Organic fertilizer : रायगडमध्ये शेतकऱ्यांची सेंद्रिय खताला पसंती.

0

Organic fertilizer : रायगडमध्ये शेतकऱ्यांची सेंद्रिय खताला पसंती.

Organic farming : रायगड जिल्हा हा सर्वाधिक रासायनिक खत निर्मिती करणारा जिल्हा आहे; मात्र, रासायनिक खताच्या वापरात शेवटच्या गटात जिल्ह्याचा समावेश होतो.

Alibaug News : रायगड जिल्हा हा सर्वाधिक रासायनिक खत निर्मिती करणारा जिल्हा आहे; मात्र, रासायनिक खताच्या वापरात शेवटच्या गटात जिल्ह्याचा समावेश होतो. २०१५ पर्यंत येथील शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढवली, परंतु ही उत्पादकता आता खुंटली आहे.

रासायनिक खताचा वापराचे तोटे जाणवू लागल्‍याने जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी त्‍याचा वापर कमी केला आहे. गेल्‍या चार वर्षात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला पसंती देत असल्‍याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य ढासळू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी हा बदल केला असून जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. उत्‍पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो.

रासायनिक खताचा अधिक व सातत्‍याने वापर केल्‍यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्‍पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्‍यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर द्यावे लागते. जे सर्वच भागात शक्य नसते.

जिल्ह्यातील भातशेती मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर डोंगराळ भागात पिकवली जाते. तेथे पाण्याचे सातत्य राहात नसल्याने खताच्या वापराचा योग्य तो परिणाम साधता येत नाही. साहजिकच त्‍यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते.

परिणामी जमीनी खारवटतात, असा अनुभव येथील शेतकऱ्यांना २०१५ पासून सातत्याने येऊ लागला आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांप्रमाणे कीटकनाशकांच्‍या वापराचेही अनिष्‍ट परिणाम होत दिसून आले आहे.

नॅनो युरियाचा पुरवठा

युरियाचा अतिरेकी वापर थांबविणे, आर्थिक बचत करणे आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी नॅनो युरिया बाजारात आणला गेला आहे. खरीप आढावा बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझरकडून युरियाच्या गोणीबरोबर नॅनो युरियाच्या पिशवीचा पुरवठा करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती.

त्यास आरसीएफ कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे, कृषी विभागाने जनजागृती करावी, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या होत्या.

खत जाते वाया

कोकणात खरीप हंगामासाठी सर्वाधिक वापर युरियाचा होतो. युरियाची गोणी बघितली तर त्या वर ४६:००:०० लिहिले असते. याचा अर्थ या गोणी मध्ये ४६ टक्के नत्र आहे, स्फुरद व पालाश ० टक्के आहे. म्हणजे ५० किलोच्या गोणी मध्ये २३ किलो नत्र असते. हा युरिया टाकल्यानंतर त्यातला जवळपास १२-१४ किलो युरिया पटकन वापरला जातो व उरलेला युरिया जमिनीत पुरेशे जीवाणू नसल्याने वाया जातो.

जैविक खतांचा वापरास प्राधान्य

रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करा, असे सर्वच पातळींवरून सांगितले जात असले तरीही गरजे इतकी सेंद्रिय खतांची उपलब्धता नाही, जिल्ह्यात सेंद्रिय खताचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात काही शेतकरी यशस्वीही झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातून पांढरा कांदा, हापूस, कलिंगड आशा शेतीपिकासाठी सेंद्रिय खताचा वापर वाढू लागला आहे. केवळ शेणखत, पालापाचोळा वापरला म्हणजे सेंद्रिय खत वापरले असे होत नाही.

धन्यवाद

🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »