आंबा फळांवरच्या कीड निर्मूलन उपाययोजनांवर एपीपीपीसी आणि कृषी मंत्रालयाच्या वतीने 19 ते 23 जून पर्यंत नवी मुंबईत वाशी इथे कार्यशाळेचे आयोजन
मुंबई/नवी दिल्ली, 19 जून 2023 PIB : आंबा फळांवर पडणाऱ्या किडींचे उच्चाटन करण्यासाठी राबवता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर APPPC (आशिया पॅसिफिक प्लान्ट प्रोटेक्शन कमिशन), या आशिया-प्रशांत क्षेत्र रोप संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेचे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. APPPC आणि कृषी मंत्रालयाने ही कार्यशाळा संयुक्तपणे, नवी मुंबईतल्या वाशी इथे 19 ते 23 जून 2023 पर्यंत आयोजित केली आहे. या परिषदेत २५ देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले आहेत.
अशाप्रकारची कार्यशाळा केवळ त्या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आवश्यक नाही तर जागतिक योगदानामध्ये भारताच्या वाढत्या जबाबदारीचे एक प्रतीक आहे, असे करंदलाजे यांनी 19 ते 23 जून 2023 सांगितले.
गेल्या काही काळात भारताने कृषी क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. देशभरात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी आणि मासे या प्रमुख कृषीउत्पादनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे, लोकसंख्या वाढत असूनही दरडोई खाद्यपदार्थांची उपलब्धताही वाढली आहे आणि जगाला पुरवठा करु शकणाऱ्या कृषी उत्पादनांच्या प्रमुख निर्यातदारांपैकी, भारत एक देश बनला आहे, असे त्या म्हणाल्या.
कृषी निर्यातीत वाढ झाल्याने, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होतो. शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी केंद्र सरकारने, शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FPOs/FPCs) आणि सहकारी संस्थांना निर्यातदारांशी थेट संवाद साधता येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता, फार्मर्स कनेक्ट पोर्टल सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठीही महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये आंब्याच्या शेकडो लोकप्रिय जाती आहेत आणि आंब्याचे उत्पादन तसेच निर्यातीच्या दृष्टीकोनातून, आंबाफळाला लागणारी कीड तसेच विविध प्रकारचे विनाशकारक कीटक, इतर अनेक देशांसह भारतासाठीही चिंतेचा विषय बनले आहेत. असे असूनही, भारत अनेक देशांना कीड मुक्त आणि कीटकनाशक मुक्त आंब्यांची निर्यात करत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे कृषि राज्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य सरकारे, निर्यातदार, शेतकरी आणि इतर भागधारकांसह, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, किडींचे निर्मूलन करण्यासाठी राबवता येऊ शकणाऱ्या उपाययोजना आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन यांच्या अंमलबजावणीद्वारे, हे सर्व शक्य होत आहे, असा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या संदर्भात, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने, रोप संरक्षण, विलगीकरण आणि साठवणूक संचालनालयाची स्थापना केली असून या संचालनालयाने अनेक राष्ट्रीय मानके (NSPM) आणि मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित केल्या आहेत. या अंतर्गत देशभरात फळांची खोक्यांमध्ये सुरक्षित बांधणी करण्यासाठी पॅक हाऊसेस, ही केंद्र आणि फळे सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रक्रिया सुविधा विकसित केल्या आहेत. या सुविधांमध्ये, गरम पाण्याची प्रक्रिया, बाष्पाद्वारे उष्णता प्रक्रिया आणि विकिरणाद्वारे (irradiation) जंतूनाश यांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यशाळेत, DPPQS चे वनस्पती संरक्षण सल्लागार आणि स्थायी समिती, IPM, APPPC चे अध्यक्ष डॉ.जे.पी.सिंग, APPPC सचिवालयाचे कार्यकारी सचिव डॉ. युबक धोज जी सी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालया अंतर्गत ICAR आणि NBAIR चे संचालक डॉ.एस.एन.सुशील, आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री.आशीष कुमार श्रीवास्तव हे प्रत्यक्ष, तर APPPC च्या सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. को यीम, दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित आहेत.
या कार्यशाळेत, या उपाययोजनांमध्ये भेडसावणाऱ्या सर्व समस्या आणि संबंधित इतर बाबींवर तपशीलवार चर्चा केली जाईल आणि आयोगाचे सदस्य असलेल्या देशांच्या अनुभवांची देवाणघेवाण होईल, आयोगाचे सदस्य देश आणि उर्वरित जगामध्ये, या उपाययोजनांमध्ये आणखी सुधारणा करत त्यांची परस्पर सामंजस्याने अंमलबजावणी केली जाईल.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट, अनुभवाची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करणे, कीड आणि कीटक निर्मूलनाच्या शाश्वत व्यवस्थापनाविषयी चर्चा करणे आणि रासायनिक कीटकनाशकांचा संभाव्य धोका कमी करणे हा आहे. या संदर्भात, सदस्य देशांचे एकमेकांना सहकार्य मिळण्यासाठी, ही कार्यशाळा संधी उपलब्ध करुन देईल.