Animal Diseases : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

0

पावसाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असल्यामुळे जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी आजारांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे.पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक असते. त्यामुळे जनावरांना शिफारशीत कृमीनाशके द्यावीत.

संसर्गजन्य आजारांची ओळख, लक्षणे व प्रसार

अँथ्रेक्स :

– गाईमध्ये याचा सर्वांत जास्त प्रसार दिसतो. हा जिवाणूजन्य आजार आहे.

प्रसार :

– ज्या वेळी जनावरे चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात, त्या वेळी हे जिवाणू श्‍वासोच्छ्वा‍वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

लक्षण :

– उच्च तापमान, घाबरल्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापते तसेच श्‍वासोच्छ्वासात अडथळा येतो. धाप लागते, जनावर जमिनीवर पडते.

लाळ्या खुरकूत

– आजारी जनावराचे तोंड, सड, खुरांमधून स्राव येत राहतो. खूर खरबरीत झाल्यासारखे दिसतात.

प्रसार :

– प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पाणी, शेण, चारा इत्यादीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो.

लक्षण :

– ताप (१०४- १०५ अंश फॅरेनाहाइट) पर्यंत येतो. तोंडाद्वारे तंतुमय लाळ सतत येत राहते.

– शरीरात थकवा जाणवून अशक्तपणा येतो. तसेच संकरित गाई या आजारास अत्यंत संवेदनशील आहेत.

लसीकरणाची वेळ – पहिली मात्रा ३-४ महिने वयात, दुसरी मात्रा ६-८ वयात, नंतर वर्षातून दोनदा (सप्टेंबर, मार्च).

घटसर्प :

– आजार गळसुजी, परपड या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये तीव्र स्वरूपात आढळतो.

प्रसार :

– आजारी जनावराचे नाक, तोंडातून वाहणारा स्राव, मलमूत्र, दूषित चाऱ्यातून या आजाराचा प्रसार वाढतो.

लक्षण :

– खूप ताप येतो, घशाला सूज येणे, डोळे लाल होणे, जलद श्‍वासोच्छ्वास, जीभ बाहेर येते.

– नाकातून शेंबडासारखा स्राव व तोंडातून लाळ वाहते. काही वेळेस रक्ताची हगवण होते. अंगावर सूज दिसून येते.

लसीकरणाची वेळ – पहिला मात्रा सहा महिने वयात, वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी, प्रादुर्भावीत भागामध्ये वर्षातून दोनदा.

गर्भपात (ब्रुसल्लोसिस) :

– हा आजाराचा वयात आलेल्या जनावरांत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

लक्षण :

– गाभण गाई, म्हशींमध्ये गर्भ सहा महिन्यांचा असताना किंवा नंतर गर्भपात होतो.

– योनी मधून पिवळसर किंवा तपकिरी किंवा चॅाकलेटी रंगाचा स्राव वाहतो.तसेच जनावरे गाभडल्यावर त्यांचा झार लवकर पडत नाही.

लसीकरणाची वेळ – मादी वासरात ४-५ महिने वय असताना फक्त एकदा. (प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये).

फऱ्या :

– घावरे, घाट्या, एकटांग्या नावाने ओळखला जातो. दोन ते तीन वर्षांतील जनावरांना होतो.

– पाणथळ, दलदलीच्या जमिनीत आजाराचे जिवाणू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना याचा प्रादुर्भाव होतो.

प्रसार:

– जिवाणू दूषित झालेला चारा, पाणी या मार्फत तसेच जनावरांच्या तोंड, अंगावरील जखमांतून जिवाणू प्रवेश करतात.

– शरीरातील मांसल भागात जिवाणू काही काळ सुप्तावस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळताच त्यांची वाढ झपाट्याने होते व जनावरे आजारी पडतात.

लक्षण :

– खूप ताप येतो, मांसल भागात विशेषतः फऱ्या वर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते.

– सूज दाबल्यावर करकर आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवंडते, शरीर क्रिया मंद होतात.

लसीकरणाची वेळ – पहिला मात्रा सहा महिने वयात, वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.

लसीकरणासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या बाबी :

१. लसीकरण करण्याच्या १ ते २ आठवड्यांपूर्वी जनावरांना जंतनाशक पाजावे व बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करावे.

२. लसीकरण निरोगी जनावराला करावे. तणावग्रस्त असलेल्या जनावरांत लसीकरण टाळावे (जसे गाभण असल्यास, ताप व रोगाचा प्रादुर्भाव असल्यास) लसीकरण करू नये.

३. लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे.तसेच लसीकरणाच्या सर्व नोंदी लिहून ठेवाव्यात.

४. एकाच दिवशी कळपातील सर्व जनावरांचे लसीकरण करावे.

स्त्रोत : ॲग्रोवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »