कडधान्य पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

0

कडधान्य पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

कडधान्य पिकांसाठी शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांव्यतिरिक्त विशेष अन्नद्रव्ये व्यवस्थापन म्हणून काही अन्नद्रव्ये वापराच्या बाबतीत लक्ष दिल्यास निश्चितच कडधान्य पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढते. स्फुरद, कॅल्शियम, फेरस व मोलाब्द ही अन्नद्रव्ये कडधान्य पिकात नत्र स्थिरीकरण प्रक्रियेसाठी विशेषतः आवश्यक असतात. 

सर्व डाळवर्गीय पिके, तसेच सोयाबीन, भुईमुगाच्या मुळावर नत्राच्या गाठी असतात. या गाठींत रायझोबियम जीवाणू सहजिवी पद्धतीने राहतात. गाठींतील जीवाणू हवेतील नायट्रोजन वायूचे रूपांतर अमोनिकल नत्रामध्ये करून ते पिकाला उपलब्ध करून देतात. मग पिके अमोनिकल नत्र स्वतःच्या वाढीसाठी वापरतात आणि त्याबदल्यात रोपे रायझोबियम जिवाणूंना आधार, प्रथिने व ऊर्जा देतात; परंतु हवेतील नायट्रोजन (नत्र) वायूचे रूपांतरण होऊन पिकाला नत्र स्वरूपात मिळणे एक विस्तृत प्रक्रिया आहे आणि जगभर या विषयावर मोठे संशोधन झाले आहे. याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, की आपण नत्राचे हे नैसर्गिक रूपांतरण वाढवू शकतो. म्हणजे आपल्या पिकाला व जमिनीतील वातावरणाला नत्र मोफत स्वरूपात मोठ्या प्रमाणात मिळेल. 

१) साधारणतः कडधान्ये, तुरीचे किंवा सोयाबीन काढणीनंतर जमिनीत २५ किलो नत्र प्रतिहेक्टर म्हणजे अंदाजे ५५ किलो युरिया एवढे नत्र मिसळत असते. यासाठी कडधान्य पिकाला खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये विशेष रूपाने दिली पाहिजेत. यामुळे मुळावरील गाठी मोठ्या होतील, जिवाणूला चांगले काम करता येईल आणि अधिक नायट्रोजन (नत्र) रूपांतरित होईल, पिकाची वाढ चांगली होऊन भरघोस उत्पादन मिळेल. 
२) मुळावरील नत्राच्या गाठींच्या संख्येपेक्षा त्या गाठींचा आकार मोठा करणे गरजेचे आहे. मुळावर नत्राच्या भरपूर व फुगीर गाठी म्हणजे भरपूर उत्पादनाची हमी. 

मोलाब्द (Mo) ः 
१) सर्व पिकांना अत्यावश्यक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य. नत्राच्या गाठी असणाऱ्या पिकात महत्त्वाचे. 
२) हे झाडामध्ये नायट्रोजनेज नावाचे विकर तयार करते आणि हेच विकर नत्र रूपांतरण प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असते. 
३) कडधान्य पिकात वातावरणातील नत्र रूपांतर प्रक्रियेत मोलाब्द हे आधारस्तंभ. 
४) आम्लयुक्त जमिनी (जसे कोकणातील माती)मध्ये मोलाब्दची कमतरता आढळून येते, तर आम्लरीधर्मी जमिनीत पुरेसे असते म्हणजे जमिनीचा सामू (पीएच) वाढला, तर मोलाब्दाची उपलब्धता वाढते. 
५) सहसा मॉलिब्डेनम हे खतातून देण्याची गरज पडत नाही; परंतु नत्राच्या गाठी तयार होऊन वाढण्यासाठी याची विशेष गरज असल्याने मोलाब्द देण्याची आवश्यकता असते. कारण मोलाब्द अन्नद्रव्य अत्यंत कमी लागते. जमिनीतील त्याचे प्रमाणही सर्वांत कमी आढळते. 
६) मोलाब्द अन्नद्रव्य खतातून जास्त झाले, तरी त्याची बाधकता झाडाला येत नाही. 
७) डाळवर्गीय पिकामध्ये जी प्रथिने तयार होतात, त्या प्रक्रियेत मोलाब्द महत्त्वाची भूमिका बजावते. 
८) मोलाब्दमुळे कडधान्य पिकाला दिलेल्या स्फुरदाची कार्यक्षमता वाढून पीक उत्पादनात वाढ होते. त्यामुळे डाळवर्गीय पिके पेरणी अथवा लागवड करताना मोलाब्दचा वापर करावा. 
९) जमिनीतून अमोनियम मॉलिब्डेट किंवा सोडियम मॉलिब्डेट २५० ग्रॅम प्रतिहेक्टर मुख्य अन्नद्रव्यांसोबत द्यावे. 

फेरस/ लोह (Fe) ः 
१) मुळावरील नत्राच्या गाठी आपण दाबून पिळल्या, तर त्यातून गुलाबी द्रव बाहेर येतो. ते फेरस – लेगहिमोग्लोबिन द्रव असते. 
२) मानवी रक्तातील हिमोग्लोबिनप्रमाणे कडधान्य पिकांच्या मुळाच्या नत्र गाठीमध्ये लेग-हिमोग्लोबिन हा घटक असतो. याचा वापर करून रायझोबियम जीवाणू चांगले श्वसन करतात. पर्यायाने जिवाणूंचे कार्य चांगले होते. 
३) फेरस अन्नद्रव्य हा जिवाणूकडून होणाऱ्या नत्र रूपांतरण क्रियेतील केंद्रीय मूलद्रव्य आहे. म्हणून मुळावरील गाठींकरिता कडधान्य पिकांची फेरसची गरज ही इतर पिकांच्या गरजेपेक्षा जास्त असते. 
४) चुनखडीयुक्त जमिनीत व कडधान्य पिके घेणाऱ्या जमिनीत फेरसची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे लोहयुक्त खतांची बाहेरून देण्याची गरज पडते. 
५) कडधान्ये पेरणी करताना जमिनीतून फेरस सल्फेट २५ किलोग्रॅम प्रतिहेक्टर मुख्य अन्नद्रव्ये खतांसोबत द्यावे. 

कॅल्शियम (Ca) ः 
१) रायझोबियम जीवाणू आणि रोप यांच्यामधील सुसंवादाचे काम कॅल्शियम करते. 
२) जिवाणूंशी मुळाचा संपर्क झाल्यानंतर मुळाच्या पेशीमध्ये कॅल्शियमच्या अन्नद्रव्यामुळे मुळावर गाठ होऊ देण्यास झाड तयार होते. यामुळे पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत कॅल्शियम कमतरता होऊ देऊ नये. 
३) उथळ व हलक्या जमिनीतील कडधान्य पिकांसाठी कॅल्शियम व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. 
४) दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेटमधून कॅल्शियमची गरज भागवली जाते. 

स्फुरद (P) ः 
१) स्फुरद अन्नद्रव्य जैविक ऊर्जा पुरवते. या जैविक ऊर्जेचा वापर करूनच नत्र वायूचे रूपांतर होते. कारण नत्राचे अमोनिकल नत्रमध्ये रूपांतर या प्रक्रियेकरिता जैविक ऊर्जा लागते. ती ऊर्जा स्फुरदापासून मिळते. त्यामुळे गाठी तयार होण्यासाठी म्हणजे गाठीची स्फुरदाची गरज जास्त प्रमाणात असते. 
२) कडधान्य पिके घेणाऱ्या जमिनीत स्फुरदाची कमतरता दिसते. जमिनीचा सामू जास्त असल्याने दिलेला स्फुरद जास्त प्रमाणात लागू होत नाही व स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता कमी होते. 
३) जमिनीतील व खतांद्वारे दिलेला स्फुरद पिकास उपलब्ध होण्यासाठी नत्र स्थिरीकरण करणारे (रायझोबियम) जिवाणू सोबतच स्फुरद विरघळणारे (पीएसबी) जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. दोन्हीची एकत्रित बीजप्रक्रिया करता येते. याकरिता प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. शक्य झाल्यास द्रवरूप जीवाणू खतांचा वापर करावा. 

कडधान्य पिकांसाठी अन्नद्रव्ये वापरण्याची पद्धत ः 
१) बीजप्रक्रियेद्वारे वापर ः 
मोलाब्दची बीजप्रक्रिया करता येते. कारण यांची गरज खूपच अत्यल्प असते. १० ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेट किंवा सोडियम मॉलिब्डेट प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. द्रवरूप किंवा घनरूप जीवाणू खतांसोबत बीजप्रक्रिया करता येते. 
२) फवारणीद्वारे वापर ः 
शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ ची एक टक्के प्रमाणात फवारणी (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) दोनदा करावी. पहिली फवारणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी, तर दुसरी फवारणी ६० ते ६५ दिवसांनी करावी. या ग्रेड २ मध्ये फेरस व मॉलिब्डेनम दोन्ही आवश्यक अन्नद्रव्ये असतात. 
३) जमिनीद्वारे वापर ः 
१) दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट या खताद्वारे स्फुरद व कॅल्शियम या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज भागवली जाते. 
२) शिफारशीनुसार विविध कडधान्य पिकांना शिफारस केले तेवढेच ५० ते ६० किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. 
३) कडधान्य पिकांकरिता जमिनीतून पेरणी किंवा लागवड करताना प्रतिहेक्टरी फेरस सल्फेट २५ किलो मुख्य अन्नद्रव्ये खतांसोबत द्यावे. 
४) अमोनियम मॉलिब्डेट किंवा सोडियम मॉलिब्डेट बीजप्रक्रिया करणे शक्य न झाल्यास जमिनीतून २५० ग्रॅम प्रतिहेक्टर मॉलिब्डेट मुख्य अन्नद्रव्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांसोबत पेरणी करतानाच द्यावे.

हे लक्षात असू द्या ः 
जाणीवपूर्वक नत्राची शिफारस केलेली मात्रा देणे महत्त्वाचे आहे. आपण जर नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात दिली, तर त्याचा विपरीत परिणाम जीवाणूद्वारे होणाऱ्या नत्र स्थिरीकरणावर होतो. कारण जास्त नत्रयुक्त खते दिल्यास मुळावर गाठी येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे कृषी विद्यापीठाने विविध कडधान्य पिकांना शिफारस केले तेवढेच २५ ते ३० किलो नत्र प्रतिहेक्टरी द्यावे. 

 Source:
(सहसंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »