शेळीपालनासाठी कोणत्या शेळ्यांच्या जाती निवडाव्यात?

शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी.तसेच १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य राहील.शेळीपालन करण्यासाठी उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीच्या जातींची निवड करावी.
दूध उत्पादनासाठी शेळ्यांची निवड :
संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे .या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी असतात. या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. ही जात दूध आणि मांसासाठी वापरली जाते.शेळ्यांचे डोळे पाणीदार व तेजस्वी असावे.छाती रुंद, भरदार असावी व मान लांब व उंच असावी. कास मोठी, दोन्ही सडांची लांबी सारखी असावी. कास दोन्ही पायांच्या मध्ये किंचित मागच्या बाजूला उंचावलेली असावी.

मांस उत्पादनासाठी शेळ्यांची निवड :
उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, चांगली आहे. सरासरी वजनापेक्षा (३५ ते ४० कि. ग्रॅ.) थोडे जास्त वजन असणाऱ्या उस्मानाबादी शेळ्या निवडाव्या.या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. निवड पद्धतीने जुळी करडे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे.या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी. छाती भरदार व रुंद असावी.
स्रोत – ॲग्रोवन