दोडका लागवड तंत्रज्ञान🌱

0

दोडका या वेलभाजी पिकाला मांडव बांबू चा आधार दयावा लागतो.दोडका पिकाखाली राज्यात ११४७ हेक्‍टर क्षेत्र आहे.दोडक्‍याला शहरात तसेच स्‍थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते.

हवामान व जमीन ☁

दोडक्‍यास दमट हवामान मानवते.तसेच थोडीशी थंडी सहन करु शकतो.भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्‍यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिक घेऊ नये.

लागवड 🌱

जमीनीची उभी आडवी नांगरट करून जमीनीत प्रति हेक्‍टरी १०० ते १५० क्विंटल शेणखत किंवा कंपोस्‍टखत टाकावे. कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे.दोडक्‍यासाठी हेक्‍टरी ३ ते ४ किलो ग्रॅम बियाणे लागते.दोडक्‍यासाठी दोन ओळी २.५ ते ३.५ मीटर वर दोन वेलीत ८० ते १२० से.मी अंतर ठेवतात. प्रत्‍येक ठिकाणी २ ते ३ बिया लावतात. बियाण्याची टोकन ओलसर जमिनीत करावी व उगवण होईपर्यंत पाणी द्यावे.

दोडक्याचे सुधारित वाण 🌿

पुसा नसदार : या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात. या जातीस ६० दिवसांनी फूले येतात. प्रत्‍येक वेलीस १५ ते २० फळे लागतात.

को-१ : ही हळवी जात असून फळे ६० ते ७५ सेमी लांबीची असतात. प्रत्‍येक वेलीस ४ ते ५ किलो फळे लागतात.

या शिवाय पुसा चिकणी कोण हरिता, फुले सूचेता तसेच स्‍थानिक जाती लागवडीयोग्‍य आहे.

रोग व कीड व्यवस्थापन 🌱

रोग : दोडका पिकावर प्रामुख्‍याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी डिनोकॅप -१ मिली. १ लिटर पाण्‍यातून फवारावे तसेच केवडा या रोगाच्‍या नियंत्रणासाठी डायथेन झेड ७८ हेक्‍टरी औषध १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यातून फवारावे.

किडी : पिकावर प्रामुख्‍याने तांबडे भुंगिरे, फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. पाने खाणारी आळीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायॲझोफॉस २ मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे. फळ माशीच्‍या नियंत्रणासाठी मेलॉथिऑन २ मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे.

काढणी 🫒

लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फुलावर येतो. पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत. नखाने हळूच दाबल्‍यावर व्रण पडतो. ती फळे कोवळी समजावीत. दोडक्‍याचे हेक्‍टरी १०० ते १५० क्विंटल उत्‍पादन मिळते.

स्रोत – विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »