्पादन खर्च किमान पातळीवर ठेवून, उत्पादकता वाढविण्यासाठी खालील शिफारशी उपयुक्त ठरतील. 
सध्या कपाशी लागवडीमध्ये सर्वाधिक खर्च हा कीडनियंत्रण, खते, तणनियंत्रणासाठी निंदणी- खुरपणी या बरोबरच कापूस वेचणीला मजुरी यावर होतो. 

मशागत – जमिनीची मशागत करून उताराच्या दिशेने व्यवस्थित वाफे तयार करावेत, त्यामुळे जमिनीची धूप कमी होण्यासोबतच बियांची उगवणक्षमता वाढते.
चर काढणे – जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाचे पाणी शेतात साचून राहते. विशेषतः काळ्या मातीत पाण्याचा निचरा होत नाही. कापूस वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये साचलेल्या पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतो.
उपाययोजना –
१) पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या किंवा चर काढावेत.
२) सरी-वरंब्यावर किंवा बीबीएफ पद्धतीने कपाशीची लागवड करावी. यामुळे हळूहळू पाणी निघून जाते. जमिनीत ओलावा टिकून राहतो.
वाणाची निवड –
शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या व रसशोषक किडींना सहनशील असलेल्या कापूस वाणाची निवड करावी. 
१) पीकेव्ही-०८१ आणि एनएच-६१५ हे कमी कालावधीचे व तुडतुड्यास सहनशील वाण आहेत, तर सूरजच्या तंतूची गुणवत्ता उत्तम असून, ते दुष्काळातही तग धरून राहते. उत्पादनही अधिक मिळते. २) देशी वाणाची निवड करताना बाजारातील मागणीनुसार वाणाची निवड करावी. (उदा. फुले धन्वंतरी हे लवकर येणारे व सघन लागवडीसाठी सुयोग्य असे वाण असून, सर्जिकल कॉटनसाठी उत्तम आहे.) 
लागवडीची वेळ –
१) कोरडवाहू शेतीमध्ये पावसाळा सुरू होताच त्वरित पेरणी करावी. संकरित वाणाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. सरळ वाणांचे बी स्वस्त असल्याने धूळ पेरणीसुद्धा करता येऊ शकते.
२) पेरणीची योग्य वेळ ठरविण्यास वातावरणाचा हात असतो. वातावरणानुसार व आपल्या अनुभवाद्वारे शेतकऱ्यांनी योग्य वेळ ठरवावी. उशीर झाल्यास शीघ्र परिपक्व होणाऱ्या वाणांची लागवड करावी, त्यामुळे पीक वाढीच्या काळात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो. 
ओळींमधील अंतर व रोपांची संख्या –
१) रोपांची संख्या योग्य ठेवणे गरजेचे आहे.
२) बीटी कपाशीची लागवड त्याच्या शिफारसीत अंतरावरच करावी. ओळींमधील अंतर मातीचा प्रकार पाहून ठरवावे. जसे उथळ जमिनीत दोन ओळींतील अंतर कमी असावे, तर भारी काळ्या मातीत जास्त अंतर ठेवावे. जिरायती शेतीत बीटी कपाशीसाठी ९० x ३० सें.मी. अंतर चांगले मानले जाते, तर ओलीतामध्ये रुंद ओळी असाव्यात. दोन रोपामध्ये अधिक अंतर ठेवावे.
३) शेताच्या काठावर चोहोबाजूंनी २ ते ३ ओळी तुरीच्या पेरल्यास मिली बग (दह्या)पासून कापसाचे संरक्षण होण्यास मदत होते.
४) कमी कालावधीच्या देशी वाणांची पेरणी सघन पद्धतीने ६० x १० सें.मी. (४५ x १० सें.मी. फुले धन्वंतरीसाठी) करावी. 
अन्नद्रव्य व्यवस्थापन –
१) योग्य प्रमाण व समतोल, २) योग्य खत, ३) योग्य पद्धत आणि ४) योग्य वेळ ही चतुःसूत्री लक्षात ठेवावी. 
शिफारसीत मात्रा (नत्र, स्फुरद व पलाश प्रति एकर) 
१) योग्य समतोल – अति प्रमाणात युरियाचा वापर केल्यामुळे पानांची वाढ होऊन, झाड रसशोषक किडी व रोगांसाठी अतिसंवेदनशील बनते. तीनही मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.
२) योग्य पद्धत – झाडांच्या मुळांशी खत टाकून मातीने झाकणे, उत्तम पद्धती असून, खतातील नत्र उडून जात नाही किंवा जमिनीत झिरपतही नाही.
३) योग्य वेळ – पिकाच्या वाढीनुसार योग्य त्या खताचा वापर करावा. नत्रयुक्त खतातील नत्र हवेत उडून जाते किंवा पाण्यासोबत वाहून जाते. हे टाळण्याकरिता पिकाच्या वाढीच्या वेळी, आवश्यकतेनुसार नत्राची भागामध्ये ३ सम प्रमाणात विभागणी करावी. अर्धी मात्रा पेरणीच्या वेळी, उरलेली पाती आणि बोंड येताना विभागून द्यावी. मात्र स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.
४) पालाशची गरज भागविण्यासाठी बोंड मोठे होताना पोटॅशिअम क्लोराईड किंवा पोटॅशिअम नायट्रेटची कपाशीच्या झाडावर (पानांवर) फवारणी करावी.
५) माती परीक्षणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. उदा. जस्त कमी असलेल्या जमिनीत झिंक सल्फेट (५ किलो/ एकर) द्यावे. तसेच पीक वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर कमतरता दिसली तर १ टक्का मॅग्नेशिअम सल्फेट, २ टक्के युरिया, ०.५ झिंक सल्फेट आणि ०.२ टक्के बोरॉन १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे. त्यापाठोपाठ २ टक्के डीएपीची फवारणी सुद्धा चांगले परिणाम करते. यामुळे झाडे सशक्त बनतात. लाल्या या विकृतीला प्रतिकारक बनतात. 
१) सुरवातीच्या ४० दिवसांपर्यंत तणामुळे कापसाच्या उत्पादनावर दुष्परिणाम होतो. कपाशी हळूहळू (संथगतीने) वाढणारे पीक असून, तुलनेमध्ये तण वेगाने वाढतात. त्याचा फटका उत्पादनाला बसतो. २) तण प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीवेळी किंवा उगवणीच्या आधी ट्रिल्फोरॅलिन २.५ लिटर किंवा पेंडीमिथॅलीन ३ लिटर किंवा फ्लूक्लोरॅलीन २.५ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीवर फवारावे. हे सर्व तणनाशके हवेत उडून जात असल्याने डवऱ्याने जमिनीत मिसळून द्यावे.
३) तण उगवल्यानंतर द्यावयाची खालीलपैकी योग्य तणनाशकाची २ ते २.५ मि. लि. प्रति लिटर किंवा २०० लिटर प्रति हेक्टर या दराने फवारावे.
– गवतवर्गीय व लव्हाळा जातीच्या तण नियंत्रणासाठी प्रॉपिक्विझालोफॉप इथिल वारावे.
– नुसते गवतांकरिता क्विझालोफॉप-इथिल किंवा फिलॉक्सिप्रोप इथिल किंवा फ्लूॲझिफोप ब्युटील फवारणे फायदेशीर ठरते.
– रुंद पानांच्या तणांकरिता पॅरॅथिओबॅक सोडीअमचा वापर करावा.
– ज्या ठिकाणी हाताने तण काढणे, निंदणे, खुरपणे विशेषतः ओल्या मातीत शक्य नसते अशा ठिकाणी पीक/ तण उगवल्यानंतर तणनाशकांची फवारणी उपयोगी ठरते. तणनाशके सुरवातीच्या कोवळ्या तणांवर खास करून गवतांवर १०-१५ दिवसांच्या तणांवर अधिक प्रभावी असतात. 
Source:
संपर्क – रचना देशमुख,
email – blaise_123@rediffmail.com
(डी. ब्लेज हे केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे कृषी शास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.) 

View this post on Instagram

A post shared by कृषी न्यूज | Krushi News (@krushinews)

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »