वेळीच करा हळद, आल्याची लागवड
वेळीच करा हळद, आल्याची लागवड
डॉ. जितेंद्र कदम
साधारणपणे आले व हळद लागवडीला अक्षयतृतीयेला म्हणजेच मे महिन्यामध्ये सुरवात होते. मात्र, गतवर्षीच्या दुष्काळी वातावरणामुळे पाण्याची कमतरता असल्याने लागवडीला उशीर होत आहे.
– या पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे या पिकांची लागवड उशिरात उशिरा १५ ते २० जूनच्या दरम्यान करावी. त्यानंतर या पिकांची लागवड केल्यास उत्पादनात घट येते.
– लागवडीनंतर वातावरणात उष्णता असल्यास व हवामान कोरडे असल्यास सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. नवीन रुजणाऱ्या कंदाच्या अंकुरास इजा पोचत नाही. कोंब-अंकुर करपण्याचा धोका टळतो.
– या पिकांच्या उगवणीसाठी बियाण्याच्या सुप्तावस्थेच्या कालावधीनुसार ३ ते ४ आठवडे लागतात. त्यामुळे लागवडीपासून पहिल्या पंधरवड्यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे कोणतीही खते देऊ नयेत.
– हळदीची लागवड योग्य खोलीवर करणे आवश्यक आहे. कंदावर दोन ते तीन इंच मातीचा थर येईल, असे पाहावे.
– शक्यतो लागवड करण्यापूर्वी शेतास पाणी देऊन वाफशावर या पिकांची लागवड करावी किंवा लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे, अन्यथा कंद मलूल पडणे किंवा गाभळण्याचे प्रमाण वाढते. कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
– दर्जेदार उत्पादनासाठी या पिकांमध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही अधिक प्रमाणात असतो. लागवडीनंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तण उगवण्यापूर्वी ॲट्रॉझीन हे तणनाशक ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना जमीन ओलसर असणे गरजेचे आहे.
– लव्हाळा किंवा हराळी अशी बहुवार्षिक तणे शेतात आढळून आल्यास, लागवडीनंतर १० ते १२ दिवसांनी तण उगवल्यानंतर आणि हळद उगवण्याच्या अगोदर ग्लायफोसेट (४१ टक्के) हे तणनाशक ४ ते ५ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
– हळद उगवण्यास सुरवात झाल्यानंतर किंवा लागवडीपासून पंधरा दिवसांनंतर कोणत्याही प्रकारच्या तणनाशकांचा वापर हळदीमध्ये करू नये.
– पारंपरिक पद्धतीने म्हणजेच सरी वरंब्यावर हळदीची लागवड केलेल्या क्षेत्रावर उगवण पूर्ण झाल्यावर खतांची दुसरी मात्रा द्यावी. यामध्ये एकरी ८० किलो युरिया आणि शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
– आले-हळदीमध्ये आंतरपिके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपिके निवडावीत. यामध्ये मिरची, झेंडू, घेवडा, सोयाबीन, तूर, एरंड इ. सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
– हळद व आले या पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.
– या पिकांवरील कंदकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी ट्रायकोडर्मा प्लस ३ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून किंवा द्रवरूप स्वरूपातील ठिबकच्या माध्यमातून द्यावा. ट्रायकोडर्मा देताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.
– कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच एकरी ८ किलो दाणेदार फोरेट शेतामध्ये टाकावे.
Source:
डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९
(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली.)